Press "Enter" to skip to content

अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचा व्हिडीओ बलात्कार आणि धार्मिक चिथावणीच्या दाव्यासह व्हायरल!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. व्हिडिओत मृतावस्थेतील एक छोटी मुलगी आणि तिच्या मृतदेहाभोवती आजूबाजूला शोकाकूल नातेवाईक दिसताहेत. सोशल मीडियात दावा करण्यात येतोय की अलिगढ येथील तेजवीर प्रजापती (tejvir prajapati) यांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला.

Advertisement

काँग्रेसशी संबंधितांकडून या व्हिडिओच्या आधारे उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला लक्ष्य बनवलं जातंय. मुलींसाठी न्यायाची मागणी करतानाच उत्तर प्रदेश सरकार आरोपींना वाचवत असल्याचा आरोप केला जातोय.

अर्काइव्ह पोस्ट

भाजपशी संबंधितांकडून मात्र हाच व्हिडीओ धार्मिक चिथावणीसाठी वापरण्यात येतोय. येथे देखील तेजवीर प्रजापती (tejvir prajapati) यांच्या ३ वर्षाच्या मुलीवर ३८ वर्षीय शेजारी मुहम्मद नाजीमने बलात्कार करून तिची हत्या केली, असा दावा केला जातोय. पीडित मुलगी हिंदू असल्याने बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा देखील केला गेलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

व्हिडीओच्या सत्यतेच्या पडताळणीसाठी आम्ही आधी व्हिडिओच्या किफ्रेम्सच्या आधारे हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, ते शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु रिव्हर्स सर्चमध्ये त्यासंबंधी कुठल्याही विश्वासार्ह माहिती मिळाली नाही.

दोन्हीही गटांकडून करण्यात आलेल्या दाव्यामध्ये एक गोष्ट मात्र अगदी सारखीच आहे. ती म्हणजे ही घटना अलिगढ येथील असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे मग आम्ही त्यासंबंधित किवर्डच्या साहाय्याने घटना नेमकी कुठली आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला अलिगढ पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंबंधी करण्यात आलेलं ट्विट मिळालं. या ट्विटमध्ये अलिगढ पोलिसांनी सोशल मीडियावरील व्हायरल दावे संपूर्णतः चुकीचे आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय सत्येतेची खात्री करून घेतल्याशिवाय अशा प्रकारचे ट्विट्स न करण्याचे आवाहन देखील केलंय.

अलिगढ पोलिसांकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये सांगण्यात आलंय की ४ नोव्हेंबर २०२० रोजी अपघातामध्ये या मुलीचा मृत्यू झाला होता. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी पोस्टमॉर्टम करण्यात आलं होतं. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.  

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील दाव्याप्रमाणे ही बलात्काराची घटना नाही. व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू झालेला आहे. या घटनेशी ‘मुहम्मद नाजीम’ नावाच्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही. या प्रकरणी पोलीस तपास सुरु असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

हे ही वाचा- ‘सायकल गर्ल’ ज्योती पासवान सुखरूप, हत्या आणि बलात्काराचे दावे चुकीचे!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »
More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा