Press "Enter" to skip to content

सावित्रीबाई फुले यांच्या भिडेवाड्यातील मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो नाही, मग कुठला?

सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतीबा फुले यांनी भिडेवाड्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेला परवा म्हणजेच ३ जानेवारी रोजी १७३ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सोशल मीडियात अनेकांनी पोस्ट्स लिहिल्या, शेअर केल्या. त्यात एक फोटो व्हायरल होताना दिसला. सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाड्यात सुरु केलेल्या मुलींच्या शाळेचा हा दुर्मिळ फोटो (photo of a girls school started by Savitribai Phule) असल्याचा दावा केला गेला.

Advertisement

वाचनवेडा (पुस्तकं वाचणाऱ्या प्रत्येकाचा ग्रुप) असे नाव असणाऱ्या फेसबुक ग्रुपवर मोईन खान मुलतानी यांनी सदर फोटो शेअर करून ‘भिडेवाडयात पुणे येथे सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली पहिली मुलींची शाळा…. स्ञी शिक्षणाला खरी सुरूवात दुर्मिळ असा फोटो … सलाम या मातेला.’ असे कॅप्शन दिले आहे. या पोस्टला बातमी करेपर्यंत जवळपास २९००हून अधिक लाईक्स, ११५ कमेंट्स आणि १९३ लोकांनी शेअर केले होते.

FB post claiming photograph is of bhidewada 1st girl school by Savitribai Phule
Source: Facebook

या व्हायरल दाव्यांविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक संजय सोनटक्के यांनी माहिती दिली आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल फोटोला ‘यांडेक्स’ रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधून पाहिले. तीन विविध लिंक्स समोर आल्या.

यातील पहिल्या पोस्टटोस्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर पुण्याविषयी १८ रंजक बाबी या शीर्षकाखाली काही माहिती दिली आहे. यात सहाव्या मुद्द्यात हा व्हायरल होत असलेला फोटो असून त्यावर ‘सावित्रीबाई फुले यांनी त्यांच्या मदतनीस फातिमा बेगम यांच्यासह १८४८ साली भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा चालू केली त्याचा फोटो (photo of a girls school started by Savitribai Phule) असल्याचे लिहिले आहे. फोटोखाली सौजन्य म्हणून ‘oldindianphotos’ असे लिहिले आहे.

परंतु याच ‘oldindianphotos‘च्या वेबसाईटवर जाऊन आम्ही जेव्हा सर्च केले तेव्हा सदर फोटोवर ‘Photograph of a girl’s school at Sindh- 1973’ असे लिहिले आहे. त्याखाली फोटोचे सौजन्य ‘ब्रिटीश लायब्ररी’ला देण्यात आले आहे.

हे तरी कितपत खरं आहे हे पडताळण्यासाठी आम्ही ‘ब्रिटीश लायब्ररी‘च्या अधिकृत वेबसाईटवर शोधाशोध केली आणि सत्य माहिती सापडली.

British Library blog about rare photograph of Indian girl school
Source: British Library

यात दिलेल्या माहितीनुसार १८७३ साली मायकी आणि कंपनीने हा फोटो सिंध मध्ये क्लिक केलेला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या ४६व्या खंडात सदर फोटोग्राफ आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या सिंध प्रांतातील हा फोटो आहे.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल फोटोसोबतचा दावा फेक असल्याचे स्पष्ट झाले. फोटोतील मुलींनी घातलेले सलवार कुर्ते, डोक्यावर ओढणी हा पेहराव नक्कीच मुस्लीमबहुल भागातील आहे.

पुण्यातील हे चित्र नसणार हे पाहताक्षणी लक्षात येते होतेच परंतु ‘ब्रिटीश लायब्ररी’च्या माहितीने व्हायरल दावा खोटा असल्याचे पुराव्यासह स्पष्ट झाले. सावित्रीबाईंनी भिडेवाड्यात ३ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा चालू केली होती. हा फोटो १८७३ सालचा म्हणजे तब्बल २५ वर्षांचा फरक दोन्ही घटनांमध्ये आहे.

हेही वाचा: हिंदू देव-देवतांची चित्रे असलेले गुप्तपणे बनलेले संविधान २०२४ मध्ये लागू होणार?

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा