कर्नाटकातील हिजाब बंदीच्या आंदोलनादरम्यान एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. कॉलेजमध्ये बुरखा परिधान करून आलेल्या मुस्लीम मुलीसमोर हिंदू कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यावर प्रत्युत्तर म्हणून तिने ‘अल्लाहू अकबर’चे नारे लावले. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु ती कॉलेजात बुरखा आणि बाहेर फाटक्या जीन्स टीशर्टवर फिरते अशा दाव्यांसह काही फोटोज सोशल मीडियात व्हायरल होतायेत.
व्हायरल दावा:
यह कर्नाटक की वही मुस्लिम लड़की है जो कल स्कूल में बुर्के में गयी थी और कैमरे पर मजहबी नारे लगा कर फेमस हो गयी और उसको यूपी के मौलाना ने मजहबी मान्यताएं मानने के लिए 5 लाख रु इनाम दे दिया ।
बुरका ओर हिजाब केवल स्कूल में चाहिए बाहर तो फ़टी जीन्स ओर टीशर्ट भी चलेगी , मजहब केवल स्कूल में लागू करवाना है अपने जीवन मे नही ।
अब इसे साजिश न कहु तो क्या कहूं
‘ये कर्नाटक के मांडया की वही लड़की मुस्कान है, जो कल स्कूल बुर्के में गयी थी और कैमरे पर मजहबी नारे लगा कर फेमस हो गयी और जिसे यूपी के दारूल उलूम इस्लामी के मौलाना ने मजहबी मान्यताएं मानने के लिए 5 लाख रु दे दिए इनाम में , औवेशी ने इसकी और इसके मां बाप की इस्लामिक तहजीब सिखाने के लिए बहुत तारीफ की है लेकिन #बुरका_या_हिजाब_इन्हें_केवल_स्कूल_में_चाहिए बाहर तो फ़टी जीन्स ओर टीशर्ट भी चलेगी… मजहब केवल स्कूल में लागू करवाना है ,अपने जीवन में नही ! अब इसे साजिश न कहें तो क्या कहें ???
#कर्नाटक#हिजाब#हिन्दुत्त्व#जय_श्री_राम‘ या अशा मजकुरासह दुसरा एक फोटो व्हायरल होतोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक निलेश घरत, निशिकांत गोळे, परमेश्वर राऊत आणि डॉ. भारत पाटोळे यांनी हेच दावे फेसबुक, ट्विटरप्रमाणेच व्हॉट्सऍपवरही जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने सर्वात आधी हिंदू कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीला प्रत्युत्तर देणाऱ्या मुस्लीम मुलीविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याविषयी शोध घेत असताना ‘द इंडियन एक्स्प्रेस’ची ९ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आम्हाला सापडली.
हिंदू आंदोलकांना धाडसाने विरोध करणाऱ्या मुलीविषयी:
बातमीमध्ये तिचे नाव मुस्कान असल्याचे सांगण्यात आले आहे. जिथे हा एकूण प्रकार घडलाय त्या कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात असणाऱ्या पीईएस कॉलेज मध्ये ती बी.कॉम शिकतेय. त्या दिवशी ती तिच्या शिक्षकांकडे असाईनमेंट्स देण्यासाठी आली होती. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पत्रकाराने तिच्याशी संवाद देखील साधला यात ती म्हणते,
आमच्या कॉलेजमध्ये येईपर्यंत बुरखा आणि तेथून आत वर्गात बसल्यावर हिजाब (डोक्यावरील आवरण) परिधान करायला परवानगी आहे. कॉलेज प्रशासन, प्रिन्सिपल यांना जर काहीच त्रास नाही तर हे कोण लोक, ज्यांना आमच्या पेहरावाचा त्रास होतोय? माझ्या आधी सुद्धा येई मुलींना या आंदोलकांनी अशाच प्रकारे त्रास दिला होता. मी दिलेल्या प्रत्युत्तराचे माझ्या वर्गातील हिंदू मित्र-मैत्रिणीसुद्धा कौतुक करतायेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आईला काळजी वाटली परंतु वडिलांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं.
– मुस्कान (व्हायरल व्हिडीओतील बुरखा परिधान केलेली मुलगी)
व्हायरल झालेला व्हिडीओ:
व्हायरल होत असलेले फोटोज मुस्कानचे?
‘कॉलेजमध्ये बुरखा परंतु बाहेर फाटलेली जीन्स आणि टीशर्ट, धर्माचे नियम फक्त शाळा कॉलेजमध्येच पाळायचे?’ अशा दाव्यांसह व्हायरल होत असणारे फोटोज आम्ही गुगल लेन्सच्या मदतीने रिव्हर्स सर्च केले असता हे सर्व फोटोज मुस्कानचे नव्हे तर ‘नजमा नजीर चीक्कानेराळे‘ नामक युवतीचे असल्याचे समोर आले. नजमा कर्नाटकच्या ‘जनता दल सेक्युलर’ पक्षाची सदस्य आहे. व्हायरल फोटोजपैकी एक फोटो तर नजमा यांच्या फेसबुक प्रोफाईलला आहे.
याच फेसबुक अकाऊंटवर नजमा यांनी स्वतः अपलोड केलेले फोटोज आणि मुस्कानच्या नावे व्हायरल होत असलेले फोटोज तंतोतंत जुळणारे आहेत. यातील बहुतांश फोटोज २०१८ साली अपलोड केले गेले आहेत.
दुसरा एक सर्वात जास्त प्रमाणात व्हायरल होत असलेला फोटो, ज्यामध्ये तिने जीन्स आणि काळ्या रंगाची हुडी परिधान केलीय तो तशाच पोजमधील फोटो तर आम्हाला सापडला नाही परंतु त्याच पेहरावातील नजमा यांचे ११ मे २०१८ साली अपलोड केलेले विविध फोटोज आम्हाला सापडले. या दोन्ही फोटोजमधील मुलगी एकच आहे हे ओळखणे सहस शक्य आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की व्हायरल झालेल्या व्हिडीओतील बुरखा परिधान केलेल्या मुलीचे नाव मुस्कान असून ती पीईएस कॉलेजमध्ये बी.कॉम शिकतेय. तिच्या नावाने व्हायरल होत असलेले फोटोज ‘नजमा नजीर चीक्कानेराळे’ या युवतीचे आहेत. या ‘जनता दल सेक्युलर’ पक्षाच्या सदस्य आहेत. दोघींचाही एकमेकींशी काहीएक संबंध नाही. म्हणजेच हिंदू आंदोलकांना प्रत्युत्तर देत ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देणाऱ्या विद्यार्थिनीला ट्रोल करण्यासाठी होत असलेले दावे फेक आहेत.
हेही वाचा: पोलिसांनी बुरखा घातलेल्या आरएसएस कार्यकर्त्याला पाकिस्तानचा झेंडा फडकवताना पकडलंय ?
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘चेकपोस्ट मराठी’च्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] अनेक दावे झाले आहेत, त्यांची पडताळणी ‘चेकपोस्ट मराठी’ने केली आहे. गुगल […]