Press "Enter" to skip to content

रस्ता ओलांडणाऱ्या हरणांचं दृश्य विलोभनीय आहे खरं; पण ते सोलापूरचं नाही.

“एखाद्या हॉलिवूडच्या भव्य vfx वापरून केलेल्या सिनेमात शोभावं असं दृश्य प्रचंड सुंदर आहे. हा प्रदेश, माणसं थोडी नीट वागली तर प्राणी असे स्वातंत्र्य उपभोगतील” या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झालेल्या ‘स्थलपुराण’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अक्षय इंडिकर यांनी दिनांक २ मे २०२० रोजी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओ मध्ये शंभरेक हरणांचा कळप मुक्तपणे रस्ता ओलांडताना दिसत आहे.

Advertisement

सुरुवातीला हे दृश्य महाराष्ट्रातील असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. पुढे कमेंट्स मध्ये उत्तर देताना हे सोलापूर टेंभूर्णी रस्त्यावरील आहे असं what’s app वरून समजल्याचंही त्यांनी सांगितलं. काही लोकांनी सोलापूर टेंभूर्णी रस्ता असा नसल्याचं सांगितल्यानंतर अक्षय यांनी पोस्ट एडीट केली आणि “व्हिडीओ नेमका कुठला आहे हे स्पष्ट नाही ( माझ्याकडे सोलापूर जिल्ह्यातील आहे असं फॉरवर्ड होऊन आलं पोस्ट एडिट करतो आहे)” असं लिहिलं.

पडताळणी:

व्हिडीओची क्वालिटी फार खराब असल्याने गाड्यांचे नंबर काही दिसत नाहीत त्यामुळे व्हिडीओवरून ठिकाणाचा अंदाज लावणंही अवघड आहे. या व्हिडीओची शहानिशा करताना आमच्या असं लक्षात आलं की फेसबुक, ट्वीटर, युट्युब यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर हाच व्हिडीओ लोकांनी शेअर केला आहे पण प्रत्येकाच्या ठिकाणाचा दावा वेगळाच आहे.

कुणी म्हणालं हा सोलापूर-टेंभूर्णी म्हणजे महाराष्ट्रातील आहे. कुणी म्हणत आहे की हा कर्नाटकमधील अलनावर-हालीयाल रोडवरील आहे तर कुणी म्हणतंय आसामच्या काझीरंगा अभयारण्याच्या आसपासचा हा व्हिडीओ आहे. कुणी ओडीसातील असिका ते बेनापाटा रोडवरील हे दृश्य असल्याचा दावा करत आहे तर कुणी राजस्थानातील आणि कुणी गुजरात मधील.

या सर्व व्हिडीओजच्या अपलोड होण्याच्या तारखा आणि वेळा आम्ही तपासल्या तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की सर्वात आधी हा व्हिडीओ युट्युबवर २९ एप्रिल रोजी ‘वीरामंचनेनी ग्रुप’ नावाच्या युट्युब चॅनलवर अपलोड झालेला आहे. यावर कुठलाही लोगो, ग्राफिक्स किंवा वॉटरमार्क नाही. याचाच अर्थ असा आहे की इतर ज्या ज्या व्हिडीओज वर लोगो, ग्राफिक्स किंवा वॉटरमार्क आहेत ते या कोऱ्या करकरीत व्हिडीओवर लावले असणार.

युट्युब, ट्विटर, फेसबुक या तीनही माध्यमांपैकी सर्वात जुना असणारा हा व्हिडीओ बेळ्ळारी मार्गावर असल्याचे म्हटले आहे. याच अपलोड वेळेच्या आसपास अपलोड झालेले इतर काही व्हिडीओ सुद्धा हे दृश्य अदोनी ते बेळ्ळारी मार्गावरील असल्याचा दावा करताना आढळले. अदोनी हे ठिकाण आंध्रप्रदेश मधील आहे तर बेळ्ळारी कर्नाटकातील.

गुगल मॅपवर सॅटेलाईट व्ह्युव ऑन करून आम्ही या रस्त्याचे बारकाईने निरीक्षण केले तेव्हा असे लक्षात आले की या मार्गावर ‘मोका’ नावाचं अभयारण्य आहे.

वस्तुस्थिती :

एवढ्या मोठ्या संख्येने हरणांचा कळप लोकवस्तीजवळ असणं अवघड आहे. यासाठी त्या रस्त्यावर अभयारण्य असणं, व्हिडीओ मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला दूरदूरपर्यंत एकही घर न दिसणं, व्हिडीओमध्ये रस्त्याच्या लगत घनदाट जंगल नाही अगदी विरळ झाडी आहे हेच सॅटेलाईट व्ह्युव मध्ये सुद्धा दिसून येणं. या सर्व बाबी याच गोष्टीची पुष्टी करत आहेत की हा व्हिडीओ याच ठिकाणावरील असण्याची पुरेपूर शक्यता आहे.

एवढे पुरावे असूनही आम्ही अगदी शतप्रतिशत हा दावा करू शकत नाही की उपरोक्त व्हिडीओ अदोनी-बेळ्ळारी मार्गावरील मोका अभयारण्यातीलच असावा पण किमान आमच्या क्रॉसचेक मध्ये हे तरी लक्षात आलं की हे दृश्य खरोखरीच विलोभनीय आहे पण ते सोलापूर-टेंभूर्णी मार्गावरील किंबहुना महाराष्ट्रातील नक्कीच नाही. म्हणजेच हरणांच्या कळपाचा रस्ता ओलांडणारा व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोलापूर, महाराष्ट्रातील असल्याचा दावा खोटा आहे. म्हणून हा व्हिडीओ या खोट्या दाव्यासह आमच्या ‘चेकपोस्ट’वर आम्ही अडवून ठेवत आहोत.

हे ही वाचा- ‘भारतीय राजाने ‘रोल्स रॉईस’ कारची बनवलेली कचरागाडी’ कहानी अच्छी है मगर सच्ची नहीं!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा