सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये प्राथमिक शाळेत बसून मुल्ला मौलवी विद्यार्थ्यांना इस्लामिक शिक्षण देत असल्याचे, बिर्याणी बनवून खाऊ घालत बघायला मिळतेय. पोलिसांनी आणि हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकून हा प्रकार उघडकीस आणला. दावा करण्यात येतोय की व्हिडीओ दिल्लीतील सरकारी शाळेतील असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिल्लीच्या सरकारी शाळांना मदरशांमध्ये बदलवायला सुरुवात केली आहे.
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हायरल होतोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता डॉ. आशुतोष गुप्ता बीजेपी गाझियाबाद विधानसभा या युट्युब चॅनेलवरून अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ मिळाला. ‘प्राइमरी विद्यालय में आपत्तिजनक गतिविधि’ अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलाय.
व्हिडीओ रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील मिर्झापूर भूड येथील प्राथमिक शाळेतील आहे. दिवाळी-गुरुपर्वाच्या सुट्टीच्या दिवशी या शाळेत मांस-बिर्याणीची पार्टी सुरु होती. पार्टीमध्ये ‘आपत्तीजनक’ इस्लामीक साहित्य मिळाले. सामाजिक कार्यकर्ता आशुतोष गुप्तांनी व्हिडीओ बनवून या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दिल्याचे देखील या व्हिडीओ रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित बघितला तर त्यात शाळेच्या भिंतीवर ‘प्राथमिक विद्यालय, मिर्जापुर’ असे लिहिलेले असल्याचे बघायला मिळेल. शिवाय आशुतोष गुप्ता नामक व्यक्ती देखील पोलिसांना घेऊन आल्याचे दिसतेय. म्हणजेच व्हिडीओ दिल्लीतील नसून उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील मिर्झापूर येथील असल्याचे स्पष्ट होते.
पार्टीमध्ये खरंच काही ‘आपत्तीजनक‘ साहित्य मिळाले का?
गाझियाबादच्या विजय नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी योगेंद्र मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मिर्झापूर येथे विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक प्राथमिक शाळा आहे. गेल्या काही वर्षांपासून शाळा प्रशासनाच्या परवानगीने दियाजुद्दीन नावाची व्यक्ती आपल्या कुटुंबासह शाळेच्या आवारात राहते.
अनेक दिवसांपासून दियाजुद्दीन यांची मुले आजारी होती. त्यामुळे मुले बरी व्हावीत म्हणून त्यांच्या पत्नीने नवस केला होता. मुले बरी झाल्यानंतर हा नवस फेडण्यासाठी कुराण ख्वानीचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजनादरम्यान काही स्थानिकांच्या तक्रारीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले.
प्रकरण चिघळून वाद-विवाद निर्माण होऊ नये म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांना त्यांच्या सहमतीनेच पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आणि चौकशी केल्यानंतर सोडून देण्यात आले. संबंधितांकडून कुठलेही ‘आपत्तीजनक’ साहित्य मिळालेले नाही. या प्रकरणी कुठलीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हिडीओ दिल्लीमधील नसून उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मिर्झापूर येथील आहे.
हेही वाचा-व्हायरल व्हिडिओमध्ये मौलाना अन्नावर थुंकत आहे का? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment