कोरोनामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती चिंताजनक बनलेली असतानाच सोशल मीडियावर साधारणतः ४२ सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला जातोय. एका स्मशानभूमीतील ह्या व्हिडिओमध्ये मृतदेहांची रांग दिसून येतेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ जळगावमधील आहे.
युजर्स दावा करताहेत की आतापर्यंत तुम्ही राशनसाठी रांगेत उभे राहिले असाल, गॅसच्या टाकीसाठी रांगेत उभे राहिले असाल, परंतु महाराष्ट्रातील जवळगावात प्रेतांच्या अंत्यसंस्कारासाठी रांगेत उभारायला लागतंय. कोरोनामुळे महाराष्ट्रात हाहाकार माजलाय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘गुजराती मिड डे’च्या वेबसाईटवर व्हायरल व्हिडीओ संदर्भातील ६ एप्रिल रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली.
बातमीनुसार व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील सूरतच्या अश्विनीकुमार स्मशानभूमीतील आहे. आठपेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक मृतदेहांच्या अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेत होते. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे नातेवाईक मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आले होते. मात्र अंत्यसंस्कारासाठी जागाच नसल्याने त्यांना प्रतीक्षागृहात ताटकळत थांबावं लागलं होतं.
गुजरातच्या सुरतमधील कोरोनाच्या हाहाकाराविषयीची एक बातमी ‘एशियानेट न्यूज’च्या वेबसाईटवर देखील मिळाली. १३ एप्रिल रोजी प्रकाशित बातमीनुसार सुरतमध्ये दररोज 100 हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. स्मशानभूमीमध्ये 24 तास अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले जाताहेत. असे असूनही बऱ्याच जणांना मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी तासन्तास वाट बघावी लागतेय.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील अंत्यसंस्काराच्या प्रतीक्षेतील मृतदेहांच्या रांगेचा व्हिडीओ महाराष्ट्राच्या जळगावातील नसून गुजरातच्या सुरतमधील अश्विनीकुमार स्मशानभूमीतील आहे.
हे ही वाचा- सिप्ला कंपनी कोव्हीड१९ रुग्णास थेट हॉस्पिटलमध्ये ‘रेमेडीसिव्हीर’ इंजेक्शन पुरवतेय?
[…] […]