सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. साधारणतः १८ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमा झाली असल्याचे बघायला मिळतेय. गर्दीतील अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क लावलेला नाही, ना या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन होताना बघायला मिळतंय.
सोशल मीडियावर दावा केला जातोय की हा व्हिडीओ नागपूरमधील मोमीन बाजारातील (Momin Market Nagpur) असून कोरोना निर्बंधांच्या काळात देखील मुस्लिम समाजातील लोकांनी ईदच्या खरेदीसाठी गर्दी केली आहे.
ईश्वर वशिष्ठ नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ते म्हणताहेत, “मोमिन मार्केट नागपुर…. ईद की खरीदारी देखें. यहां कोरोना वायरस नहीं फैलेगा.. वह सिर्फ कुंभ में फैलता है”
फेसबुकवर देखील हा व्हिडीओ याच कॉपीपेस्ट दाव्यांसह शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओ खरंच नागपुरातील आहे का हे तपासण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन त्या गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला ट्विटरवर अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ शेअर केला गेला असल्याचे आढळून आले. यातील बहुतांश ट्विट्सनुसार हा व्हिडीओ पाकिस्तानातील लाहौर शहरातील इछरा मार्केटमधील आहे.
एका पाकिस्तानी युजरने हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलंय, “लाहौरमधील इछरा बाजारातील दृश्य. एकीकडे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन नाही. ऑक्सिजन सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडताहेत आणि आपण सरकारी आदेशांचं अशा प्रकारे पालन करतोय..”
या माहितीच्या आधारे अधिक शोध घेतला असता २६ एप्रिल २०२१ रोजी ‘राबता टीव्ही’ या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे बघायला मिळाले. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील संबंधित व्हिडीओ लाहौरमधील इछरा मार्केटमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. ईदच्या खरेदीच्या वेळी कोरोना संदर्भातील कुठल्याही सुरक्षितता उपायांचे पालन केले जात नसल्याचे देखील यात म्हंटले आहे.
आम्हाला पाकिस्तानी वेबसाईटचा २८ एप्रिल रोजीचा रिपोर्ट देखील मिळाला. या रिपोर्टमध्ये लाहौर प्रशासनाने कोविड नियमावलीच्या उल्लंघन प्रकरणी इछरा मार्केटमधील व्यावसायिकांवर कारवाई केली असल्याची माहिती मिळाली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. व्हिडीओ नागपूरमधील मोमीन मार्केटमधील (Momin Market Nagpur) असल्याचा दावा संपूर्णपणे चुकीचा आहे. व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधील लाहौर शहरातील इछरा मार्केटमधील आहे.
हे ही वाचा- मुस्लीम नावांनी बुक असलेले बेड रिकामेच आढळल्याचे ‘बेड जिहाद’चे दावे फेक!
[…] […]