सोशल मीडियावर एक फोटो जोरदार व्हायरल होतोय. फोटोत सगळीकडे वेगवेळ्या हिंदू देवी-देवतांचे फोटो अस्ताव्यस्त पडलेले दिसताहेत. या फोटोच्या आधारे दावा केला जातोय की पंजाबमध्ये हिंदूंच्या रामलीला कार्यक्रमावर हल्ला (attack on ramleela) केला गेलाय.
‘सनातन शक्ती’ या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आलेला फोटो ८२४ वेळा शेअर करण्यात आलाय.
राजेंद्र सुखवाल या युजरकडून टाकण्यात आलेली पोस्ट देखील १२६ जणांकडून शेअर करण्यात आलीये.
पडताळणी:
प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चच्या आधारे व्हायरल फोटोची पडताळणी केली. आम्हाला ‘एसबीएस हिंदी’ या वेबसाईटवर एक बातमी मिळाली. या बातमीनुसार ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरातील आहे.
साधारणतः दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मधील १८ ऑक्टोबर रोजी काही माथेफिरूंनी सिडनीमधील भारतीय मंदिरावर हल्ला केला होता. सिडनी रिजेंट पार्कमधील हल्ल्यात मंदिरातील जवळपास ३० मुर्त्यांची मोडतोड करण्यात आली होती. तसेच कार्पेट्स जाळून टाकण्यात आले होते.
भारतीय मंदिर सिडनीच्या फेसबुक पेजवरून देखील या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवितानाच या काळात मिळालेल्या समर्थनाबद्दल मंदिर प्रशासनाकडून आभार देखील मानण्यात आले होते. शिवाय मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी निधी उभारणीच्या कामात योगदान देण्याचे आवाहन देखील करण्यात आले होते.
सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो पंजाबमधील नसून ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील असल्याचे तर स्पष्ट झाले, मात्र आम्ही अजून शोधाशोध केली असता पंजाबमधील कोठे मानवाल गावात रामलीला कार्यक्रमावर हल्ला (attack on ramleela) झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली.
‘दै. जागरण’च्या बातमीनुसार २३ ऑक्टोबर रोजी काही समाजकंटकांनी रामलीला कार्यक्रमावर हल्ला करून रामलीला सादर करणाऱ्या कलाकारांवर हल्ला केला होता. कार्यक्रमस्थळाची वीज जोडणी कापण्यात येऊन त्या ठिकाणचे पोस्टर आणि बॅनर देखील फाडण्यात आले होते. आरोपींवरील कारवाईसाठी गावातील नागरिकांनी रविवारी आंदोलन देखील केलं होतं.
महावीर नाटक क्लबचे प्रमुख मोनू संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार रामलीलेचा कार्यक्रम सुरु असताना साधारणतः २५ युवकांच्या टोळीने घटनास्थळी येऊन रामलीला मंडपात गोंधळ घातला आणि तोडफोड केली. कुणाच्या काही लक्षात येण्यापूर्वीच त्यांनी कार्यक्रमस्थळाची वीज बंद केली. त्यामुळे गोंधळ घालणारी ही टोळी नेमकी कोण होती यासंबंधीची माहिती मिळू शकली नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर पंजाबमधील रामलीला कार्यक्रमावरील हल्ल्याचा म्हणून फिरविण्यात येणारा फोटो ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील भारतीय मंदिरचा आहे. या मंदिरावर दोन वर्षांपूर्वी हल्ला झाला होता. सिडनीमधील त्यावेळचा फोटो सध्या पंजाबमधील असल्याचा दावा करत फिरवला जातोय.
हे ही वाचा- खरंच मालाडमध्ये मुस्लिम युवकांनी दुर्गा पूजा बंद पाडली?
Be First to Comment