सोशल मीडियावर 45 सेकंदांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये भारतीय सैन्यातील जवान ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’च्या घोषणा देत शिखांचा ध्वज निशान साहिब फडकावत असल्याचे बघायला मिळतेय. दावा केला जातोय की भारतीय सैन्यातील शीख रेजीमेंटने भारत-चीन सीमेवर गुरुद्वारा उभारला असून निशान साहिब फडकावला आहे.
उत्तर प्रदेशातील भाजपचे आमदार सौरभ श्रीवास्तव यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ ट्विट केलाय.
याच व्हायरल व्हिडिओच्या आधारे पंजाब केसरीने बातमी प्रसिद्ध केलीये.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता शेर-ए-पंजाब रेडिओच्या वेबसाईटवर 25 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. बातमीनुसार व्हिडीओ लेहमधील गुरुद्वारा पाथर साहिब (Gurudwara Pathar Sahib) येथील आहे. गुरुद्वारा पाथर साहिब येथे 80 फूट उंच निशाण साहिब फडकवण्यात आला होता.
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव (Guru Nanak) यांच्या लडाख भेटीच्या स्मरणार्थ 1517 मध्ये हा गुरुद्वारा बांधण्यात आला होता. त्याची देखरेख भारतीय लष्कराकडून केली जाते. हे ठिकाण लेह-कारगिल मार्गावर समुद्रसपाटीपासून 12000 फूट उंचीवर, लेहपासून सुमारे 25 मैल अंतरावर आहे.
दिल्लीच्या शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंजींदर सिंह सिरसा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ भारत-चीन सीमेवरील नसून लेहमधील गुरुद्वारा पाथर साहिब येथील आहे.
हेही वाचा- भारतीय सैनिकांनी देशविरोधी घोषणा देणाऱ्या तरुणांना राष्ट्रगीत गायला भाग पाडले? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment