मुंबईच्या ‘केईएम’हॉस्पिटल (kem hospital) मधील जिवंत रुग्णाचा व्हेंटीलेटर काढून मृत घोषित केल्याचे सांगणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या ‘केईएम’ रुग्णालयात एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित केल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला. डॉक्टर आणि मेडिकल कर्मचाऱ्याना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतोय.
फेसबुकवरील ‘महाराष्ट्र सैनिक’ पेजने सदर व्हिडीओ लाईव्ह स्ट्रीम करून शेअर केलाय. यावर बातमी करेपर्यंत तब्बल ९९ हजार लोकांनी रीऍक्ट केलंय, १५ हजार कमेंट्स आणि ६० लाख व्ह्युव्ज आहेत.
ट्विटर युजर निखील पाटील यांनी युट्युबवर अपलोड व्हिडीओची लिंक शेअर करत त्यावर आपलं मत व्यक्त केलंय.
“‘केईएम’ हॉस्पिटल में एक मेरीटवाले डॉक्टरने जिंदा पेशंटको डेथ डीक्लेर कर दिया. ऐसे होते है मेरीटवाले डॉक्टर. और दोष आरक्षण वालो को देते है. आप खुद व्हिडीओ देख लो”
पडताळणी:
व्हायरल व्हिडीओ निदर्शनास आल्यानंतर ‘चेकपोस्ट मराठी’ने याविषयी पडताळणीस सुरुवात केली. या संबंधी ‘मार्ड’ म्हणजेच ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर’ आणि ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ दोहोंकडून अधिकृत पत्रके जारी करण्यात आली आहेत.
‘मार्ड’ने जारी केलेल्या पत्रकातील मजकूर थोडक्यात:
रुग्णाच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जमावाने कर्तव्यावर असणाऱ्या महिला डॉक्टरवर बळजबरी करत ‘व्हेंटीलेटर’ सुरू करण्यासाठी दबाव आणला. त्यानंतर डॉक्टरने व्हेंटिलेटर चालू केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत असून व्हेंटिलेटरवरील लाईन ‘फ्लॅट’ नसल्याचेही दिसत आहे.
सदर यंत्र हे ‘ईसीजी मशिन’ नसून कृत्रिम श्वासोच्छवास देण्यासाठी वापरण्यात येणारे ‘व्हेंटिलेटर मशीन’ आहे. त्यामुळे त्याच्यावर दिसणा-या आलेखीय रेषा या मशीनद्वारे देण्यात येणारा कृत्रिम श्वासोच्छ्वास दर्शविणाऱ्या असून हृदयाशी किंवा रुग्णाच्या श्वासोच्छवासाची संबंधित नाहीत.
महिला डॉक्टरला शिवीगाळ करून विनयभंग केल्याप्रकरणी आणि असा व्हिडीओ व्हायरल करून जनमाणसात संभ्रम निर्माण केला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा ‘मार्ड’ला कामबंद आंदोलनाशिवाय गत्यंतर उरणार नाही.
‘केईएम’ हॉस्पिटल डॉक्टरांचे आंदोलन:
सदर घटनेतील हल्ला, शिवीगाळ आणि गैरवर्तनाबद्दल संबंधित व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी ‘केईएम’ हॉस्पिटलच्या (kem hospital) डॉक्टरांनी आंदोलन केल्याची माहिती आणि फोटोज NDTVच्या पत्रकार पूजा भारद्वाज यांनी ट्विट करून केले आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकातील मजकूर:
व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सदर रेषा (लाईन) ही कृत्रिम श्वासोच्छ्वासाची लाईन आहे. ज्याचा कोणत्याही अर्थाने पेशंट जिवंत आहे, असा अर्थ होत नाही.
‘जमावाने अतिशय निर्दयीपणे त्या विद्यार्थी महिला डॉक्टरला अतिशय आक्षेपार्ह व निषेधार्ह भाषेत अर्वाच्च शिव्यांची लाखोली वाहिल्याचे व तिच्या अंगावर धावून गेल्याचेही व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
सरकारी कामकाजात अडथळा आणणे, रुग्णसेवेत बाधा आणणे, शिवीगाळ करणे आणि के.ई.एम. रुग्णालयाची हेतुतः बदनामी करणे; या बाबींच्या अनुषंगाने नजीकच्या पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध ‘एफ. आय. आर.’ दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.’ असे पत्रकात नमूद केले आहे.
‘ब्रेन डेड’ कंडीशन आणि हृदयाचे ठोके:
‘बेटरहेल्थ’या ओस्ट्रेलियन गव्हर्नमेंटच्या आरोग्यविषयक माहिती देणाऱ्या ब्लॉगवर आम्हाला काही माहिती सापडली जी व्हायरल व्हिडीओत केल्या जाणाऱ्या आरोपाविषयी अधिक महत्वपूर्ण माहिती देतेय. पहा काय आहे माहिती-
‘लाइफ सपोर्ट मशीन्समुळे व्यक्तीचा श्वासोच्छ्वास आणि हृदयाची गती राखली जाते, त्यामुळे स्पर्श केल्यावर रुग्णाचे शरीर गरम भासते. यामुळे अद्याप ती व्यक्ती जिवंत असल्याचा भ्रम निर्माण होतो. परंतु ती व्यक्ती ‘ब्रेन डेड’ झालेली असते. अशावेळी मेडिकल स्टाफने नातेवाईकांना ‘ब्रेन डेथ’ म्हणजे त्या व्यक्तीचा शेवट असतो. हे व्यवस्थित समजावून सांगायला हवे.’
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे समोर आले की ८ सप्टेंबर रोजी ‘केईएम’ हॉस्पिटलमध्ये (kem hospital) घडलेल्या घटनेच्या व्हायरल व्हिडीओमधील दावे चुकीचे आहेत. त्यातील रुग्णाचा आधीच मृत्यू झाला होता.
स्क्रीनवर दिसणारा हृद्यांच्या ठोक्याचा ग्राफ ‘व्हेंटीलेटर’ म्हणजेच कृत्रिम श्वासोच्छवासामुळे दिसत होता. हृदयाची धडधड सुद्धा कृत्रिम पंपिंगमुळे जाणवत होती आणि हृदयाची गती राखण्यासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रणेमुळे मृताचे अंग शरीर थंड पडण्याऐवजी गरम भासत होते.
अशा व्हायरल दाव्यांवर विश्वास ठेऊन रुग्णालय आणि उपचार पद्धतीबद्दल संभ्रम निर्माण होऊन लोक दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू ओढवून घेत आहेत. त्यामुळे असे व्हिडीओज फॉरवर्ड करण्याआधी कृपया वैयक्तिक पातळीवर तपासून पहावा किंवा ‘चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या व्हॉट्सऍप क्रमांकावर संपर्क साधावा.
हेही वाचा: गरम पाण्याची वाफ घेतल्याने कोरोना बरा होत नाही, सोशल मीडियावरील दावा चुकीचा!
[…] […]