Press "Enter" to skip to content

मुस्लिम मुलींच्या नातेवाईकांकडून हिंदू तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे दावे फेक!

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये दोन तरुणांना जमावाकडून वाईट पद्धतीने मारहाण केली जात असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की २ मुस्लिम मुली हिंदू मुलांसोबत फिरताना बघायला मिळाल्यानंतर मुलींच्या नातेवाईकांकडून हिंदू तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली.

Advertisement

#जागो_हिंदुओं_जागो…ये विडिओ कहा का है पता नही पर बताया जा रहा है की 2 मुस्लिम लड़की हिंदू लड़कों के साथ देखी जाने के बाद क्या हाल कर दिया गांव वालों ने ओर लड़कियों के परिवार वालों ने…लड़का हो या लड़की हर बार हिंदू ही मार क्यों खाता है…???” अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

Source: Facebook

ट्विटरवर देखील हा व्हिडीओ शेअर केला जातोय. व्हिडीओ दिल्लीतील शाहीनबाग परिसरातील असून केजरीवालांच्या राज्यात हिंदूंवर अत्याचार केले जात असल्याचं सांगितलं जातंय.

अर्काइव्ह

पडताळणी:

  • आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्यांचा रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोध घेतला. आम्हाला दैनिक जागरणच्या वेबसाईटवर ४ ऑगस्ट २०२१ रोजी प्रकाशित बातमी मिळाली.
  • बातमीनुसार उत्तर प्रदेशातील कैरानामधील तितरवाडा गावातील घटनेचा हा व्हिडीओ आहे. मारहाण झालेले युवक मुझफ्फरनगर जिल्ह्यातील रहिवासी होते. व्हिडिओमधील युवकांना मारहाण का केली जात होती, याबद्दलची माहिती उपलब्ध नाही.
  • जागरणच्या बातमीमध्ये व्हिडिओमधील युवकांना मारहाण का केली जातेय हे स्पष्ट होत नसल्याने नेमकं प्रकरण काय आहे हे शोधण्यासाठी आम्ही किवर्डसच्या साहाय्याने अधिक शोध घेतला. आम्हाला एका ट्विटर युजरच्या पोस्टवर श्यामली पोलिसांनी दिलेल्या माहितीचा व्हिडीओ बाईट मिळाला.
  • श्यामली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एहसान नावाच्या व्यक्तीचं लग्न झालं होतं. एहसानच्या पत्नीचे लग्नापूर्वी एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. हाच तरुण आपल्या मित्रासह एहसानच्या पत्नीला भेटायला तिच्या सासरी आला होता.
  • महिलेच्या सासरच्यांना ज्यावेळी ही गोष्ट समजली त्यावेळी त्यांनी दोन्ही तरुणांना पकडले आणि महिलेच्या माहेरच्या मंडळींना देखील या गोष्टीची कल्पना दिली. त्यानंतर त्या महिलेची माहेरची मंडळी देखील घटनास्थळी पोहोचली आणि महिलेच्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींकडून या दोन तरुणांना आणि त्या महिलेला देखील बेदम मारहाण करण्यात आली.
  • व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडूनच या प्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. प्रकरणातील दोषींना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे श्यामली पोलिसांकडून या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.
  • कैराना पोलीस स्टेशनचे प्रमुख प्रेमवीर सिंह राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार घटना २८ जुलै रोजीची असून प्रकरणातील सर्वच जण मुस्लिम समुदायातील आहेत. एहसानच्या पत्नीचे नाव शहजादी असून तिला भेटायला आलेल्या तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराचे नाव आफताब आहे. याप्रकरणी अमजद, नौशाद आणि मुबारिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर एकाच समाजातील लोकांच्या आपापसातील भांडणाचा व्हिडीओ मुस्लिमांचा हिंदूंवरील अत्याचाराच्या दाव्यांसह व्हायरल होतोय. व्हिडिओत ज्या तरुणांना मारहाण केली जातेय ते आणि ज्यांच्याकडून मारहाण केली जातेय ते देखील मुस्लिम आहेत.

व्हिडीओ दिल्लीतील शाहीन बाग येथील नसून उत्तर प्रदेशातील कैराना भागातील श्यामली परिसरातील तितरवाडा गावातील आहे.

हेही वाचा- बद्रीनाथ मंदिराची जागा बद्रुद्दीन दर्ग्याची असल्याचा दावा करणाऱ्या मौलवीची मशीद जेसीबी चालवून पाडली?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा