सोशल मीडियात एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या राजकारणावर सडकून टीका करण्यात आली आहे. सत्तेच्या लालसेपोटी ही लोकं वेडी झाली आहेत, असा आरोप करण्यात आलाय. व्हिडिओत मोदी आणि शहा यांच्यावर टीका करणारी महिला म्हणजे माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी (Maneka Gandhi) असल्याचा दावा केला जातोय.
फेसबुकवर NCP PCMC Election 2022 या पेजवरून ‘ भाजपाच्या माजी मंत्री आणि खासदार मेनका गांधी यांचा संयम सुटला,आणि केला जोरदार प्रहार. आता खरे तोंड काळे झाले असणार’ या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला गेलाय.
‘राष्ट्रवादी पर्व’ या पेजवरून देखील हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. इथे देखील देखील ‘भाजपा खासदार मेनका गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी* *अमित शहा यांच्या वर जोरदार प्रहार करुन भाजप पक्षाला घरचा आहेर दिला” असा दावा करण्यात आलाय.
‘राजकारण Rohit Pawar Fc‘ या फेसबुक पेजवरून आणि अनेक व्हॉट्सऍप ग्रुप्सवरूनही याच दाव्यांसह व्हिडीओ व्हायरल होतोय. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश मालानी यांनी निदर्शनास आणून दिले व पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
भाजप नेत्या मनेका गांधी (maneka gandhi) सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांचे अनेक वेगवेगळे फोटोज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हिडिओत दिसणारी महिला मनेका गांधी नाहीत, हे अगदी सहजच लक्षात येते. त्यासाठी वेगळ्या पडताळणीची गरजच नाही.
व्हायरल व्हिडिओतील महिलेची चेहरेपट्टी मनेका गांधी यांच्याशी मिळतीजूळती आहे. दोघींच्याही चेहऱ्यांमध्ये काहीसे साम्य आहे एवढं मात्र नक्की. त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील महिला नक्की कोण, हे शोधणं मात्र गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने शोध सुरु केला.
आम्हाला झुल्फकार अली या फेसबुक युजरच्या प्रोफाईलवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हंटलं होतं,
“डॉली शर्मा जी, मुझे आज खुद पर गर्व होता है. मैने लोकसभा में आपको वोट दिया था. आप के अंदर इन्सानियत जिंदा है और आप आज भी इन्सान है.”
मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता समजले की व्हिडिओतील महिला काँग्रेस नेत्या डॉली शर्मा (Dolly Sharma) आहेत. त्यांनी गाजियाबाद मतदारसंघातून २०१९ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती.
डॉली शर्मा यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून २० एप्रिल २०२१ रोजी मतदारसंघातील जनतेशी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधला होता. जवळपास २३ मिनिटांच्या याच ‘फेसबुक लाईव्ह’मधील काही भाग सध्या सोशल मीडियावर भाजप नेत्या मेनका गांधी यांच्या नावाने व्हायरल होतोय.
‘फेसबुक लाईव्ह’च्या १४ मिनिटे १५ सेकंदाच्या पुढे आपण व्हायरल क्लिप ऐकू शकता.
दरम्यान, याप्रकरणी सुनगढी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि आयटी कायद्यान्वये तक्रार दाखल करून घेण्यात आली असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. अशा प्रकारचा व्हिडीओ व्हायरल केल्याने मनेका गांधी (Maneka Gandhi) आणि खासदार वरुण गांधी तसेच भाजपा सरकारची प्रतिमा डागाळली गेली असल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हंटले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणी मध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत असलेली महिला भाजप नेत्या आणि माजी मंत्री मनेका गांधी नाहीत. व्हिडिओतील महिला काँग्रेस नेत्या डॉली शर्मा आहेत. त्यांनी २०१९ साली गाजियाबाद मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविली होती.
हे ही वाचा- मोदींवरील टीकेचा व्हायरल व्हिडीओ नेपाळी संसदेतील नाही, जाणून घ्या सत्य!
Be First to Comment