सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद (Mohammed Bin Zayed) यांचा फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये मोहम्मद बिन झायेद हे भगव्या कपड्यामध्ये दिसताहेत.
अनेक युजर्सकडून हा फोटो शेअर करताना दावा केला जातोय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः टोपी तर नाहीच घातली पण मोहम्मद बिन झायेद यांना भगवे कपडे घालायला भाग पाडले.
सोशल मीडियावर ‘बंदा खुद टोपी नही पहनता, लेकिन शेखों को भगवा पहनाकर आता है’ अशा कॅप्शनसह हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक प्रवीण सागर यांनी सदर व्हायरल दावे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
व्हायरल फोटो रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधली असता आम्हाला ‘गल्फ न्यूज’ची बातमी मिळाली. या बातमीमध्ये हाच फोटो वापरण्यात आला होता मात्र या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीत अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद हे त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत दिसताहेत. त्यात ते भगव्या कपड्यांमध्ये नाहीत.
फोटोच्या कॅप्शननुसार भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) संबंध दृढ करण्यात दिलेल्या योगदानाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यूएईचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायेद’ प्रदान करण्यात आला.
क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देखील हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. मोदींना ‘ऑर्डर ऑफ जायद’ प्रदान करण्याप्रसंगी मोदींच्या उपस्थितीत महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त विशेष स्मारक तिकिटाचे प्रकाशन करण्यात आल्याची माहिती देखील जायद यांनी दिली होती.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांना भगवे कपडे घालायला भाग पाडल्याचा दावा करणारा फोटो एडिटेड आहे.
पंतप्रधान मोदींसमवेतच्या भेटीत अबूधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद यांनी भगवे कपडे परिधान केले नव्हते, तर ते त्यांच्या पारंपरिक वेशभूषेतच होते. मोदींना युएईचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आल्या प्रसंगीचा फोटो एडिट करून तो चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जातोय.
हेही वाचा- मराठ्यांना आणि रा.स्व.संघाला तालिबानी घाबरून असल्याचे सांगत व्हायरल होतोय पाकिस्तानचा व्हिडीओ!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment