राजस्थानमधील जालौर जिल्ह्यात इंद्र मेघवाल (Indra Meghwal) या दलित विद्यार्थ्याला एका खासगी शाळेतील शिक्षकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. इंद्र मेघवाल या दलित मुलाने सवर्ण जातीसाठी राखीव असलेल्या माठातले पाणी प्यायल्याने छेल सिंह या सवर्ण शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत इंद्र मेघवालचा मृत्यू झाला.
आता सोशल मीडियावर एका लहान मुलाला केल्या जात असलेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ जालौर येथील घटनेचा असल्याचे सांगितले जातेय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या आधारे शोधल्या असता ‘ईटीव्ही भारत’च्या वेबसाईटवर 3 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार हा व्हिडीओ बिहारमधील पटना जिल्ह्यातील धनरुआ पोलीस स्टेशन परिसरातील वीर ओरियारा येथील जया पब्लिक स्कूलमधील घटनेचा आहे.
जया पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक विकास कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओत लहानग्या मुलास बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव छोटू असून त्याला रक्तदाबाचा त्रास होता. मारहाण करणाऱ्या शिक्षकाला संस्थेतून काढून टाकण्यात आले आहे. घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर ग्रामस्थांकडून या शिक्षकाला देखील मारहाण करण्यात आली होती.
दैनिक भास्करने देखील या घटनेची बातमी दिली होती. दैनिक भास्करशी बोलताना पटनाचे फिजिशियन डॉक्टर राणा एसपी सिंह यांनी सांगितले की, रक्तदाब वाढल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला राग येतो तेव्हा त्याचे हात पाय थरथर कापायला लागतात. त्यामुळे रक्तदाब वाढलेल्या व्यक्तीकडून कोणालाही मारहाण केली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बहुसंख्य नोकरदारांना रक्तदाबाची समस्या असते, पण अशा घटना घडत नाहीत. या प्रकरणात शिक्षकाची मनमानी दिसून येतेय. त्यासाठी रक्तदाबाचे कारण दिले जात असेल तर ते चुकीचे आहे.
पटनाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी दिलेल्या माहितीनुसार व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या मुलाने शिक्षकाला वर्गातील एका विद्यार्थिनीसोबत आक्षेपार्ह चाळे करताना पाहिले होते. त्यानंतर संतापलेल्या शिक्षकाने मुलाने गृहपाठ पूर्ण न केल्याचे कारण देत त्याला बेदम मारहाण केली होती. घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला होता. मात्र त्याला नालंदामधील तेल्हारा येथून अटक करण्यात आली आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा नाही. हा व्हिडीओ बिहारमधील खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकाकडून विद्यार्थ्याला केल्या गेलेल्या मारहाणीचा आहे.
हेही वाचा- पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment