Press "Enter" to skip to content

‘टाईम मासिका’ने योगी सरकारचे कौतुक केल्याचा दावा करत भारतीय माध्यमांकडून फेक बातम्या!

सोशल मीडियावर दावा केला जातोय की जगप्रसिद्ध ‘टाईम’ मासिकाने ३ पानी लेख लिहून योगी आदित्यनाथ (TIME Magazine yogi adityanath) यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना  काळातील कामगिरीचे कौतुक केले आहे. योगी आदित्यनाथ यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे उत्तर प्रदेशात कोरोनाचा फारसा प्रभाव बघायला मिळाला नाही.

उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ‘टाईम मासिका’तील ‘कथित’ लेखाचे फोटो शेअर करताना योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. 

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

योगी आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील एका वृत्तपत्राच्या कात्रणाचा फोटो ट्विट करण्यात आलाय. ‘टाईम’ मासिकाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना (TIME Magazine yogi adityanath) गोरगरिबांचे तारणहार घोषित केल्याचा दावा यामध्ये करण्यात आलाय. 

अर्काइव्ह पोस्ट

भाजपशी संबंधित अनेकांसह मुख्य प्रवाहातील ‘झी न्यूज’ ‘पत्रिका’ आणि ‘न्यूज १८’ सारख्या माध्यमांनी देखील यासंदर्भात सविस्तर बातमी प्रसिद्ध केली आहे.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

टाईम मासिकाने योगी आदित्यनाथ यांच्या (TIME Magazine yogi adityanath) कामाची घेतलेली दखल म्हणून जो ‘कथित’ लेख शेअर केला जातोय, ती खरं तर उत्तर प्रदेश सरकारने ‘टाईम’ मासिकाला दिलेली जाहिरात आहे. टाईम मासिकाने तसं स्पष्ट देखील केलेलं आहे. जाहिरातीच्या वरच्या बाजूला अगदी सुस्पष्ट शब्दात ‘कन्टेन्ट फ्रॉम उत्तर प्रदेश’ असा उल्लेख करण्यात आलेला आहे. 

टाईम मासिकाचा लेख म्हणून व्हायरल लेख नेमका कुणी लिहिला याचा देखील उल्लेख नाही. ना मासिकाच्या लेखांच्या सूचित त्याचा उल्लेख आहे. ही गोष्ट देखील संबंधित मजकूर हा ‘टाईम’चा अधिकृत लेख नसून ती एक जाहिरात आहे, हे स्पष्ट करणारी आहे.

 ‘एड्व्हर्टोरिअल’ म्हणजे काय आणि ते का दिलं जातं?

वृत्तपत्रांच्या दुनियेत अशा प्रकारच्या जाहिरातींना ‘एड्व्हर्टोरिअल’ असं म्हणतात. ‘एड्व्हर्टोरिअल’ म्हणजे अशा प्रकारची ‘जाहिरात’ जी लेखाच्या स्वरूपात प्राकाशित अथवा प्रदर्शित केली जाते. इंग्रजीमधील ‘एडव्हर्टाइज’ (जाहिरात) आणि ‘एडिटोरिअल’ (संपादकीय अथवा अग्रलेख) हे दोन शब्द एकत्र येऊन बनलेला प्रकार म्हणजे ‘एड्व्हर्टोरिअल’

‘एड्व्हर्टोरिअल’ हे लेखाच्या स्वरूपात जरी प्रकाशित करण्यात येत असलं, तरी ती असते जाहिरातच. सहाजिकच त्यासाठी जाहिरातीसाठीचे म्हणून वृत्तपत्राचे अथवा वृत्तवाहिनीचे जे दर असतात त्यानुसार शुल्क आकारले जाते. योगी आदित्यनाथ यांच्या टाईम मासिकाकडून करण्यात आलेल्या ‘कथित’ कौतुकाच्या बाबतीत देखील हाच प्रकार झाला आहे.

एड्व्हर्टोरिअल’चा मूळ उद्देशचं एखादा मजकूर हा ‘जाहिरात’ न वाटता ‘लेख’ वाटावा आणि त्याची ‘विश्वासार्हता’ वाढावी हा असतो.

एखाद्या राजकीय पक्षाने स्वतःच्या कामगिरीची जाहिरात करणं वेगळं आणि एखाद्या स्वातंत्र्य माध्यम समूहाने त्या कामाची दखल घेऊन त्यावर वार्तांकन करणं वेगळं. तुलनात्मकदृष्ट्या दुसऱ्या प्रकाराची विश्वासार्हता अधिक असते. त्यामुळे बऱ्याच वेळा जाहिराती या लेखाच्या स्वरूपात देऊन आपल्या उत्पादनामध्ये लोकांचा विश्वास वाढावा यासाठी प्रयत्न केले जातात.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की ‘टाईम मासिका’ने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीचे कौतुक केलेले नाही.

उत्तर प्रदेश सरकारकडून टाईम मासिकाला जाहिरात देण्यात आली आणि उत्तर प्रदेश सरकार, भाजपचे नेते आणि काही माध्यमांनी ही जाहिरात म्हणजे जगप्रसिद्ध टाईम मासिकाने योगी आदित्यनाथ यांचं केलेलं कौतुक असल्याचा दुष्प्रचार केला.

हे ही वाचा- नरेंद्र मोदींची स्तुती करणारी ‘मॉर्गन स्टॅनली’च्या मुद्द्यांची व्हायरल पोस्ट फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा