देश सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी लढत असताना विदेशी माध्यमांमधून सरकारच्या कोरोना काळातील चुकीच्या धोरणांचे वाभाडे काढले जाताहेत. जगभरातील बहुतेक प्रमुख वृत्तपत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. अशा परिस्थितीत भाजप आयटी सेल आणि केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून पंतप्रधान मोदींची प्रतिमा चमकविण्यासाठी वेगवेगळ्या करामती केल्या जात असल्याचं बघायला मिळतंय.
केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांकडून आणि भाजपच्या इतरही नेत्यांकडून सोशल मीडियावर एक लेख शेअर करण्यात आलाय. सुदेश वर्मा यांनी लिहिलेल्या या संपूर्ण लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोरोना काळातील कामगिरीचे कौतुक करण्यात आले आहे. महत्वपूर्ण गोष्ट अशी की हा लेख ब्रिटनच्या जगप्रसिद्ध ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या “द डेली गार्डियन” नावाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलाय.
लेख शेअर करणाऱ्यांमध्ये भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, किरण रिजूजू, डॉ. जितेंद्र सिंह, प्रल्हाद जोशी, झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघूबर दास यांसारख्या अनेकांचा समावेश आहे.
‘द डेली गार्डियन‘चा ब्रिटनमधील ‘द गार्डियन‘शी काहीही संबंध नाही!
एकाच वेळी अनेक केंद्रीय मंत्र्यांनी आणि भाजप नेत्यांनी मोदींचे कौतुक करणाऱ्या ‘द डेली गार्डियन’चा लेख शेअर करण्यामागे या वेबसाईटचे ब्रिटनच्या ‘द गार्डियन’च्या नावाशी असलेले साधर्म्य हे महत्वाचं कारण आहे. या लेखाच्या आधारे ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं असल्याचं (the guardian article on modi) भासविण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जातोय.
लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी की ‘द डेली गार्डियन’चा ब्रिटनमधील ‘द गार्डियन’शी काहीही संबंध नाही. ‘द डेली गार्डियन’ची मालकी ‘ITV नेटवर्क’कडे आहे. उत्पल कुमार हे ‘द डेली गार्डियन’चे कार्यकारी संपादक आहेत. ‘द डेली गार्डियन’ ही ‘संडे गार्डियन’ची दैनिक आवृत्ती असून हे वृत्तपत्र भाजपचे माजी केंद्रीय मंत्री आणि पत्रकार एम.जे. अकबर यांनी सुरु केले होते.
सुदेश वर्मा भाजपचे माध्यम संयोजक
पंतप्रधान मोदींच्या कामगिरीचे कौतुक हा लेख लिहिला आहे सुदेश वर्मा यांनी. सुदेश वर्मा हे काही स्वतंत्र पत्रकार वैगेरे नसून ते भाजपचे माध्यम संयोजक म्हणून काम बघतात. ते अनेक वृत्तवाहिन्यांवर भाजपचे प्रवक्ते म्हणून पक्षाची भूमिका देखील मांडत असतात. शिवाय त्यांनी ‘नरेंद्र मोदी-द गेम चेंजर’ नावाचे पुस्तक देखील लिहिलेले आहे.
खऱ्या ‘द गार्डियन’ने नरेंद्र मोदींच्या संदर्भात काय म्हटलंय?
‘द गार्डियन’ने २३ एप्रिल रोजी भारतातील कोरोना नरसंहारावर संपादकीय लिहिलंय. या संपादकीयात म्हंटलंय,
“भारतातील कोरोनाच्या विनाशकारी परिस्थितीस पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अति-आत्मविश्वास जबाबदार आहे. सहा आठवड्यांपूर्वी लोकसंख्येच्या अगदी १ टक्का नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालेले नसताना मोदींनी भारत ‘जगाची फार्मसी’ असल्याचे जाहीर केले आणि कोरोनापूर्वीचे आयुष्य पुन्हा सुरू होऊ शकण्याचे संकेत दिले. त्यानंतर क्रिकेटच्या सामन्यांना आणि कुंभमेळ्यात हजारोंच्या संख्येने लोक एकत्र आले. ह्या घटना सुपरस्प्रेडर ठरल्या”
या संपादकीयात पुढे म्हटलंय, “डोनाल्ड ट्रंम्प यांच्याप्रमाणेच मोदींनी देखील महामारीच्या काळात देखील निवडणूक प्रचार थांबवला नाही. या काळात देशात पाच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि मोदींनी त्यात बिनधास्तपणे भव्य प्रचारसभा घेतल्या. भारतातील मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात टाळता येण्यासारखी होती, मात्र उन्मत्त आणि अकार्यक्षम सरकारच्या धोरणांचा हा परिणाम आहे.
मोदींनी आपल्या चुकांचे खापर राज्य सरकारांवर फोडले.आता त्यांनी आपल्या चुका स्वीकारून त्या सुधारल्या पाहिजेत. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. शिवाय ऐक्याची आवश्यकता असताना लोकांमध्ये फूट पडणाऱ्या सांप्रदायिक विचारसरणीचा त्याग करायला हवा, असंही या संपादकीयात म्हंटलंय.
हे ही वाचा- योगी सरकारने पसरवल्या ‘हार्वर्ड विद्यापीठा’ने उत्तम कामगिरीची दखल घेतल्याच्या चुकीच्या बातम्या!
Good JOB Check post marathi Team
[…] हे ही वाचा- ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौ… […]
[…] हे ही वाचा: ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौ… […]
[…] हे ही वाचा- ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौ… […]
[…] हेही वाचा: ब्रिटनच्या ‘द गार्डियन’ने मोदींचे कौ… […]