Press "Enter" to skip to content

शेतकऱ्यांवरील लाठीमाराचा फोटो म्हणजे ‘प्रोपोगंडा’ असल्याचा भाजप आयटीसेल प्रमुखाचा चुकीचा दावा!

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी 28 नोव्हेंबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेतकरी आंदोलना दरम्यानचा एक फोटो शेअर केला. फोटोमध्ये सुरक्षा दलाच्या जवानाकडून आंदोलक शेतकऱ्यावर लाठीमार (farmer beaten by police) केला जात असल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

Advertisement

‘जय जवान जय किसान’चा नारा असलेल्या या देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या अहंकाराने देशाच्या सैनिकाला शेतकऱ्याच्या विरोधात उभं केलंय. हे खूपच वाईट आहे, असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हण्टलं होतं.

राहुल गांधी यांच्या या ट्विटच्या प्रत्युत्तरात भाजप आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी 15 सेकंदाचा एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओला त्यांनी ‘दुष्प्रचार’ विरुद्ध ‘वास्तव’ असं म्हटलंय.

व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केलेला फोटो हा दुष्प्रचार किंवा प्रोपोगंडा असल्याचं म्हंटलं गेलंय, तर त्या बाजूलाच सुरक्षा दलाच्या जवानाकडून उगारण्यात आलेल्या लाठीचा आंदोलक शेतकऱ्याला स्पर्श देखील झाला नाही, असा दावा देखील मालवीय यांच्याकडून केला गेलाय.

उजव्या विचारधारेशी संबंधित ‘ऑप इंडिया’ पोर्टलने याच व्हिडिओच्या आधारे राहुल गांधींनी ट्विट केलेला फोटो ‘काँग्रेसी प्रोपोगंडा’ असल्याचं देखील जाहीर करून टाकलं.

पडताळणी:

अमित मालवीय यांनी अवघ्या काही सेकंदाच्या व्हिडिओच्या आधारे सुरक्षा दलाच्या जवानाकडून उगारण्यात आलेल्या लाठीचा आंदोलक शेतकऱ्याला स्पर्श देखील झाला नाही. काठी शेतकऱ्याला लागलीच नाही असा दावा केलाय. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम या घटनेचा मूळ व्हिडीओ शोधण्याचा प्रयत्न केला.

आम्हाला EURO News या वेबसाइटवर लाठीमाराच्या घटनेचा (farmer beaten by police) संपूर्ण व्हिडीओ बघायला मिळाला. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघायला मिळालं की आंदोलक शेतकऱ्यावर लाठीमार करण्यात आला होता. शिवाय एक नव्हे, तर तीन-तीन जवानांकडून लाठीमार झाला होता. हा लाठीहल्ला चुकवत आंदोलक शेतकरी धावताना दिसत आहेत.

VOA न्यूज या युट्यूब चॅनेलवर देखील या लाठीमाराच्या घटनेचा व्हिडीओ उपलब्ध आहे. सुरक्षा दलाच्या जवानांकडून इतर आंदोलकांवर देखील लाठीमार करण्यात आला असल्याचं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.

सरळच आहे की भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मूळ व्हिडिओशी छेडछाड करून चुकीचा दावा केलाय. या गोष्टीची दखल ट्विटरने देखील घेतली आणि मालवीय यांच्या ट्विटला ‘Manipulated Media’ म्हणजेच साधारणतः ‘तथ्यांशी छेडछाड करण्यात आलेली क्लिप’ असं म्हटलंय. विशेष म्हणजे ट्विटरने भारतात प्रथमच एखाद्या ट्विटच्या संदर्भात अशा प्रकारची सूचना दिली आहे.

Source: Twitter

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झालं आहे की ‘दिल्ली चलो’ आंदोलन दरम्यान शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीमाराचा फोटो म्हणजे ‘प्रोपोगंडा’ असल्याचा भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचा दावा निखालस खोटा आहे.

शेतकऱ्यांवर लाठीमार झालाच नाही. लाठीचा शेतकऱ्याला स्पर्श देखील झाला नाही, हे सांगण्यासाठी अमित मालवीय यांनी घटनेच्या मूळ व्हिडीओशी छेडछाड केली असल्याचं स्पष्ट झालं असून ट्विटरने देखील त्यांच्या ट्विटबाबतीत हे ट्विट तथ्यांना धरून नसल्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा- मुस्लीम व्यक्ती शीख बनून शेतकरी आंदोलनात सामील झाले? वाचा व्हायरल फोटोजचे सत्य!

More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा