Press "Enter" to skip to content

‘3 मे ते 18 मे कोरोना संसर्गासाठी सर्वात वाईट वेळ’ सांगणारा मेसेज लॉजिक लेस

‘3 मे ते 18 मे दरम्यान काहीही वस्तू खरेदीसाठी घर सोडू नका, कारण सर्वात वाईट वेळ म्हणजे उद्यापासून सुरु होणार आहे’ असा एक मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल होत आहे.  मेसेजला पुष्टी देणारे इतरही अनेक दावे मेसेजच्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला बघता येऊ शकतात.

Advertisement

पडताळणी:

व्हायरल मेसेजची पडताळणी करण्यापूर्वी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की ‘Incubation’ म्हणजे काय? गुगलला आम्ही जेव्हा मराठी अर्थ विचारला तेव्हा ‘रोगजंतूंनी शरीरात प्रवेश मिळविल्यानंतर प्रत्यक्ष रोगास आरंभ होईपर्यंतचा काळ’ म्हणजे इनक्यूबेशन असं उत्तर सापडलं.

मग आम्ही शोधलं कोरोना व्हायरसच्या इनक्यूबेशनचा काळ नेमका किती असतो? त्यासाठी आम्ही सर्वात विश्वासार्ह माहितीचा स्रोत म्हणून ‘जागतिक आरोग्य संघटनेच्या’ वेबसाईटवर शोधाशोध केली आणि एका रिपोर्टमध्ये आम्हाला ती माहिती मिळाली.

काय लिहिलंय त्यात?

‘आपल्या शरीरात कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कोरोना व्हायरसने प्रवेश केला असेल तर त्याची लक्षणे दिसण्यासाठी सरासरी किमान ५ ते ६ दिवस लागतात. हा काळ १४ दिवसांपर्यंत सुद्धा जाऊ शकतो. परंतु ही लक्षणे दिसण्या आधीच्या काळात सुद्धा काही लोकांच्या शरीरातून दुसऱ्याला संसर्ग होऊ शकतो.’

याचाच अर्थ असा की COVID19 च्या इनक्यूबेशनचा काळ हा प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा असू शकतो आणि त्यांच्याद्वारे संक्रमण कधी होईल यासाठी सुद्धा ठराविक किती दिवस लागतात हे ठामपणे सांगणे कठीण आहे.

पुढच्या टप्प्यात असा दावा करण्यात आला आहे की ‘सहसा सर्व संक्रमण या दोन आठवड्यांत दिसून येतील, त्यानंतर पुढील दोन आठवडे शांत राहतील आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये ते कमी होते.’ या गोष्टीला कसलाही शास्त्रीय आधार नाही. आमच्या पडताळणी मध्ये आम्हाला कुठेच असा काही पुरावा सापडला नाही. मुळात हे अतार्किक आहे. प्रत्येकाच्या इनक्यूबेशनचा काळ वेगळा असेल तर त्याला असा दोन दोन आठवड्यात विभागण्यास कुठलाही तर्क नाही.

मेसेजच्या तिसऱ्या टप्प्यात असे म्हणण्यात आले आहे की ‘इटलीमध्ये घडलेली भीषण गोष्ट म्हणजे या संक्रामक आठवड्याला तिथेच दुर्लक्ष केले गेले आणि त्यामुळे सर्व प्रकरणे एकत्र तेथे वर आली.’

इटलीमध्ये कोरोनाचा प्रसार नेमका कसा झाला आणि त्यातून आपण काय शिकलं पाहिजे यासंबंधीचा एक महत्वाचा लेख ‘हार्वर्ड बिझनेस रीव्ह्युव’मध्ये ‘लेसन्स फ्रॉम इटलीज रिस्पॉन्स टू कोरोना व्हायरस’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता. इटलीमधील संक्रमण समजून घेण्यासाठी आजघडीला हा एक अतिशय महत्वाचा लेख आहे. ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांनी ‘द प्रिंट’वरील ‘कट द क्लटर’ ह्या कार्यक्रमात ‘लेसन्स फ्रॉम..” हा लेख अतिशय सोप्या भाषेत  समजावून सांगितला आहे.

संपूर्ण लेखात व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात आल्याप्रमाणे दोन आठवड्यांच्या कालावधीचा किंवा संक्रमण आठवड्याचा वगैरे कसलाही उल्लेख नाही.

वस्तुस्थिती:

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की प्रत्येकाचा इनक्यूबेशनचा काळ वेगवेगळा असतो.  त्यामुळे सर्वांचा इनक्यूबेशन कालावधी एकच असल्याचे गृहीत धरून मांडण्यात आलेल्या थेअरीला काहीही अर्थ उरत नाही. सहाजिकच गृहीतकच चुकल्याने पुढील दावे अगदीच तथ्यहीन आणि अशास्त्रीय ठरतात. 3 मे ते 18 मे ह्या पंधरवाड्याचा त्या अर्थाने कोरोना संसर्गाशी काही खास संबंध नाही.

सरकारी आदेशांच्या पालनासह सतत हात धुणे, मास्क वापरणे आणि सोशल डीस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणे ही त्रिसूत्रीच आपल्याला कोरोना व्हायरसपासून वाचवू शकते, हे नेहमीसाठी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अशास्त्रीय किंवा अर्धवट माहिती देणारे मेसेजेस वाचून घाबरून जाऊ नका आणि ते फोरवर्ड करण्याची घाई सुद्धा करू नका. मेसेजच्या खऱ्या-खोट्याबद्दल थोडी जरी शंका असेल तर तो आम्हाला पाठवा आंम्ही त्याची योग्य ती शहानिशा करून ‘चेकपोस्ट’वरच त्याचा योग्य तो बंदोबस्त करू. 

हे ही वाचा- रामदेव बाबा यांचा ‘१ मिनिट श्वास रोखून कोरोना टेस्ट करण्याचा’ दावा सपशेल चुकीचा

More from कोरोनाMore posts in कोरोना »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा