Press "Enter" to skip to content

‘कॉंग्रेस’ आणि ‘आप’ नेते मुस्लिमांच्या मदतीने आरोग्य सुविधांचा बनावटी तुटवडा निर्माण करताहेत?

जनसामान्यांमध्ये पंतप्रधान मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी कॉंग्रेस आणि आप या विरोधी पक्षांतील नेते मुस्लीम समाजाला हाताशी धरून देशात विविध ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर्स, रुग्णालयातील बेड्सचा बनावटी तुटवडा निर्माण करत आहेत. अशा दाव्यांचा लांबलचक मेसेज सोशल मीडियातून व्हायरल होतोय.

Advertisement

*गजब सूचना*1. सबसे पहले नोएडा, गाजियाबाद में *डीएम ने छापा मारा ..* अस्पतालों में तो *फर्जी मरीज लेटे थे*डीएम ने…

Posted by हिन्दू आलोक on Tuesday, 18 May 2021

अर्काईव्ह लिंक

हिंदुत्व, भाजपा महिला मोर्चा कैथल २०२१, RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्र हित सर्वोपरी, अपना प्रयागराज, मोनिका मिश्र सनातन ही मेरी पेहचान, धर्मयुद्ध, ठाकूर उपदेश राणा हिंदू सुरक्षा दल, विश्व हिंदू वाहिनी आणि जागरूक हिंदू या नावांच्या फेसबुक ग्रुप्सवर ती पोस्ट शेअर केली गेली आहे.

हीच पोस्ट मेसेज स्वरुपात व्हॉट्सऍपवरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर व्हॉट्सऍपने ‘forwarded many times’ असा टॅग देखील लावला आहे. ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक रविंद्र खांबेकर यांनी हा मेसेज निदर्शनास आणून दिला आणि पडताळणीची विनंती केली.

पडताळणी:

व्हायरल दाव्यात एकामागे एक चार दावे आहेत. यांविषयी ‘चेकपोस्ट मराठी’ने केलेली पडताळणी पुढीलप्रमाणे:

१. दावा: नोएडा गाझियाबाद मध्ये ‘फर्जी’ रुग्णांनी बेड्सवर कब्जा केला होता. जिल्हाधिकाऱ्याने सर्वाना पोलिसांच्या गाडीत भरून भरून नेले आणि डॉक्टर्सची उलटतपासणी केली तेव्हा लक्षात आले की या मागे कॉंग्रेस नेत्याचा हात आहे.

वस्तुस्थिती: या घटनेची बातमी प्रसिद्ध झाली आहे का हे तपासण्यासाठी कीवर्ड्सच्या आधारे आम्ही सर्च केले असता २४-२५ एप्रिल २०२१च्या आसपास विविध माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्या सापडल्या.

बातम्यांनुसार जिल्हाधिकारी आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांच्या पाहणीत नोएडामधील विविध हॉस्पिटल्समध्ये २०० रुग्ण असे आढळले ज्यांची लक्षणे सौम्य होती. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेण्याची गरज नव्हती. एकूण १३ खाजगी रुग्णालयांचा मिळून हा आकडा असून त्या रुग्णांना घरी पाठवण्यात आले.

गरज नसताना ऍडमिट करून घेतले, सरकारी सूचनांचे पालन केले नाही आणि बेड्स शिल्लक नसल्याचे खोटेच जाहीर केले म्हणून या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल असे जिल्हाधिकारी सुहास एल. वाय. यांनी सांगितले. परंतु एकाही बातमीत कॉंग्रेस पक्षाचा किंवा कुठल्याही नेत्याचा यात हात असल्याचा उल्लेख नाही.

२. दावा: कर्नाटकात मुस्लीम लोकांनी १५०० बेड्सवर कब्जा करून ठेवला होता. यात मुस्लीम कमिशनरचा हात होता. हा घोटाळा खासदार तेजस्वी सूर्या यांनी उघडा पाडला.

वस्तुस्थिती: या घटनेविषयी या आधी देखील अनेक दावे व्हायरल झाले होते. त्यावेळीच ‘चेकपोस्ट मराठी’ने सविस्तर पडताळणी केली होती. तो रिपोर्ट ‘येथे‘ वाचा.

बंगळूरूमध्ये कोव्हीड रुग्णांच्या मदतीसाठी तयार केलेल्या ‘बँगलोर साउथ वार रूम’ मधून बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी मनमानी पैसे घेतले जात आहेत, भ्रष्टाचार होत आहे असा आरोप झाला होता.

त्याच संदर्भात तेजस्वी सूर्या चौकशीसाठी गेले असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला. व्हिडीओमध्ये सूर्या ज्या नावांचा उल्लेख करत आहेत ती सर्व नावे वॉर रूममधील कॉलसेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आहेत. त्या नावांवर बेड्स बुक नव्हते.

पोलीस कमिशनर कमल पंत यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार सिसिबीने ४ लोकांना अटक केली आहे. यात नेत्रावती आणि रोहित कुमार असे दोन कर्मचारी आणि रेहान व सतीश हे दोन डॉक्टर अटकेत आहेत.

विनाकारण मुस्लीम कर्मचाऱ्यांना समाजात बदनाम केल्याने सूर्या यांच्यावर टीकेची झोड उठलेली. यावर प्रायश्चित्त म्हणून त्यांनी कर्मचाऱ्यांची माफी मागितली.

३. दावा: दिल्लीमध्ये कालरावर छापा पडला आणि आम आदमी पक्षाचे नेते हुसैन यांच्या घरी ६०० ऑक्सिजन सिलेंडर सापडले.

वस्तुस्थिती: ६ मे २०२१ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार दिल्लीमध्ये उद्योजक नवनीत कालराच्या हॉटेल्सवर दिल्ली पोलिसांनी छापे मारले. यात ५०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जप्त केले. त्यानंतर कालरा फरार झाला होता. १७ मे रोजी दिल्ली पोलिसांनी कालराला अटक केली आणि आता केस चालू आहे. या संपूर्ण घडामोडीत कुठेही आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे नाव नाही.

कालरा फरार झाल्यानंतर कालराचे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी व्यक्तीगत संबंध असल्याचा दावा करणारे फोटोज व्हायरल झाले होते. अर्थात राहुल आणि सोनिया गांधी यांच्याबरोबरच्या फोटोत दिसणारी व्यक्ती कालरा नसल्याचे आमच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले होते. याविषयीचा रिपोर्ट आपण येथे वाचू शकता

दुसरी घटना, दिल्लीचे आरोग्यमंत्री, आप नेते इम्रान हुसैन यांच्या फार्म हाउसवर छापे पडले असून त्यांनी साठवलेल्या ५०० सिलिंडरचे फोटोज असल्याचे दावे सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्याच दाव्यांचा आधार घेत दिल्ली उच्च न्यायालयात चौकशी व्हावी म्हणून याचिका दाखल झाली होती.

१३ मे रोजीच्या बातमीनुसार न्यायालयाने चौकशी केली आणि हुसैन हे निर्दोष आढळले. या संदर्भातील याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवली.

४. दावा: दिल्ली पोलिसांनी युक्ती लढवत रुग्णालयांत खोटेच शिंकणाऱ्या टीमला धाडले. जे लोक कोरोना नसताना बेड्स अडवून बसलेले ते घाबरून पळून गेले. असे ३००० बेड्स रिकामे झाले तेव्हा केजरीवाल यांनी माध्यमांत येऊन स्वतःची जाहिरातबाजी केली.

वस्तुस्थिती: हे खरे आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या दहा दिवसांत ३००० बेड्स रिकामे झाल्याचे जाहीर केले. हे सांगताना त्यांनी कोव्हीड१९ रुग्णांची आकडेवारी जवळपास ८५०० ने आणि टक्केवारी १२ ने कमी झाल्याचे सांगितले. ही बातमी जरी खरी असली तरी व्हायरल दाव्यात सांगितल्याप्रमाणे दिल्ली पोलिसांनी युक्ती करत खोटेच शिंकणाऱ्यांची टीम पाठवली आणि बेड्स खाली झाले या स्वरूपाच्या अधिकृत बातम्या कुठेही उपलब्ध नाहीत. ना दिल्ली पोलिसांनी अशा घटनेचा उल्लेख केल्याचे आम्हाला आढळले.

हे ही वाचा: ‘हमे हॉस्पिटल नहीं, मंदिर चाहिए’ म्हणणाऱ्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे दावे फेक!

More from कोरोनाMore posts in कोरोना »
More from राजकारणMore posts in राजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा