इजराईल-पॅलेस्टाईन संघर्ष (israel palestine conflict) सुरु झाल्यापासूनच भारतीय सोशल मीडियात इजराईल आणि पॅलेस्टाईन यांचे समर्थन करणारे दोन गट पडले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडिओत मल्याळी भाषेतून घोषणाबाजी केली जातेय. दावा केला जातोय की हा व्हिडीओ राहुल गांधींचा मतदारसंघ असलेल्या वायनाडमधील असून ‘हमास’ या दहशतवादी संघटनेचे समर्थक असणारे हे लोक पॅलेस्टाईनला पाठिंबा देताहेत.
फेसबुकवर देखील हाच व्हिडीओ शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ‘कतार लिव्हिंग’ या फेसबुक पेजवरून १६ मे २०२१ रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला.
व्हिडिओच्या कॅप्शननुसार १५ मे २०२१ रोजी कतारची राजधानी दोहा आणि इमाम मुहम्मद इब्न अब्द-अल-वहाब मशिदीच्या मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात निदर्शक जमले होते. त्यांच्याकडून इजराईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यांचा निषेध करताना हे हल्ले थांबविण्याची मागणी करण्यात आली होती.
या व्हिडिओतील दिसणाऱ्या प्रदर्शन स्थळामध्ये आणि सध्या भारतात राहुल गांधींच्या वायनाडमधील मतदारसंघातील म्हणून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील प्रदर्शन स्थळामध्ये साम्य आहे.
कतारमधील व्हिडिओत मल्याळममधून घोषणाबाजी कशी काय?
व्हिडीओ कतारची राजधानी दोहामधील असला तरी निदर्शकांमध्ये केवळ कतारमधील नागरिक नव्हते. जगभरातील वेगवेगळ्या देशातील हजारो लोक पॅलेस्टाईनच्या समर्थनात एकत्र जमले होते. त्यामुळे यात मूळचे भारतीय लोक देखील होते, जे सध्या कतारमध्ये स्थायिक आहेत.
व्हायरल व्हिडिओत दिसणारे लोक केरळमधील मुस्लिम असून कतारच्या ग्रँड मशिदीवर निघालेल्या निषेध मोर्चादरम्यानचा हा व्हिडीओ असल्याचे स्पष्ट करणारा व्हिडीओ देखील आम्हाला मिळाला. मुझम्मी नुई अदूर यांनी १७ मे रोजी आपल्या फेसबुक अकाउंटवरून हा व्हिडीओ अपलोड केलाय.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की केरळच्या मुस्लिमांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनात कतारच्या ग्रँड मशिदीवर मोर्चा काढला. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अदूर यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओचाच छोटासा भाग आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ राहुल गांधींचा मतदारसंघ वायनाडमधील नसून कतारची राजधानी दोहा येथील पॅलेस्टाईनच्या समर्थनात काढण्यात आलेल्या मोर्चामधील आहे.
हे ही वाचा- इजराईलने लढाऊ विमानाला भारतीय महिला सौम्या संतोषचे नाव दिलेले नाही, व्हायरल फोटो एडिटेड!
Be First to Comment