Press "Enter" to skip to content

मुंबईत ‘ताऊ-ते’ चक्रीवादळामुळे हाहाकार? ट्रायडंट हॉटेलजवळ वाहनांवर कोसळला छताचा तुकडा?

अरबी समुद्रातील ‘ताऊ-ते’ या चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, तर काहींना आपला जीव गमवावा लागला. अजूनही हे चक्रीवादळ शांत झालेले नाही.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओत छताचा एक तुकडा रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या गाड्यांवर कोसळलेला बघायला मिळतोय. दावा केला जातोय की ‘ताऊ-ते’ चक्रीवादळामुळे (tauktae cyclone) मुंबईत हाहाकार माजला असून हे दृश्य नरिमन पॉईंटवरील ट्रायडेंट हॉटेलजवळच्या विध्वंसाचे आहे. 

Advertisement

विजय गोरे यांनी फेसबुकवरून अपलोड केलेला हा व्हिडीओ १४५ युजर्सकडून शेअर केला गेलाय.

Guys please take care.. Trident Hotel, Nariman Point

Posted by Vijay Radhabai Vasant Gore on Monday, 17 May 2021

अर्काइव्ह

पडताळणी:

व्हिडीओ व्यवस्थित बघितला असता सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी की हा व्हिडीओ आताचा नसून जुलै २०२० मधला आहे. व्हिडिओच्या उजव्या कोपऱ्यात हे सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशीचं आहे ती तारीख बघायला मिळतेय. त्यामुळे साधारणतः वर्षभरापूर्वीच्या या घटनेचा सध्याच्या ताऊ-ते चक्रीवादळाशी काहीही संबंध नाही, हे इथेच स्पष्ट होतं.

आमच्या पडताळणीमध्ये आम्हाला आकाशवाणी मुंबईच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून करण्यात आलेलं एक ट्विट देखील मिळालं. या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय की ट्रायडेंट हॉटेलजवळ वाहनांवर झाडं किंवा इतर कुठलंही स्ट्रक्चर कोसळल्याने काही दुर्घटना झाल्याची नोंद नाही. सोशल मीडियावरील व्हिडीओ फेक आहे. इतर कुठल्यातरी ठिकाणच्या घटनेचा हा व्हिडीओ आहे.

व्हिडीओ मुंबईतील नाही हे तर स्पष्ट झालं परंतु मग हा व्हिडीओ नेमका कुठला हे शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या किफ्रेम्स गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधल्या. आम्हाला हा व्हिडीओ दि. २१ मार्च २०२१ रोजी एका अरबी युट्यूब चॅनेलवरून अपलोड करण्यात आला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या अरबी भाषेतील उपलब्ध डिस्क्रिप्शनचे गुगल ट्रान्स्लेटरच्या मदतीने भाषांतर केले असता ‘वादळामुळे झालेल्या कथित नुकसानीचा व्हिडीओ’ असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीच्या आधारे गुगलवर किवर्ड सर्च केलं असता ‘अल-जझिरा’चा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्हिडीओ हा गेल्या वर्षीच्या जुलैमध्ये मदिनामध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या घटनेचा आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल दावे चुकीचे आहेत. व्हायरल व्हिडीओ मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलजवळील घटनेचा नसून मदिनामध्ये गेल्या वर्षी आलेल्या चक्रीवादळा दरम्यानचा आहे. 

हे ही वाचा- ‘१ जून’ नंतरची ‘अनलॉक’ नियमावली सांगणारा TV9 मराठीचा व्हायरल व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा