सोशल मीडियावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन फोटोज व्हायरल होताहेत. पहिल्या फोटोत उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे फुलदाणीत ठेवलेली फुले आणि राष्ट्रध्वज तिरंगा दिसतोय, तर दुसऱ्या फोटोमध्ये तिरंग्यासह भगवा ध्वज, शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो देखील बघायला मिळतोय.
फोटो शेअर करताना दावा केला जातोय की उद्धव ठाकरेंनी इतके दिवस शिवाजी महाराज, भगवा झेंडा आणि बाळासाहेब ठाकरेंना अडगळीत टाकले होते. आता सरकार वाचविण्याचे संकट निर्माण झाल्यानंतर त्यांना भगवा, महाराज आणि बाळासाहेबांची आठवण झाली आहे.
पोस्ट कार्ड न्यूजच्या ट्विटर हॅण्डलवरून देखील हा फोटो ट्विट करण्यात आलाय. यामध्ये देखील अशाच प्रकारचा दावा करण्यात आलाय की पूर्वी उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नसायचा.
हेच दावे व्हॉट्सऍपवरूनही व्हायरल होत असल्याचे ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक धनराज बावस्कर यांनी निदर्शनास आणून दिले.
पडताळणी:
सर्वप्रथम तर आम्ही मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला भेट देऊन मागील काही दिवसांमधील ट्विट्स बघितले. आम्हाला मुख्यमंत्री 17 जून 2022 रोजीचे ट्विट बघायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, नाशिक उपकेंद्राचे भूमिपूजन केल्याची माहिती देणाऱ्या या ट्विटमधील फोटोमध्ये आपणास उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे डावीकडच्या बाजूस भगवा, शिवाजी महाराज आणि तिरंगा हा राष्ट्रध्वज आणि उजवीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बघायला मिळतोय.
याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाची बातमी समोर आली ती 21 जून रोजी. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे शिवाजी महाराज, भगवा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असायचा.
त्यानंतर आम्ही अजून जुने ट्विट्स चाळले असता आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेले 1 जून रोजीचे ट्विट बघायला मिळाले. या ट्विटमध्ये चार वेगवेगळे फोटोज बघायला मिळतात. त्यातील पहिल्याच फोटोमध्ये देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे भगवा, शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येतोय.
मुख्यमंत्र्यांचा पहिला फोटो हा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून घेण्यात आलेला आहे. मात्र त्या फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्र्यांचे बॅकग्राउंड वेगळे असल्याने त्यामध्ये भगवा, शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बघायला मिळत नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन वेगवेगळ्या फोटोजच्या तुलनेचा आधारे केले जाणारे दावे चुकीचे आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अडचणीत आलेले सरकार वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या फेसबुक लाईव्हच्या पाठीमागे भगवा, शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो जोडलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वीही मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्यांच्या पाठीमागे भगवा, महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंचा फोटो बघायला मिळत होता.
हेही वाचा- शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बेदम हाणामारी? जाणून घ्या व्हायरल व्हिडिओचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment