पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मासिक ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा चालू महिन्याचा एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात त्यांनी कोरोना संक्रमणाविषयी जनतेला संबोधित केले. त्यात त्यांनी लोकांना वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांची मदत घेण्याचे आवाहन केले.
आपले कौटुंबिक डॉक्टर्स किंवा परिसरातील इतर डॉक्टरांकडून सल्ला घेऊनच कोरोनावरील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन मोदींनी जनतेला केले. मोदी आपल्या संबोधनात म्हणाले, “अनेक डॉक्टर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती करताहेत. फोनवरून, व्हाट्सअपवरून काऊन्सेलिंग करताहेत.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी डॉक्टरांच्या योगदानाचा आणि ते करत असलेल्या जनजागृतीचा उल्लेख करत होते, त्यावेळी स्क्रिनवर एक व्हिडीओ चालविण्यात येत होता. या व्हिडिओत दिसणाऱ्या डॉ. आलोक यांच्याकडून लोकांना ऑक्सिजन सिलेंडरचा पर्याय म्हणून नेब्युलाइजर वापरण्याचा सल्ला (mann ki baat nebulizer) देण्यात आला होता.
पंतप्रधानांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओच्या २८ ते ३५ सेकंदा दरम्यान आपण डॉ. आलोक यांना ‘मन की बात’ कार्यक्रमात बघू शकता.
डॉ. आलोक यांच्या व्हिडिओमधील ऑक्सिजन सिलेंडरचा पर्याय म्हणून नेब्युलाइजर वापरण्याचा सल्ला संपूर्णतः चुकीचा असून या दाव्याला कुठलाही आधार नाही. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी डॉ. आलोक यांचा दावा निराधार असल्याचे सांगितले आहे.
डॉ. आलोक फरिदाबादच्या सर्वोदय हॉस्पिटलशी संबंधित आहेत. सर्वोदय हेल्थ केअरकडून देखील डॉ. आलोक यांच्या दाव्यांना कुठलाही वैज्ञानिक आधार नसून या दाव्याचं हॉस्पिटलकडून खंडन करण्यात आलं होतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजनला पर्याय म्हणून नेब्युलाइजर मशीन वापरण्याचा सल्ला देणाऱ्या डॉ. आलोक यांच्याकडून देखील दुसऱ्या एका व्हिडिओच्या माध्यमातून आधीच्या व्हिडिओबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं.
स्पष्टीकरण म्हणून रिलीज केलेल्या व्हिडिओमध्ये डॉ. आलोक म्हणतात,
“मला काहीतरी वेगळं सांगायचं होतं आणि कदाचित मी चुकीचे शब्द वापरले. त्यामुळे लोकांमध्ये चुकीचा मेसेज जात आहे. ऑक्सिजनचा पर्याय नेब्युलाइजर आहे, असं मला म्हणायचं नव्हतं. नेब्युलाइजर कधीच ऑक्सिजनचा पर्याय असू शकत नाही.”
नेब्युलाइजर मशीन काय असते?
तुम्ही कधी दवाखाण्यातील वाफ घेण्याचं मशीन पाहिलंय? साधारण तसच काहीसं परंतु पाण्याच्या वाफेशिवाय काम करणारं हे मशीन.
अस्थमा/दमा असलेल्या व्यक्तीला जे औषध नाकावाटे द्यायचे आहे ते या नेब्युलाइजर मशिनच्या मदतीने धुक्याच्या स्वरुपात करून दिले जाते. श्वसनाच्या इतर आजारांसाठीसुद्धा याचा वापर होतो. काहीवेळा कफामुळे ब्लॉक झालेले नाक मोकळे करण्यासाठीही हे वापरतात. लहान मुलांना वाफेच्या गरमीचा त्रास होऊ शकतो म्हणून वेपरायझर ऐवजी अनकेदा नेब्युलाईजर वापरले जाते.
अगदी टेबलावर ठेवता येईल एवढ्या मोठ्या ते कुठेही घेऊन फिरता येईल अशा स्वरुपातही हे मशीन्स असतात. यात केवळ लिक्विड मेडिसिनचे धुक्यात रुपांतर होते जे आपण नाकावाटे श्वसन नलिकेतून फुप्पुसापर्यंत घेऊ शकतो. यात ऑक्सिजन तयार होत नाही.
हे ही वाचा- ऑक्सिजन प्लान्टचा निधी राज्य सरकारने गायब केल्याचा भाजप आमदाराचा दावा फेक!
Be First to Comment