Press "Enter" to skip to content

राम मंदिर निर्मितीच्या आनंदात स्पेन मध्ये ढोलताशे? फेक दावे व्हायरल!

आयोद्धेमध्ये ५ ऑगस्ट रोजीच्या राम मंदिराच्या भूमीपूजनाची जय्यत तयारी सुरु असताना सोशल मिडीयावर पारंपारिक भारतीय पोशाखातील लोकांचा ढोल-नगाडे वाजवत असतानाचा  व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

राम मंदिराच्या निर्मितीचा आनंद साजरा करण्यासाठी स्पेनमधील भारतीय ढोल-नगाडे घेऊन रस्त्यावर उतरले असल्याचं सांगितलं जातंय.  

देशात गद्दार आणि जयचंद यांच्यावर सेक्युलरीझमचं भूत चढत असताना, स्पेनमधील लोक राम मंदिराच्या शिलान्यासचा आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले बघणं, हे सनातन धर्माची वाढती लोकप्रियता दर्शवित असल्याचं सांगितलं जातंय.

अर्काइव्ह पोस्ट

‘स्पेनमध्ये राम मंदिराच्या समर्थनात ढोल-नगाड्यांसह जुलूस काढण्यात आलाय आणि इथे भारतात मात्र काही तथाकथित हिंदू विरोधात आहेत. सगळ्यांना सद्बुद्धी मिळो’ म्हणूनही हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय.

अर्काइव्ह पोस्ट

हाच व्हिडीओ फेसबुकवर देखील साधारणतः या आणि अशाच दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.

पडताळणी :

व्हिडीओच्या पडताळणीसाठी आधी आम्ही व्हिडीओ व्यवस्थित बघितला. व्हिडीओतील सहभागींच्या पोशाखावरून यात दिसणारी लोकं मराठी आहेत असं लक्षात येत होतं. त्यानंतर आम्हाला व्हिडीओमधील ढोलवर ‘नारायणकर’ असं लिहिलेलं आढळून आलं. त्यातून ही लोकं मराठी असल्याची जवळपास खात्री पटली.

त्यानंतर आम्ही व्हिडीओ की फ्रेम्स मध्ये रुपांतरीत करून गुगल रिव्हर्स सर्चच्या सहाय्याने तो नेमका कुठला ते शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘स्वरगंधार ढोल ताशा पथक’ या युट्युब चॅनेलवर हा व्हिडिओ बघायला मिळाला.

Credit : YouTube

‘ढोल ताशा ऑन द स्ट्रीट ऑफ स्पेन’- स्वरगंधार ढोल ताशा पथक असं शीर्षक यावर बघायला मिळालं. हा व्हिडीओ साधारणतः २ वर्षांपूर्वी म्हणजे १६ ऑक्टोबर २०१८ रोजी युट्यूबवर अपलोड करण्यात आलेला आहे.

त्यानंतर आम्ही ‘स्वरगंधार ढोल ताशा पथक’ आणि या पथकाचा स्पेन दौरा या संबंधी अधिक माहिती शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला ‘मुंबई लाईव्ह’ पोर्टलवर २० जून २०१८ रोजी प्रकाशित बातमी सापडली.

‘मुंबई लाईव्ह’वरील बातमी नुसार ‘युरोपिअन फोकलोअर फेस्टिव्हल’ तर्फे आयोजित ‘फोक म्युझिक फेस्टिव्हल’ साठी मुंबईतील दहिसर येथील स्वरगंधार ढोल-ताशा पथकाची निवड झाली होती. या अंतर्गत स्वरगंधार ढोल ताशा पथक २६ ते ३० जून रोजी स्पेनला जाऊन कलेचं सादरीकरण करणार होतं.

२०१४ साली  प्रसाद पिंपळे यांनी दहिसर येथील ‘स्वरगंधार’ची सुरुवात केली होती.

वस्तुस्थिती :

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुंबईतील स्वरगंधार ढोल ताशा पथकाचा असून तो जवळपास २ वर्षे जुना आहे.

स्वरगंधार ढोल ताशा पथकाकडून स्पेनमधील ‘फोक म्युझिक फेस्टिव्हल’ मध्ये केलेल्या सादरीकरणाच्या या व्हिडिओचा राम मंदिराच्या निर्मितीशी काहीही संबंध नाही.  

हे ही वाचा- कोव्हीड१९ च्या सरकारी आणि खाजगी लॅबच्या रिपोर्ट मध्ये फरक? गौडबंगाल असण्याची शक्यता?

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा