सोशल मीडियावर एक अतिशय सुन्न करणारा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडिओत रस्त्याच्या मधोमध बसलेल्या गाईला एका ट्रॅक्टरने चिरडले जात असल्याचं (tractor crushing a cow) बघायला मिळतंय. व्हिडिओ सोबत दावा केला जातोय की हे ट्रॅक्टर चालवणारा ड्रायव्हर मुस्लिम होता आणि त्याने जाणूनबुजून गाईवर ट्रॅक्टर चालवला, गाईची हत्या केली.
“सड़क पर बैठी गाय किसी का क्या बिगाड़ रही थी, जो इस #मुसलमान ने कुचल कर उसको मार डाला, #मुस्लिम_जिहादीयो को हिम्मत बढ़ने का मुख्य कारण है हिन्दुओ की चुप्पी और हिन्दुओ की बुजदिली व कायरता” या अशा धार्मिक चिथावणीच्या कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.
पडताळणी:
गुगलवर काही किवर्डच्या मदतीने व्हायरल व्हिडिओचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘इटीव्ही भारत महाराष्ट्र’च्या फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आलेल्या बातमीत घटनेबद्दल सविस्तर माहिती मिळाली.
बातमीनुसार, घटना छत्तीसगडमधील बिलासपूर येथील आहे. सीपत रोडवर रस्त्याच्या कडेला एक गाय बसली होती. गाईच्या मालकाला ज्यावेळी आपल्या गाईचा मृतदेह बघितला, तेव्हा त्याने पोलीस ठाण्यामध्ये जाऊन याबाबत तक्रार नोंदवली.
प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता, ट्रॅक्टर चालकाचे दुष्कृत्य समोर आले. त्यानंतर मग तपास करुन, ट्रॅक्टर मालक सोनू यादवचा पोलिसांनी शोध घेतला; आणि चौकशी सुरू केली.
ट्रॅक्टरच्या मालकाने सांगितले, की त्या दिवशी तो ट्रॅक्टर ईश्वर ध्रुव नावाचा चालक चालवत होता. पोलिसांनी मग ईश्वरचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ईश्वरने आपला गुन्हा कबूल केला, ज्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी ट्रॅक्टरही जप्त केला आहे.
‘आईबीसी २४’ या युट्यूब चॅनेलवरून देखील ७ जून २०२१ रोजी या संदर्भातील बातमी देण्यात आलेली आहे. या रिपोर्टमध्ये देखील घटना बिलासपूर येथील असून आरोपीचे नाव ईश्वर ध्रुव असल्याचे सांगण्यात आले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील धार्मिक चिथावणीचे दावे चुकीचे आहेत. गाईला चिरडण्याचा (tractor crushing a cow) अत्यंत व्यथित करणारा व्हिडीओ छत्तीसगडमध्ये बिलासपूर येथील असून आरोपी मुस्लिम नसून हिंदू धर्मीयच आहे. आरोपी ट्रॅक्टर ड्रायव्हरचे नाव ईश्वर ध्रुव असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हे ही वाचा- ‘जावेद’ दहा हजार सिमकार्ड विकत घेऊन सोशल मिडियात धार्मिक तेढ पसरवत होता?
Be First to Comment