Press "Enter" to skip to content

संघ स्वयंसेवक नारायण दाभाडकरांनी तरुणासाठी बेड सोडल्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ ‘कॉपी पेस्ट’ पत्रकारिता!

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असलेल्या ८५ वर्षीय नारायण दाभाडकरांनी (narayan dabhadkar) रक्तातील ऑक्सिजनची पातळी ५५ पर्यंत आली असतानाही एका ४० वर्षीय गरजू रुग्णासाठी बेड रिकामा करून दिला’ अशा बातम्या विविध स्थानिक आणि राष्ट्रीय माध्यमांनी प्रसारित केल्या. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि महाराष्ट्र भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही सदर घटनेबद्दल ट्विट केले आहे.

Advertisement

“मी ८५ वर्षाचा झालो आहे. संपूर्ण आयुष्य पाहिलं आहे, पण जर त्या महिलेच्या पतीचा मृत्यू झाला तर तिची मुलं अनाथ होतील. यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणं माझं कर्तव्य आहे” असे म्हणत नारायण दाभाडकरांनी त्या रुग्णाकरिता आपला बेड सोडला व कन्सेंट लेटरवर सही करून ते घरी आले. २२ एप्रिल रोजी ते घरी आले आणि २३ एप्रिल रोजी २ वाजता त्यांनी प्राण सोडला.

ही अशी माहिती देणाऱ्या लोकमत, सकाळ, टीव्ही९ मराठी यांसारख्या मराठी माध्यमांनी तर दैनिक भास्कर, NDTV, अमर उजाला यांसारख्या हिंदी माध्यमांनीही बातम्या प्रसारित केल्या आहेत. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या घटनेविषयी ट्विट करत दाभाडकरांना श्रद्धांजली वाहिली.

अर्काइव्ह लिंक

महाराष्ट्र भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनीही याच अर्थाचे ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

अर्काइव्ह लिंक

राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनीही याविषयी फेसबुक पोस्ट लिहिली होती, परंतु काही वेळाने ती पोस्ट डिलीट झाली. फेसबुकवर सदर घटनेविषयीच्या अनेक पोस्ट्स व्हायरल होत आहेत. व्हॉट्सऍपवरही अशा पद्धतीचे मेसेजेस व्हायरल झाले होते. याविषयी ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुयोग देशमुख, प्रवीण साखरे, अनिल म्हापसेकर आणि राजेंद्र काळे यांनी पडताळणी करण्याची विनंती केली.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने वाचकांच्या विनंतीवरून पडताळणीस सुरुवात केली असता सदर घटनेचे विविध कंगोरे समोर येऊ लागले.

१. व्हायरल कॉल रेकॉर्डिंग दिशाभूल करणारी

सर्व बातम्यांना खोटे ठरवणारी सोशल मीडियात व्हायरल होत असलेली एक ऑडीओ क्लिप आमचे वाचक सुयोग देशमुख यांनी पाठवली. सदर संभाषणानुसार ‘असा कुठला रुग्ण आपल्याकडे आलाच नव्हता, तसेच कुठल्याही पेशंटला स्वतःचा बेड दुसऱ्याला देण्याचा कुठलाही नियम नाही.’ असे अधीक्षकांनी सांगितल्याचे समजते.

व्हायरल क्लिपसोबत असलेल्या इमेजवर अजय प्रसाद, अधीक्षक इंदिरा गांधी रुग्णालय, नागपूर आणि शिवराम ठवरे या सामाजिक कार्यकर्त्यांत ते संभाषण असल्याचे लिहिले आहे. परंतु आम्ही ठवरे यांना संपर्क करून विचारले असता ते संभाषण इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधीक्षक डॉ. अजय नर्मदाप्रसाद केवलीया यांच्याशी झाले असल्याचे समजले.

. इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात नारायण दाभाडकर नव्हतेच

आम्ही इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे अधीक्षक डॉ. अजय नर्मदाप्रसाद केवलीया यांच्याशी संपर्क केला तेव्हा व्हायरल कॉलमधील आवाज त्यांचाच असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक बातम्यांमध्ये नारायण दाभाडकर (narayan dabhadkar) यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय, नागपूर येथे दाखल केले होते असा उल्लेख केला आहे. परंतु डॉ. अजय यांनी ही घटना नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची आहे असे स्पष्ट केले. म्हणजेच नागपूर शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे वेगळे असून महानगर पालिकेचे १०० बेड्स असणारे इंदिरा गांधी रुग्णालय वेगळे आहे.

३. दाभाडकरांनी कन्सेंट लेटरवर सही करून त्या रुग्णास बेड दिला?

सदर घटना नागपूर महानगर पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची असल्याचे समजल्यावर आम्ही पालिकेचे जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांना कॉल केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सदर घटना २२ एप्रिलची आहे. दाभाडकर या रुग्णालयात दाखल झाले होते हे खरं आहे परंतु त्यांनी इतर कुणास बेड द्यावा अशा कुठल्या कागदावर सही केली नाही तर DAMA (Discharge Against medical advice) पत्रावर सही केली आणि गेले.

वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्या विरुद्ध जाऊन घेतलेला डिस्चार्ज म्हणजे DAMA. हा असा डिस्चार्ज शक्यतो दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी घेतला जातो. परंतु नारायण दाभाडकर यांनी डिस्चार्ज घेतला आणि ते घरी गेले. ते दुसऱ्या रुग्णालयात गेले की घरी याविषयी चौकशी करण्याचा पहिल्या हॉस्पिटलचा हक्क रहात नाही त्यामुळे पुढे काय झाले याविषयी पालिका किंवा रुग्णालय अधिकाऱ्यांना माहिती नाही.

४. रुग्णालयात त्यादिवशी नेमके काय झाले?

द इंडियन एक्स्प्रेस‘च्या बातमीत इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टर शिलू चिमूरकर यांची प्रतिक्रिया आहे. त्या म्हणतात, “२२ एप्रिल रोजी सायंकाळी ५.५५ वाजता दाभाडकर यांना दाखल करण्यात आले. आम्ही त्यांना कॅज्युलिटी प्रभागात ऑक्सिजनयुक्त बेडवर ठेवले. आम्ही त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना सांगितले की त्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना मोठ्या रुग्णालयात हलवावे लागेल. ते मान्य करून निघून गेले. ते संध्याकाळी ७.५५ वाजता परत आले आणि त्यांनी दाभाडकरांना सोडण्याची मागणी केली. आम्हाला त्याचे कारण माहित नाही परंतु त्यांना मोठ्या रुग्णालयात नेले पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला. त्यांचा जावई अमोल पाचपूर यांनी संमती पत्रात सही केल्यानंतर आम्ही त्यांना वैद्यकीय सल्ल्याविरूद्ध डिस्चार्ज (DAMA) दिला.

५. त्या ४० वर्षीय रुग्णास बेड मिळाला का?

बातम्यांत सांगितल्या प्रमाणे दाभाडकर यांनी एका बाईचा आक्रोश ऐकून तिच्या ४० वर्षीय नवऱ्यासाठी तो बेड सोडला. परंतु जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी यांच्या म्हणन्यानुसार बेड रिकामा झाल्यानंतर तो कोणत्या रुग्णास द्यावा याचा सर्वस्वी हक्क रुग्णालयाचा असतो. यात पहिला रुग्ण रुग्णालयास सल्ला देऊ शकत नाही. वेटिंग लिस्ट मध्ये असणाऱ्या रुग्णांच्या क्रमवारीनुसारच बेड दिले जाते. त्यामुळे कथित घटनेप्रमाणे त्या ४० वर्षीय रुग्णास बेड मिळाला की नाही याविषयी ठोस माहिती नाही.

६. नारायण दाभाडकर यांचे निधन नेमके कधी झाले?

सदर घटनेच्या काही बातम्यांमध्ये दाभाडकर यांचे निधन डिस्चार्जनंतर ३ दिवसांनी झाले असे लिहिले आहे तर काही बातम्यांत दुसऱ्याच दिवशी झाल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर ‘ABP माझा’चा एक स्क्रीनशॉट व्हायरल होत होता, त्यात नारायण दाभाडकर सुखरूप असल्याचे कुटुंबीयांनी सांगितल्याचे लिहिले होते. परंतु ती बातमी फेक असल्याचे एबीपी माझाने स्पष्ट केले.

May be a Twitter screenshot of one or more people and text that says "abp माझा ABP माझा @abpmajhatv 12m एबीपी माझाच्या वेबसाईटवर अशी कोणतीही बातमी प्रकाशित झालेली नाही. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट हा फोटोशॉप आहे, आम्ही याची सायबर सेलकडे तक्रार करत आहोत #TeamABPMajha हপवੀরাी माझा एबीपी माझाच्या वेबसाईटवर अशी कोणतीही बातमी प्रकाशित झालेली नाही. व्हायरल होत असलेला स्क्रीनशॉट हा फोटोशाॉप आहे, आम्ही याची सायबर सेलकडे तक्रार करत आहोत Leckdown Updates| Maharashtra Carona 8 10 marathiabplive.com 51"

‘बीबीसी मराठी‘ने दाभाडकर यांची मुलगी आसावरी कोठीवान यांच्याशी संपर्क साधला त्यात त्या म्हणाल्या की “अत्यवस्थ अवस्थेत बाबा घरी आणखी काही तासच राहिले, माझ्या हातचे एक दोन घासच मी त्यांना भरवू शकले. त्यांचे हात पाय सुन्न झाले होते, नखे काळसर होत होते. अशातच त्यांनी घरी प्राण सोडले”

७. नारायण दाभाडकर फेसबुकवर ‘हयात’?

भरीस भर म्हणून फेसबुकवर नारायण दाभाडकर यांच्याविषयी चर्चा करणाऱ्या पोस्टवर ‘नारायण दाभाडकर’ याच नावाने ‘मी कुणालाही बेड दिलेलं नाही सर, अफवा आहेत सगळ्या’ अशी कमेंट आलीय. त्यातील प्रोफाईल फोटोसुद्धा दाभाडकर यांचाच आहे. परंतु आम्ही जेव्हा ते फेसबुक अकाउंट तपासले तेव्हा लक्षात आले की ते अकाऊंट फेक आहे. काल म्हणजे २८ तारखेलाच हे अकाऊंट तयार केले आहे आणि त्यावरून विविध लोकांच्या पोस्ट्सवर कमेंट केल्या जात आहेत.

May be an image of one or more people and text that says "5:22 PM Gurudas Bate and 381 others अद्धेत चव्हाण नागपूरची 120 कोटी रुपये देणगी दिल्याबद्दल ची कोणती तरी एक बातमी समाज माध्यमावर फिरत आहे. अमेय जी याबाबत काही खुलासा असेल तर नक्की कळवा. Reply 1h Like Tusharr Jagtap अद्धदत चव्हाण fake ahe te... नारायण दाभाडकर मी कुणालाही बेड दिलेलं नाही सर अफवा आहेत ह्या सगळ्या Like Reply 7m Anil s Datir S වවd सुकर्प: कुदृंवीयांनी Mahaashtra dates| Just now New Comment Write a comment... NO"

८. नारायण दाभाडकर यांच्या मुलीचे स्पष्टीकरण

बातम्या, सोशल मिडिया पोस्ट्स, चर्चा यांना पूर्णविराम देण्यासाठी दाभाडकरांची कन्या आसावरी कोठीवान यांनी हकीकत सांगणारा व्हिडीओ प्रसारित केला आहे.

या प्रतिक्रियेनुसार दाभाडकर यांनी रुग्णालय सोडण्याचे कारण थेट घरी येऊन सांगितले, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी ते याविषयी बोलले नाहीत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल पोस्ट्स आणि सर्वत्र प्रसारित झालेल्या बातम्यांतील रा.स्व. संघाचे स्वयंसेवक नारायण दाभाडकर (narayan dabhadkar) यांच्या त्यागाची घटना अर्धसत्य आहे.

प्रत्येक दाव्यातील कथनात अनेक तार्किक आणि तथ्यांच्या चुका आहेत.

  • कोरोना रुग्णास नातेवाईक सुद्धा भेटू शकत नाहीत अशा बंदिस्त ठिकाणी त्यांचे वार्ड असतात. तरीही दाभाडकर यांना नवऱ्याला बेड मिळावा म्हणून रडणाऱ्या स्त्रीचा/ नातेवाइकांचा आवाज कसा आला हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
  • त्यांच्या मुलीच्या स्पष्टीकरणात त्या सरकट रुग्ण आणि नातेवाईकांच्या आक्रोशाने बाबा व्यथित झाले अस सांगत आहेत. तरीही बातम्यांमध्ये ४० वर्षाच्या रुग्णाच्या बायकोचा आक्रोश वगैरे बाबी कुठून आल्या हे समजायला मार्ग नाही.
  • तसेच प्रत्येक बातमीत मृत्यूची वेळ वेगवेगळी कशी? कुठल्याही बातमीदाराने स्वतः जाऊन घटनेची शहानिशा कशी केली नाही याचे आश्चर्यच आहे.

नारायण दाभाडकर यांनी निस्वार्थ भावनेने बेड सोडून घरी जाण्याचा विचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यावर दिवसभर सर्वत्र झालेला उहापोह त्यांच्या नातलगांसाठी क्लेशकारकच असणार परंतु एका राज्याचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय पक्षांचे नेते, मंत्री, अधिकारी आणि राष्ट्रीय माध्यमे एखाद्याच्या मृत्यूसारख्या घटनेची खातरजमा न करता करता, तपशिलात न जाता ‘कॉपी पेस्ट’ दावे करतात, ते बघायला लागणं देखील तितकंच दुःखद.

हे ही वाचा: मोहन भागवतांनी ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे वक्तव्य केलेच नाही, ते व्हायरल कात्रण फेक!

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा