सोशल मीडियावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांच्या तोडफोड करण्यात आलेल्या पुतळ्याचा फोटो व्हायरल होतोय. हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) गुजरातमधील घटनेचा असल्याचे सांगितले जातेय. काँग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो ट्विट केलाय.
पडताळणी:
किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता अनेक न्यूज वेबसाईट्सवर या घटनेसंबंधीच्या बातम्या बघायला मिळाल्या. या बातम्यांनुसार इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीचा हा फोटो राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील पिलानी भागातील कजारा गावातील घटनेचा आहे. कजारामध्ये 17 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली होती.
भास्करच्या बातमीनुसार या घटनेतील आरोपी तरुणाने सोशल मीडियावर चॅलेंज देत गावातील उद्यानातील माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केली. आरोपी तरुणाने शनिवारी रात्री 10 वाजता सोशल मीडियावर पोस्ट केली की पुढच्या पाच मिनिटांमध्ये इंदिरा गांधींचा पुतळा फोडला जाईल. हिम्मत असेल तर थांबवून दाखवा. त्यानंतर 15 मिनिटांनी त्याने पुतळ्याची तोडफोड केली. त्याला पोलिसांनी गुजरातमधील बडोदा येथून ताब्यात घेतले.
इंदिरा गांधी यांच्या काजरा येथील इंदिरा गांधी सार्वजनिक उद्यानातील पुतळ्याचे अनावरण 19 जून 1990 रोजी तत्कालीन जिल्हाप्रमुख ब्रिजेंद्र ओला यांच्या हस्ते करण्यात आले होते. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पुतळा राज्यातील इतरत्र स्थापन करण्यात आलेल्या इंदिरा गांधींच्या पुतळ्यांपैकी पहिला पुतळा आहे.
नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार आरोपी मुकेश गुर्जरने दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावरूनच या घटनेची जबाबदारी देखील स्वीकारली. मुकेश गुर्जर ट्रक ड्रायव्हर असून तो स्वतःची ओळख भाजप कार्यकर्ता अशी सांगतो. त्याने गावाच्या माजी सरपंचांना देखील धमकी दिली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील इंदिरा गांधींच्या तोडफोड झालेल्या पुतळ्याचा व्हायरल फोटो गुजरातमधील नसून राजस्थानमधील घटनेचा आहे. पुतळ्याच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी आरोपीस गुजरातमधून अटक केली असून आरोपी स्वतःची ओळख भाजप कार्यकर्ता अशी सांगतो.
हेही वाचा- शिवसैनकाने पार्श्वभागावर गोंदविला संजय राऊत यांचा टॅटू? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment