Press "Enter" to skip to content

हिजाब विवाद: पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या बुरखाधारी दहशतवाद्यांना रंगेहात पकडण्यात आले?

सोशल मीडियावर 27 सेकंदांचा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी एका बुरखाधारी व्यक्तीची झडती घेताना दिसताहेत. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जातोय की आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या बुरखा-हिजाब घातलेल्या दहशतवाद्यांना रंगेहात पकडण्यात आले. कर्नाटकातल्या हिजाब वादाच्या संदर्भाने हा व्हिडीओ शेअर केला जातोय.

Advertisement

अर्काइव्ह

फेसबुकवर देखील हा व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हॉटस्अपवरही हे दावे व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अमीन खान, शशिकांत कोचिकर आणि सुनीत अनगळ यांनी निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.

Source: whatsapp

पडताळणी:

व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स घेऊन गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोध घेतला असता आम्हाला ईटीव्ही आंध्र प्रदेशच्या युट्यूब चॅनेलवर 7 ऑगस्ट 2020 रोजी अपलोड करण्यात आलेली एक बातमी मिळाली. बातमीनुसार सदर घटना आंध्रप्रदेश मधील कुर्नूल येथील असून पोलिसांनी अवैधरित्या दारू घेऊन जात असणाऱ्या बुरखाधारी इसमांना ताब्यात घेतले होते.

बातमीमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील तस्कर तेलंगणातून दारू खरेदी करत होते आणि तेथून कमी किमतीत खरेदी केलेली दारू आंध्र प्रदेशात जादा दराने विकत होते.

यापूर्वी देखील हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल झाला होता. त्यावेळी कुर्नुलचे एसपी डॉ. फकीरप्पा कागिनेल्ली यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात स्पष्टीकरण दिले होते. आपल्या 16 ऑगस्ट 2020 रोजीच्या ट्विटमध्ये डॉ. फकीरप्पा कागिनेल्ली सांगतात की व्हिडिओत दिसणाऱ्या बुरखाधारी व्यक्तीला पोलिसांनी तेलंगणातून आंध्र प्रदेशातील कुर्नुलमध्ये अवैधरित्या दारू घेऊन जाताना पकडले आहे. सदरील घटना 7 ऑगस्ट रोजीची असून चुकीची माहिती न पसरविण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओचा कर्नाटकातील हिजाब विवादाशी काहीही संबंध नाही. शिवाय व्हायरल व्हिडीओ ऑगस्ट 2020 मधील आहे. व्हायरल व्हिडिओसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत.

हेही वाचा- हिजाब विवाद: धर्म रक्षणासाठी कर्नाटकातील हिंदू मुले उतरली रस्त्यावर?

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा