नुकताच पश्चिम बंगाल विधानसभा मतदानाचा निकाल लागला. या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षानेच बाजी मारली. त्यानंतर लगेचच सोशल मीडियात तृणमूल कॉंग्रेसने बूथ कॅप्चर (booth capturing) करून हिंदूंना इच्छेविरुद्ध मत द्यायला भाग पाडल्याचा दावा करणारे दोन व्हिडीओ व्हायरल होताहेत.
‘पश्चिंम बंगाल मधील मतदान चालु असतांना तिथे झालेली बोगस वोटींग व मतदान बुथवर हल्ला करनारी मुस्लिंम माॅब लाॅंचींग बघा. कसे हिंदु लोक तिथे इच्छेनुसार वोट करनार..?’
निवडणुकीच्या काळात देखील हेच व्हिडीओ अशाच पद्धतीने तृणमूल कॉंग्रेसच्याच नावाने व्हायरल होत होते.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने दोन्ही व्हिडीओजची पडताळणी करण्यासाठी व्हिडीओजच्या ‘की फ्रेम्स’ गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स इमेज सर्च केल्या. सोबतच ‘ऍडव्हान्सड् कीवर्ड्स’च्या आधारेही सर्च करून पाहिले, त्यात काय गवसले ते पहा-
१. ‘तो’ व्हिडीओ जुना
मतदानासाठी आलेल्या महिलेचा हात स्वतः धरून बटण दाबणाऱ्या महिला अधिकाऱ्याच्या व्हायरल व्हिडीओची सत्यता पडताळताना आम्हाला ‘न्यूज सेन्ट्रल 24X7’ या पोर्टलवर एक बातमी सापडली. बंगालच्या ग्रामीण भागात हा असा प्रकार घडत असल्याचे ट्विट्स व्हायरल होत असल्याची ती बातमी आहे. व्यवस्थित पाहिल्यास लक्षात येईल की ती बातमी आताची नसून ‘१६ मे २०१९’ म्हणजे जवळपास वर्षभरापूर्वीची आहे.
ही घटना नेमकी कुठली? ती मतदान अधिकारी/ पोलिंग एजंट नेमक्या कोणत्या पक्षाच्या बाजूने मतदान करवून घेत आहे? या प्रश्नांची उत्तरे काही या बातमीतून मिळाली नाहीत परंतु ही दृश्ये आताच्या विधानसभा निवडणुकीतील नाहीत हे नक्की.
२. ‘तो’ व्हिडीओ पश्चिम बंगालचा नाही
मतदान केंद्रावर मुस्लिमांनी हल्ला केला आणि CRPF जवानांनी त्यांना पिटाळून लावले, असा दावा करत व्हायरल होत असलेला व्हिडीओ पडताळण्यासाठीसुद्धा आम्ही रिव्हर्स ईमेज सर्चचा आधार घेतला. आम्हास ‘EastMojo’ या ईशान्य भारतील न्यूज पोर्टलचे ट्विट सापडले.
ट्विटनुसार सदर घटना मणिपूर राज्यातील इम्फाळच्या छोट्याशा खेड्यातील आहे. इव्हिएम मशीनच्या नादुरुस्तीमुळे गावकऱ्यांनी मतदान केंद्रावर हल्लाबोल करत इव्हिएम आणि व्हीव्हीपॅट मशीन तोडले असे त्यात म्हंटले आहे. या ट्विटमधील माहिती सत्य असून ‘इंडिया टुडे‘ने सुद्धा यास दुजोरा दिला आहे. सदर घटना देखील २०१९ लोकसभा निवडणुकांच्या वेळचीच आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झालेय की व्हायरल दावा फेक आहे. ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसने बूथ कॅप्चर (booth capturing) करून हिंदूंना इच्छेविरुद्ध मत द्यायला भाग पाडले म्हणत व्हायरल झालेल्या व्हिडीओजचा आताच्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांशी काहीएक संबंध नाही. तो व्हिडीओ जुना असून त्यातील एक व्हिडीओ मणिपूरचा आहे.
हे ही वाचा: ममता बॅनर्जींचे मुस्लीम प्रेम दाखवण्यासाठी ‘बंगाल भाजप’ने शेअर केला एडीटेड व्हिडीओ!
Be First to Comment