काल २१ जून २०२० रोजी सूर्यग्रहण होऊन गेलं तेव्हापासून ‘ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहतं’ सांगणाऱ्या फेसबुक पोस्ट, फोटोज, व्हिडीओज सोशल मीडियात फिरत आहेत.
ग्रहण आणि मुसळ हा संबंध नेहमीच जोडला जातो. ग्रहणाच्या वेळी नेहमीच असे दावे केले जातात. फेसबुक युजर सागर टाकळकर गुरुजी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर अशीच एक पोस्ट टाकली होती.
‘सुर्य / चंद्र ग्रहणावेळी पुर्वी अडाणी माणसं परातीच्या पाण्यात मुसळ ठेवत. हे मुसळ ग्रहण काळात आपोआप खाडकन उभे राहते, ग्रहण संपल्यावर आपोआप पडते. मुसळ पाण्यात उभारल्यापासून पडेपर्यंत पुर्वी लोक ग्रहणादि नियमांचे पालन करित. ग्रहण मोक्षानंतर स्नान करित.*
*एवढे सोपे पुर्वीच्या अडाणी लोकांचे संशोधन, आजही विज्ञानाच्या तथाकथित ठेकेदारांना व संशोधकांना जमले नाही. ‘
असं लिहित त्यांनी विज्ञानवादी लोकांना टोमणे मारले आहेत. सोबत ग्रहणाचे आणि आधाराविना ताटात उभे राहिलेल्या मुसळाचे फोटोज सुद्धा जोडले आहेत.
असेच दावे करणारे काही व्हिडीओज सुद्धा युट्युबवर पहायला मिळाले.
सोशल मिडियातच नव्हे तर मुख्य मिडियाने सुद्धा या गोष्टीच्या बातम्या केल्या होत्या. यात सकाळ या न्यूज पेपरने आणि ABP माझा या न्यूज चॅनलने आपल्या लाइव्ह अपडेटवर या संबंधी लिहिलं होतं.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’च्या निदर्शनास या व्हायरल पोस्ट, फोटोज व्हिडीओज आल्या तशा यामागील तथ्याची तपासणी करायला आम्ही सुरुवात केली. ग्रहण आणि मुसळ ह्यांचा खरंच काही संबंध आहे का, हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.
सर्वात आधी कीवर्ड्स टाकून या कृतीमागील विज्ञान कुणी समजावून सांगितलं आहे का हे तपासून पाहीलं. आम्हाला युट्युबवर एक व्हिडीओ सापडला, यात व्हिडीओतील व्यक्ती राज महाराज अमृते सांगताहेत की यामागे चमत्कार नसून विज्ञान आहे.
काय विज्ञान सांगत आहेत ते? मुसळाला लोखंडाची चकती असते. एकीकडून पृथ्वीचे गुरुत्वाकार्षण आणि दुसरीकडे चंद्र सूर्य एकाच रेषेत आल्याने दोघांचे एकत्र गुरुत्वाकर्षण अशामुळे चुंबकीय शक्ती तयार होते आणि मुसळ उभे राहते.
मुळात मुसळ हे कुटण्यासाठी वापरतात, ते चांगलंच जड असतं. एवढ्या जड मुसळाला लोखंडाची चकती सगळ्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने उभं करून ठेवत असेल तर ग्रहण काळात घरातील, बाहेरील हलक्या लोखंडी वस्तू तर हवेतच तरंगायला हव्यात.
हे उत्तर आम्हाला तर्कशुद्ध वाटलं नाही. म्हणून आम्ही ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले’ यांच्याशी संपर्क साधला.
त्यांनी आम्हाला उत्तर तर दिलंच वर पुरावा म्हणून स्वतःच्या फेसबुकवरची पोस्ट आणि सोबत जोडलेला व्हिडीओ पहायला सांगितलं.
या मध्ये त्यांनी ‘सेंटर ऑफ ग्रॅव्हीटी’ म्हणजेच ‘गुरुत्वमध्य’ या वैज्ञानिक संकल्पनेमुळे ते मुसळ उभं राहात असल्याचं सांगितलं आहे. त्यात त्यांनी असं सुद्धा म्हंटलंय की हे असं मुसळ उभं राहण्यासाठी ग्रहणाच्या दिवसाच्या वेळेची गरज नाही. कुठल्याही दिवशी सपाट पृष्ठभागावर जर ते ठेवलं तरीही ते उभं राहू शकतं.
हे पटवून सांगण्यासाठी त्यांनी आज दिनांक २२ जून २०२० रोजी ग्रहण नाही तरीही रत्नागिरी अंनिस कार्यकर्ते अँड.राधा वणजू व वल्लभ वणजू यानी प्रयोग करून अगदी फरशीवर उभ्या असलेल्या मुसळाचा व्हिडीओ सुद्धा जोडलेला आहे.
अजून खोलात जायचं म्हंटलं तर कुठल्याही वस्तूचा परफेक्ट गुरुत्वमध्य जर आपल्याला सापडला तर ती हलकी असो किंवा जड एका कुठल्याही छोट्याशा बिंदूवर ती उभी राहू शकते. हे आपण या व्हिडीओमध्ये सुद्धा पाहू शकता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये ग्रहण असताना मुसळ आधाराविना ताटात उभं राहतं यात काही दैवी चमत्कार आहे, असं म्हणणाऱ्या लोकांच्या दाव्यात काहीच तथ्य आढळलं नाही.
टाकळकर गुरुजी यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये तर मुसळ ग्रहण चालू झाल्यावर खाडकन उभं राहतं असं सांगितलंय. हे असं कुठल्याच व्हिडीओत आम्हाला दिसलं नाही.
तसेच यात चंद्राच्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा सुद्धा काहीएक संबंध नाही असं पडताळणीत समोर आलं आहे.
हे एक साधं सोपं विज्ञान आहे. मुसळाचा गुरुत्वमध्य गवसल्याने ते उभं राहतं आणि जड असल्याने हलक्याशा हवेने वगैरे पडत नाही. यात ग्रहणाच्या वेळांचा सुद्धा काहीएक संबंध नाही. कारण एकाही व्हिडीओमध्ये ग्रहण संपण्याची आणि वैज्ञानिकांनी दिलेली सकाळी ९.१५ ते दुपारी ३.०४ ही वेळ कुठेच जुळत नाही.
एकुणातच काय ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामागे चमत्कार नसून साधं सोपं विज्ञान आहे.
[…] हेही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामा… […]
[…] हेही वाचा: ग्रहणात आधाराविना मुसळ उभं राहण्यामा…! […]