Press "Enter" to skip to content

प्रजासत्ताक दिनी भारत मातेच्या पूजनास विरोध करणारी महिला जिहादी होती? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!

ठाणे जिल्ह्यातील एका सोसायटीमध्ये एका महिलेने प्रजासत्ताक दिन समारंभात अचानक घुसून भारतमातेचा फोटो ताब्यात घेतला आणि सुरक्षारक्षकांना मारहाण केली. आता सोशल मीडियावर या घटनेसंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Advertisement

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओसोबत दावा केला जातोय की या प्रकरणातील महिला मुस्लिम असून तिचे नाव ‘फातिमा खान’ असं आहे. महाराष्ट्रात देशविरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार असल्याने या ‘जिहादी’ महिलेने प्रजासत्ताक दिवशी भारत मातेचा अपमान करून देखील तिला तिच्याच भाषेत उत्तर देण्यात आलं नाही.

“बघा काय परिस्थिती आली आहे 26 जानेवारीला.!
भारतमातेच्या फोटोच्या पूजनाला कशी विरोध करते ही so called secular महिला…..,
एवढी दादागिरी करतात?!
कुठे आहेत हिंदुत्ववादी नेते?
महाराष्ट्रात नक्की हिंदुत्ववादी सेनेचीच सरकार आहे ना..?
एवढी हिंमत येते कशी या लोकांना….?
अजून जे नालायक हिंदू आहेत ते या गोष्टीला पण support करतील…..”

अशा कॅप्शनसह तोच व्हिडीओ व्हॉट्सऍप आणि फेसबुकवर जोरदार व्हायरल होतोय.

‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक सुहास देशपांडे, प्रकाशभाऊ जगताप, संजय राजवाडकर, एल.बी.चौधरी, कैलास ढवळे,बळीराम पाटील, निलेश घरत आणि निसार अली यांनी सदर दाव्याची पडताळणी करण्याची विनंती केली.

Lady opposed bharat mata worship thane viral posts on facebook
Source: Facebook

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने काही कीवर्ड्ससह गुगल सर्च केले असता विविध बातम्या सापडल्या.

बातम्यांमधील माहिती:

बातम्यांनुसार सदरची घटना ठाण्याजवळील लोढा अमारा कॉम्प्लेक्स मधील आहे. महिलेने गोंधळ घातल्यानंतर तिच्या विरोधात कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. बातमीमध्ये असाही उल्लेख आहे की तिची मानसिक स्थिती ठीक नाही. या आधीही तिच्यावर कसल्याशा गुन्ह्याची नोंद आहे.

पोलिसांची माहिती:

‘चेकपोस्ट मराठी’ने कापूर बावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांच्याशी संपर्क साधून व्हायरल व्हिडीओतील महिला नेमकी कोण आहे? तिच्या या वागण्यामागे तिचे कारण काय होते? याविषयी विचारणा केली.

“सोशल मीडियावरील व्हायरल दावे निराधार आहेत. या घटनेमध्ये कुठलाही धार्मिक अँगल नाही. ती महिला पंजाबी हिंदू आहे. घटना ज्या ठिकाणी घडली त्या भागात ती तिच्या आई वडिलांसह भाड्याने राहते. बेरोजगारी, कौटुंबिक समस्या अशा काही कारणांमुळे तिची मानसिक स्थिती खराब आहे. त्यामुळे नागरिकांना आवाहन करण्यात येतेय की त्यांनी चुकीच्या पोस्ट्स व्हायरल करू नयेत.”

– उत्तम सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कापूर बावडी पोलीस स्टेशन

व्हिडीओतील महिलेचे वाक्य:

व्हायरल व्हिडीओ जर आपण व्यवस्थित पाहिलात तर ०.४२ सेकंदाच्यापुढे ती महिला भारत मातेची प्रतिमा देण्यास विरोध करताना म्हणतेय “मुझे कुछ नहीं बोलना है, मुझे सिर्फ फोटो पकडना है. क्योंकी ये माताराणी की फोटो है तुम्हारे मर्दों के हात नहीं दे सकती” या वाक्यातून ती महिला ना मुस्लीम वाटतेय ना नास्तिक.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की ठाण्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतमातेच्या पूजनास विरोध करणारी महिला मुस्लीम किंवा जिहादी असल्याचे व्हायरल दावे चुकीचे आहेत. ती महिला हिंदूच असून तिच्या मानसिक स्थितीमुळे तिच्याकडून हे घडले आहे.

हेही वाचा: भाजपची ‘टिपू सुलतान’वर दुटप्पी भूमिका, महाराष्ट्रात वाद आणि दिल्लीत चित्ररथ? वाचा सत्य!

(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.

आपण फेसबुकट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता) 

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा