सोशल मीडियावर भारत समाचार या वृत्तवाहिनीच्या न्यूज बुलेटिनचा स्क्रिनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या स्क्रिनशॉटनुसार तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी एक अब्ज रुपये देणगी (tirupati balaji donation for ram mandir) देण्याची घोषणा केल्याचा दावा केला जातोय.
सोमण लालसरे या फेसबुक युजरने हा स्क्रिनशॉट शेअर केलाय. कॅप्शनमध्ये ते म्हणतात, “#श्रीराम_मंदिर_अयोध्या निर्माण करण्यासाठी #तिरुपती_बालाजी देणार १ अरब रुपये व पटना येथील #महावीर_मंदिर १०_करोड रुपये👍 #जय_श्रीराम”
बाबुराव आपटे या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या स्क्रिनशॉटच्या कॅप्शनमध्ये शिर्डी संस्थानाने साईराम नावाचा वापर करून अरबो-खरबो रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमावल्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच संस्थानाने राम मंदिरासाठी किती रुपये दिले, असा सवाल करण्यात आलाय.
पडताळणी:
सर्वप्रथम तर ‘भारत समाचार’ने खरंच अशी बातमी दिली आहे का याचा शोध आम्ही घेतला, त्यावेळी आम्हाला ‘भारत समाचार’च्या ट्विटर हँडलवर या बातमीचा व्हिडीओ मिळाला.
त्यात दावा करण्यात आला आहे की तिरुपती बालाजी मंदिराकडून राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगीच्या स्वरूपात (tirupati balaji donation for ram mandir) एक अब्ज रुपये दिले जाणार आहेत. ही बातमी ११ नोव्हेंबर २०१९ रोजी म्हणजेच साधारणतः वर्षभरापूर्वी देण्यात आली होती.
त्यानंतर अधिक शोधाशोध केली असता आम्हाला ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या वेबसाईटवर राम मंदिराच्या निर्मितीसाठीच्या देणगी मोहिमेसंदर्भातील १५ जानेवारी २०२१ रोजी प्रसिद्ध बातमी मिळाली.
बातमीनुसार राम मंदिराच्या निर्मितीसाठीची पहिली देणगी राष्ट्रपतींकडून देण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून सर्वात अगोदर ५ लाख एक रुपयांचा निधी समर्पित करत या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.
याच बातमीत आम्हाला राम मंदिरासाठी देणगी दिलेल्या इतरांची देखील माहिती मिळाली. मात्र त्यात कुठेही तिरुपती बालाजी मंदिराचा देणगीदारांमध्ये समावेश नाही. शिवाय मोहिमेची सुरुवातच राष्ट्रपतींच्या देणगीने झाली असल्याने तिरुपती मंदिराने यापूर्वीच देणगी दिली असण्याची शक्यता देखील मोडीत निघाली.
पडताळणीच्या शेवटच्या टप्प्यात आम्हाला ‘बूम लाईव्ह’च्या वेबसाईटवर एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य बिमलेंद्र मोहन प्रताप मिश्रा यांनी बूमशी बोलताना तिरुपती बालाजी मंदिराकडून राम मंदिराच्या निर्मितीसाठी एक अब्ज रुपये मिळाल्याचे दावे फेक असल्याचं सांगितलं आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की तिरुपती बालाजी मंदिर प्रशासनाने राम मंदिरासाठी एक अब्ज रुपये देणगी दिल्याचे दावे चुकीचे आहेत. रामजन्मभूमी ट्रस्टकडून हे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत.
हे ही वाचा- शिर्डी साई संस्थानाने राम मंदिराच्या निर्मितीसाठी देणगी देण्यास नकार दिलाय का?
[…] […]
[…] […]