Press "Enter" to skip to content

कोरोना साथीला बनावट म्हणणारे डॉ. विश्वरूप आणि हर्षद रुपवतेंचा लेख किती विश्वासपात्र?

कोरोनाची साथ बनावट आहे. ते एक मोठं षडयंत्र आहे.

कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही, असे वेगवेगळे दावे करणारे डॉ. विश्वरूप (Dr.Biswaroop Roy Chaudhary) आणि हर्षद रुपवते यांनी लिहिलेल्या लेखाचे मेसेज सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होताहेत.

कोरोनाच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटना (WHO) वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्याचं काम करत आहे. परंतु हे सर्व एक षड्यंत्र आहे. WHOने जगाची दिशाभूल केलीय म्हणत वेगवेगळ्याप्रकारे डॉ. विश्वरूप (Dr.Biswaroop Roy Chaudhary) आणि हर्षद रुपवते यांनी जगापेक्षा वेगळ्या थेअरीज मांडल्या आहेत.

Advertisement

व्हायरल दावे:

viral whatsapp forward to claim dr. biswaroop against WHO
source: Whatsapp
Hrashad Rupavate viral facebook post
Source: Whatapp
Harshad Rupavate's article in Mulnivasi nayak to claim no death by coronaviraus
Source: Facebook/ Mulnivasi Nayak

पडताळणी:

कोरोना विषयी अनेक मतमतांतरे आहेत. परंतु नेमके कुणाचे खरे आणि कुणाचे खोटे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला ते मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची आधी विश्वासार्हता तपासणे गरजेचे आहे.

डॉ. विश्वरूप रॉय चौधरी

हे नेमके कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आम्ही गुगलवर जेव्हा Dr.Biswaroop Roy Chaudhary असे सर्च केले तेव्हा त्यांची biswaroop.com ही वेबसाईट आम्हाला सापडली. ती उघडल्याबरोबर होम पेजवरच इंडो-व्हिएतनाम मेडिकल बोर्डचा लोगो. मध्यभागी त्यांचा फोटो, शेजारी Internationally Renowned Medical Nutritionist लिहिलेलं दिसलं. त्याखाली Ph.D in Diabetes (AIU, Zambia) अशी त्यांची डिग्रीसुद्धा लिहिलेली आहे.

वेबसाईटवर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचे सर्टिफिकेट्ससुद्धा उपलब्ध आहेत. त्यामध्ये त्यांनी ज्या सर्वोच्च शिक्षणाचा म्हणजे Ph.D in Diabetes (AIU, Zambia)चा उल्लेख केलाय, त्याचेही सर्टिफिकेट आहे.

Dr. Biswaroop Roy Chaudhary Alliance University PHD degree
Source: Biswaroop.com

Alliance International University, Zambia कडून मिळालेली ही पीएचडी आहे. ही अलायन्स युनिव्हर्सिटी आफ्रिका खंडातील झांबिया देशात असल्याचं त्या डिग्रीवर लिहिलंय.

भारतात कुठल्याही विद्यापीठाला अधिकृत दर्जा हवा असेल तर जसे UGC म्हणजे University Grants Commission of India ची मान्यता लागते. त्याप्रमाणे झांबिया देशात HEA म्हणजे Higher Education Authority ची मान्यता लागते.

आम्ही HEAच्या अधिकृत वेबसाईटवर शोधाशोध केली तेव्हा समजलं की या संस्थेने आजवर ७ शासकीय विद्यापीठांना आणि ५३ खाजगी विद्यापीठांना मान्यता दिली आहे. या दोन्हीपैकी एकाही यादीत ‘अलायन्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी’चे नाव नाही.

याबाबत अधिक तपासांती डेली मेल आणि प्रेस रीडर या वृत्तपत्रांच्या बातम्या आम्हाला सापडल्या. ज्यामध्ये HEU ने ही युनिव्हर्सिटी ‘दर्जाहीन’ अभ्यासक्रम प्रोव्हाईड करत असल्याचे लक्षात आल्याने मान्यता रद्द केल्याचे सांगितले आहे.

युनिव्हर्सिटीच्या अधिकृत वेबसाईटवर आम्हाला ‘Welcome to Alliance University’ या सेक्शन सोबत फोटो सापडला.

alliance university website screenshot
Source: Alliance International University Website

कुतूहल म्हणून आम्ही त्यातील ईमेज गुगल रिव्हर्स सर्च करून पाहिली तेव्हा तो फोटो या अलायन्स युनिव्हर्सिटीचा नसून ईटली मधील लोम्बार्डीच्या पाविया युनिव्हर्सिटीचा असल्याचं समजलं. ‘अलामी‘वर पाविया युनिव्हर्सिटीचे या फोटोसह इतरही फोटोज आपणास पहायला मिळतील.

‘द लल्लनटॉप’ या न्यूज वेबसाईटशी बोलताना डॉ. विश्वरूप यांनी आपले दावे सिद्ध करण्यासाठी जी जी आकडेवारी दिली ती एकतर चुकीची किंवा चुकीच्या अर्थाने समजून घेतलेली असल्याचं सिद्ध होत गेलं.

शोच्या शेवटी त्यांच्या डिग्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी ही पीएचडी रिसर्च करून नव्हे तर ऑनररी म्हणजे सन्मान म्हणून मिळाली असल्याचं कबूल केलं. या डिग्रीच्या आधारे ते मेडिकल प्रॅक्टीस करत आहेत जे चुकीचे आहे.

एवढेच नव्हे तर ज्या इंडो-व्हिएतनाम बोर्डाचे ते संस्थापक आहेत. त्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या कोर्सेसना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी नाही हे सुद्धा त्यांनी व्हिडीओमध्ये मान्य केल्याचं पहायला मिळेल.

या कार्यक्रमातच डॉ. विश्वरूप केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना कोरोनाची सत्यता सांगण्यासाठी भेटल्याचं सांगितलं. परंतु डॉ. हर्षवर्धन यांनी आपण WHO आणि ICMRने घालून दिलेल्या नियमावलीला अनुसरूनच उपचार सुरु ठेवणार असल्याचं सांगत विश्वरूप यांच्या सल्ल्याला त्यांनी लाल सिग्नल दिला हे सुद्धा त्यांनी स्वतः या चर्चेत सांगितलं तरीही विश्वरूप डॉ. हर्षवर्धन यांच्यासोबतचा फोटो पब्लिसिटी साठी वापरत असल्याचं दिसत आहे.

हर्षद रुपवते यांचा लेख

दुसरा एक मोठा लेख आणि त्याची कात्रणे व्हायरल होत आहेत त्याचे लेखक आहेत हर्षद रुपवते. त्यांचा लेख ‘मूलनिवासी नायक’ नावाच्या वृत्तपत्रात ९ जुलै २०२० रोजी प्रकाशित झालाय.

लेखाच्या शेवटी त्यांनी ऑफ-गार्डियन न्यूजवेबसाईटची एक लिंक दिलीय. त्यावर क्लिक केल्यानंतर समजले की ऑफ-गार्डियनने “No one has died from the corona virus” या शीर्षकाखाली २ जुलै २०२० रोजी पब्लिश केलेल्या लेखाचेच ट्रान्सलेशन रुपवते यांनी केले आहे.

रुपवते यांच्या लेखावर किंवा ऑफ-गार्डियनवरील लेखावर कितपत विश्वास ठेवावा हे ऑफ-गार्डियनच्या विश्वासार्हतेवर अवलंबून आहे. म्हणून आम्ही या न्यूज वेबसाईटबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ‘ऑफ गार्डियन’च्या अबाउट सेक्शन मध्ये समजलं की हे ५ जणांनी मिळून स्थापन केलेलं पोर्टल आहे.

या पाचही जणांना ब्रिटीश न्यूज ‘द गार्डियन’च्या ‘कमेंट इज फ्री’ सेक्शन मधून बॅन करण्यात आलं त्यामुळे त्यांनी ‘ऑफ-गार्डियन’ असे नाव घेउन स्वतःची वेबसाईट चालू केली.

मिडीयाच्या विश्वासार्हतेवर, सत्यतेवर रीव्ह्युव देणाऱ्या ‘मिडिया बायस फॅक्टचेक’ वेबसाईटवर ‘ऑफ गार्डियन’ बद्दल रिपोर्ट सापडला. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणच्या पुराव्यांसाठी हायपरलिंक्स देत रीव्ह्युव दिलाय. या रीव्ह्युवमध्ये ते सांगतायेत की ‘ऑफ गार्डियन’च्या बातम्या या रशिया धार्जिण्या आहेत. यावर असणाऱ्या कित्येक बातम्या यूक्रेनच्या विरोधात मत बनवण्यासाठीही लिहिल्या गेल्या आहेत.

स्टॉप फेक’ नावाच्या वेबसाईटने ‘Russian trolls exiled from Guardian find home for their hate’ म्हणजेच ‘गार्डियन मधून हकालपट्टी केलेल्या रशियन ट्रोल्सने स्वतःचा राग प्रदर्शित करण्यासाठी शोधलं नवं छत’ असा एक रिपोर्ट पब्लिश केला आहे. यामध्ये त्यांनी ऑफ-गार्डियनचे इंग्लंडच्या लेबर पार्टीचे नेते जेरेमी कॉर्बीन यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याचं म्हणत काही पुरावेही दिले आहेत. (लेबर पार्टी सध्या विरोधी पक्षात आहे.)

विज्ञान विषयक दाव्यांचे फॅक्टचेक करणाऱ्या ‘हेल्थ फिडबॅक’ या वेबसाईटने ‘ऑफ गार्डियन’च्या “No one has died from the coronavirus” या रिपोर्टची तपशीलवार तपासणी करून यातील सर्व दावे चुकीचे असल्याचं सांगितलं आहे. तो रिपोर्ट आपण ‘येथे’ वाचू शकता.

वस्तुस्थिती:

चेकपोस्ट मराठी’ने केलेल्या पडताळणीमध्ये डॉ. विश्वरूप (Dr.Biswaroop Roy Chaudhary) हे स्वतःच्या नावापुढे ‘डॉक्टर’ असे लावण्यासाठी ज्या डिग्रीचा आधार घेत आहेत ती डिग्री आणि त्याची युनिव्हर्सिटी विश्वासपात्र नसल्याचे स्पष्ट झाले.

‘एकही मृत्यू कोरोनामुळे नाही’ असा लेख लिहिण्यासाठी हर्षद रुपवते यांनी ज्या ऑफ-गार्डियनच्या लेखाचा आधार घेतला आहे त्यातील दावे चुकीचे असून त्या पोर्टलच्याच विश्वासार्हतेवर शंका आहे.

डॉ. विश्वरूप रॉय चौधरी आणि ‘ऑफ गार्डियन’च्या लेखाच्या आधारे हर्षद रुपवते यांनी केलेले दावे चुकीचे असून दिशाभूल करणारे आहेत.

 हेही वाचा: ‘कोरोना आजार नाही, षडयंत्र’ म्हणणाऱ्या डॉ. निलेश पाटील यांचे दावे दिशाभूल करणारे!

More from कोरोनाMore posts in कोरोना »

10 Comments

 1. शिवकांत राठोड़ शिवकांत राठोड़ August 26, 2021

  फैक्ट चेक वाल्यानो तुमची बुद्घि तुगहन ठे वली आहे , मी स्वता कोरोना रुग्ण सोबत राहिलो आहे, कोरोना साधारण फ्लयू आहे , महामारी नाही

  • checkpostmarathi checkpostmarathi August 26, 2021

   कदाचित WHO, सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि ‘चेकपोस्ट मराठी’सुद्धा चुकीचे आहेत असे जर आपले ठाम मत आहे तर या ‘षडयंत्रा’विरोधात उभे रहात WHO आणि ICMR विरोधात तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाहीत? जर कायद्याच्या चौकटीत राहून सर्व तपास झाला आणि या दोन्ही संस्था खोट्या पडल्या तर आम्ही आमचे सर्व रिपोर्ट्स मागे घेऊ, जाहीर दिलगिरीसुद्धा व्यक्त करू. फक्त आधी आमच्या माहितीस्तव तेवढी FIR ची किंवा याचिकेची कॉपी पाठवायला विसरू नका.

 2. Anonymous Anonymous August 26, 2021

  हे चेक पोस्ट वाले सर्व विकल्या गेले आहेत…. मेनस्ट्रीम दलाल मीडिया विकल्या गेला तर या फैक्ट चेकरची काय औकात आहे.
  कोरोना हे एक जागतिक षड्यंत्र आहे, लोकांना कंट्रोल करण्यात येत आहे, नवीन गुलामी चे नवीन नियम सरकार WHO, BILL Gates Foundation सोबत मिळून जनतेवर थोपविने चालू आहे..

  खोटी महामारी वैक्सीन विषारी

  • checkpostmarathi checkpostmarathi August 26, 2021

   कदाचित WHO, सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय माध्यमे आणि ‘चेकपोस्ट मराठी’सुद्धा चुकीचे आहेत असे जर आपले ठाम मत आहे तर या ‘षडयंत्रा’विरोधात उभे रहात WHO आणि ICMR विरोधात तुम्ही कायदेशीर कारवाई का करत नाहीत? जर कायद्याच्या चौकटीत राहून सर्व तपास झाला आणि या दोन्ही संस्था खोट्या पडल्या तर आम्ही आमचे सर्व रिपोर्ट्स मागे घेऊ, जाहीर दिलगिरीसुद्धा व्यक्त करू. फक्त आधी आमच्या माहितीस्तव तेवढी FIR ची किंवा याचिकेची कॉपी पाठवायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा