काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या ‘भारत जोडो’ यात्रेत आहेत. राहुल गांधींच्या यात्रेला जनतेचा चांगला प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय. या यात्रेदरम्यान राहुल गांधी पायीच चालणार असल्याचे सांगण्यात आले होते. अशातच आता सोशल मीडियावर राहुल गांधींचा एक फोटो व्हायरल होतोय.
सोशल मीडियावरील व्हायरल फोटोमध्ये राहुल गांधी बाईकवर बसलेले बघायला मिळताहेत. शिवाय त्यांची एका पोलीस अधिकाऱ्याशी झटापट होताना बघायला मिळतेय. दावा केला जातोय की हा फोटो ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानचा असून राहुल गांधी बाईकवरूनच ही यात्रा करताहेत.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला मध्य प्रदेश काँग्रेसचे नेते आमदार जीतू पटवारी (Jitu Patwari) यांच्या 19 जून 2017 रोजीच्या ट्विटमध्ये हा फोटो बघायला मिळाला. राहुल गांधी यांच्या जन्मदिनी त्यांना शुभेच्छा देताना जीतू पटवारी यांनी हा फोटो ट्विट केला होता. शिवाय शेतकऱ्यांसाठी लढत राहणार असल्याची त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले होते.
मिळालेल्या माहितीच्या अधिक शोध घेतला असता दैनिक भास्करच्या वेबसाईटवर 2017 मध्ये प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. भास्करच्या बातमीनुसार राहुल गांधी जून 2017 मध्ये मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. राजस्थान सीमेवरील पहिले गाव असलेल्या निंबाहेरापूर्वी दोन किमी अंतरावर असलेल्या मड्डा चौरस्त्यावर राहुल गांधी यांनी आपली कार सोडली आणि ते बाईकवरून पुढे गेले.
भिलवाड्याचे आमदार धीरज गुर्जर (Dhiraj Gurjar) यांनी त्यांना बाईकवर बसवले आणि राहुल गांधी मध्य प्रदेशकडे रवाना झाले. नंबर नसलेल्या या बाईकवर श्रीराम लिहिलेले होते. वाटेत राहुल गांधी राऊचे आमदार जितू पटवारी यांच्या मोटार सायकलवर बसले आणि राजस्थान-मध्य प्रदेशच्या सीमेवरील बंगेरा पोस्टवर पोहोचले. याठिकाणी राहुल गांधी आणि सहकाऱ्यांना पोलिसांकडून थांबविण्यात आले पण राहुल पायीच पुढे गेले.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की राहुल गांधींचा बाईकवरील व्हायरल फोटो ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यानचा नसून जवळपास पाच वर्षांपूर्वीचा आहे. व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत.
हेही वाचा- भारत जोडो यात्रा: राहुल गांधींनी विवेकानंदांना अभिवादन न केल्याचा स्मृती इराणी यांचा दावा चुकीचा!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]