सोशल मीडियावर ‘बीबीसी’चा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अतिशय उंचावरून उडी मारताना दिसतेय. व्हिडिओसोबत दावा केला जातोय की ऑस्ट्रेलियन आंतराळविराचा हा व्हिडीओ असून त्याने अंतराळ यानातून पृथ्वीवर उडी टाकत पृथ्वीला फिरताना स्पष्ट पाहिले.
अॉस्ट्रेलियन अंतराळविराने स्पेस शिपपासून १२८००० फूट उंचीवरून उडी मारली आणि १२३६ किलोमीटरचा प्रवास करत ४ मिनिटे ५ सेकंदात पृथ्वीवर पोहोचला. त्याने पृथ्वीला स्पष्टपणे फिरताना पाहिले.*
*चकित करणारा व्हिडिओ नक्की बघा.*
सौजन्य : BBC
अशा कॅप्शनसह हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
पडताळणी:
- संपूर्ण व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता व्हिडिओच्या एका फ्रेममध्ये RED BULL STRATOS MISSION CONTROL, ROSWELL, NEW MEXICO असे लिहिलेले बघायला मिळते. याच किवर्डसची मदत घेऊन आम्ही संबंधित व्हिडीओविषयी गुगल सर्च केलं. आम्हाला ‘बीबीसी’च्या वेबसाईटवर १४ ऑक्टोबर २०१२ रोजी प्रसिद्ध बातमीमध्ये हा व्हिडीओ बघायला मिळाला.
ऑस्ट्रेलियन अंतराळविर नव्हे, ऑस्ट्रियन स्कायडायव्हर
- बीबीसीच्या बातमीनुसार व्हिडिओमध्ये उंचावरून उडी मारणारी व्यक्ती ऑस्ट्रेलियन अंतराळविर नसून ऑस्ट्रियन स्कायडायव्हर फेलिक्स बॉमगार्टनर (Felix Baumgartner) आहे.
- बॉमगार्टनरने दि. १४ ऑक्टोबर २०१२ रोजी १,२८,००० फूट किंवा ३९ किलोमीटर उंचीवरून जमिनीकडे झेपावत सर्वाधिक उंचावरून उडी मारण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला होता.
- त्यापूर्वीचा विक्रम साधारणतः ३१.३ किलोमीटरचा होता. हा विक्रम अमेरिकेच्या कर्नल जो किट्टिंगर (Colonel Joe Kittinger) यांच्या नावावर होता. किट्टिंगर यांनी १९६० साली हा विक्रम आपल्या नावे केला होता.
ध्वनीच्या वेगापेक्षा देखील अधिक वेगाने जमिनीच्या दिशेने
- अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील रॉसवेल येथे १,२८,००० फूट किंवा ३९ किलोमीटर उंचीवरून जमिनीवर झेपावलेल्या ४३ वर्षीय फेलिक्सला हे अंतर पार करायला ९ मिनिटे ३ सेकंदांचा वेळ लागला. यादरम्यान त्याचा वेग होता ताशी १३३० किलोमीटर. हा वेग ध्वनीच्या ताशी ११२५ किलोमीटर वेगापेक्षा देखील अधिक होता.
- स्ट्रॅटोस या प्रकल्पांतर्गत (stratos project) फेलिक्स बॉमगार्टनरने ही कामगिरी पार पाडली होती. रेड बुल या कंपनीने हा प्रकल्प प्रायोजित केला होता. रेड बुलच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून देखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आलेला आहे.
- स्पेसच्या वेबसाईटवरील बातमीनुसार फेलिक्स ज्या उंचीवरून जमिनीकडे झेपावला, त्या ठिकाणापासून अंतराळ १०० किलोमीटर दूर आहे. बॉमगार्टनरने अंतराळ यानातून नव्हे, तर कॅप्सूल नावाच्या बलूनमधून उडी मारली होती.
- बॉमगार्टनरने ऐतिहासिक कामगिरी नोंदवताना जो किट्टिंगर यांचा ५२ वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. बॉमगार्टनरचा विश्वविक्रम मात्र एलन यूस्टेस (Alan Eustace) यांनी अवघ्या दोनच वर्षात मोडला. यूस्टेस यांनी २४ ऑक्टोबर २०१४ रोजी १,३५,८९० फूट उंचीवरून जमिनीवर यशस्वीरीत्या झेप घेत नवीन विश्वविक्रमला गवसणी घातली.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओत अवकाशातून जमिनीवर झेपावत असलेली व्यक्ती ऑस्ट्रेलियन अंतराळवीर नसून ऑस्ट्रियन स्कायडायव्हर फेलिक्स बॉमगार्टनर आहे.
फेलीक्सने २०१२ साली सर्वाधिक उंचीवरून म्हणजेच समुद्र सपाटीपासून १,२८,००० फूट उंचीवरून जमिनीवर झेपावण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला होता. हा विश्वविक्रम २०१४ साली एलन यूस्टेस यांनी मोडला. यूस्टेस यांनी समुद्र सपाटीपासून १,३५,८९० फूट उंचीवरून जमिनीवर यशस्वीरीत्या झेप घेत नवीन विक्रमावर आपले नाव कोरले.
हे ही वाचा- ‘आयवरमेक्टीन’ कोरोनावर रामबाण उपाय सांगणारे व्हायरल मेसेज दिशाभूल करणारे!
[…] हेही वाचा- अवकाशातून पृथ्वीवर उडी मारणारा ऑस्ट्… […]