सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये रस्त्यावरून एक मगर (crocodile) जाताना दिसतेय. या मगरीच्या मागे अनेक गावकरी देखील दिसताहेत. हे गावकरी देखील मगरीच्या मागोमाग चालताहेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ पूरग्रस्त चिपळूणमधील (chiplun) आहे.
पडताळणी:
आम्ही सोशल मीडियावरील व्हायरल दाव्याची पडताळणी सुरु केली असता चिपळूणमधील (chiplun) वेगवेगळ्या गावांमध्ये मगरी (crocodile)अढळल्याच्या वेगवेगळ्या बातम्या आम्हाला मिळाल्या. मात्र बहुतेक बातम्या जुन्या होत्या आणि या बातम्यांतील व्हिडीओज देखील वेगळे होते.
सोशल मीडियावरील सध्या चिपळूणच्या नावे व्हायरल होत असलेल्या मगरीचा व्हिडीओ मात्र आम्हाला चिपळूणच्या संदर्भाने कुठेही सापडला नाही. त्यामुळे आम्ही व्हिडीओ नेमका कुठला आहे हे शोधण्यासाठी रिव्हर्स सर्चची मदत घेतली. व्हिडीओच्या किफ्रेम्स घेऊन त्या आम्ही रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधल्या.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ आम्हाला ‘द ज्यूज मिनिट’च्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर १ जुलै २०२१ रोजी अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. या व्हिडीओनुसार सदर घटना कर्नाटकातील दांडेली जवळील कोगिलबना गावातील आहे. हे गाव दांडेली अभ्यारण्याजवळ वसलेले असून दांडेली अभ्यारण्यात (Dandeli Wildlife Sanctuary) अनेक प्राण्यांचा अधिवास असतो.
रिपोर्टनुसार ही मगर काली नदीतून गावात आली असल्याचे मानले जाते. मगरीने कुठल्याही गावकऱ्याला इजा पोहोचविली नाही. मगर साधारणतः अर्धा तास गावात भटकल्यानंतर गावकऱ्यांनी याविषयी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. वनाधिकाऱ्यांना मगरीला जवळच्या नदीमध्ये सोडण्यास जवळपास ४५ मिनिटे लागली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर चिपळूणमधील मगरीचा म्हणून शेअर केला जात असलेला व्हिडीओ कर्नाटकातील कोगिलबना गावातील आहे. चिपळूण भागात मगरी अढळल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या असल्या तरीही सध्याच्या व्हायरल व्हिडिओचा चिपळूणशी काहीही संबंध नाही.
हेही वाचा- ना ‘तो’ व्हायरल व्हिडीओ गौताळा घाटातला, ना त्यातील व्यक्तींवर वाघाचा हल्ला झालाय!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment