सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. व्हिडीओसोबत दावा केला जातोय की गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी २७ वर्षांनंतर आपल्या शाळेतील शिक्षिका मौली अब्राहम (sundar pichai molly abraham) यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचा सन्मान केला.
गुगलचे सीईओ आपल्या शिक्षिकेला भेटून आपल्याला घडवल्याबद्दल धन्यवाद देत असल्याचा दावा या ६ मिनिटांच्या व्हिडिओ सोबत केला जातोय.
फेसबुक युजर प्रसाद भावे यांनी व्हिडीओ शेअर करताना काय मजकूर लिहिलाय पहा-
“जेंव्हा जगाचा गुरू आपल्या गुरूला भेटला…
सुंदर पिचाई हा Google चा मुख्य कार्यकारी अधिकारी CEO म्हणून काम करतोय. आधुनिक काळात Google हा जगद्गुरू समजला जातो कारण असे बोटावर मोजण्याइतकेच प्रश्न असतील ज्याची उत्तरे गुगल देऊ शकत नसेल. अशा प्रचंड ज्ञानरथाचा सारथी म्हणून काम करणारा सुंदर पिचाई त्याची शाळेतील शिक्षिका मौली अब्राहमला 27 वर्षांनंतर तिच्या घरी जाऊन भेटतो आणि म्हणतो, मी आज जो काही आहे ते तुमच्यामुळेच एका शिक्षकासाठी यापेक्षा मोठी भेट ती कोणती? आपल्या शिक्षकाच्या भेटीचा प्रवास सुंदर पिचाई याने आपल्या कॅमेर्यात कैद केला….
आठवणींचा सर्वात अमुल्य खजिना म्हणून! पहा या व्हिडिओत”
इतरही अनेक युजर्सकडून हा व्हिडीओ याच कॉपी पेस्ट कॅप्शनसह शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचा चेहरा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याशी मिळता जुळता असला, तरी ते सुंदर पिचाई नाहीत, हे अगदी सहजच ओळखायला येतं.
व्हिडीओच्या सुरुवातीलाच येणाऱ्या फ्रेममध्ये स्टेजवर बोलणारी व्यक्ती गणेश कोहली असल्याचे स्टिकर बघायला मिळते. त्यामुळे हा व्हिडीओ सुंदर पिचाई यांचा आहे, असं समजण्याचं कुठलंही कारणच उरत नाही.
व्हिडिओत दिसणारी व्यक्ती सुंदर पिचाई नसून गणेश कोहली आहेत, हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही हे गणेश कोहली नेमके कोण हे शोधायला सुरुवात केली. त्यांच्याबद्दलची माहिती शोधण्यासाठी गुगल सर्च केलं असता समजलं की गणेश कोहली हे उद्योजक, शिक्षक आणि सल्लागार आहेत. शिवाय ते २०१६ साली सुरु करण्यात आलेल्या IC3 मुव्हमेंट या संस्थेचे संस्थापक देखील आहेत.
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ IC3 मुव्हमेंटच्या युट्यूब चॅनेलवर १ सप्टेंबर २०१७ रोजी अपलोड करण्यात आलेला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल गणेश कोहली यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. ट्विट मध्ये कोहली म्हणतात, “माझ्या शिक्षिकेसोबतचा माझा ३ वर्षापूर्वीचा व्हिडीओ गेल्या महिनाभरापासून व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सुंदर पिचाई आणि सत्या नाडेला यांचा असल्याचं सांगितलं जातंय.”
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसणारी आणि २७ वर्षांच्यानंतर आपल्या शिक्षिकेला भेटायला जात असलेली व्यक्ती गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (sundar pichai molly abraham) नसून उद्योजक आणि सल्लागार गणेश कोहली आहेत.
गणेश कोहली यांना आपल्या शाळेतील शिक्षिकेला भेटायला जाताना ३ वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेला व्हिडीओ सध्या सुंदर पिचाईंच्या नावाने व्हायरल होतोय.
हे ही वाचा- पुणे रेल्वे स्टेशनचे प्लॅटफॉर्म तिकिट खाजगीकरणामुळे तब्बल ५० रुपये? काय आहे सत्य?
Be First to Comment