सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये एक महिला रडताना बघायला मिळतेय. दावा केला जातोय की ही महिला जम्मू काश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकची (Yasin Malik) पत्नी असल्याचे सांगितले जातेय. विशेष न्यायालयाने यासिन मलिकला दहशतवादी कारवयांना पैसा पुरवल्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर मलिकच्या पत्नीला रडू कोसळल्याचा दावा केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल व्हिडिओतील महिला खरंच यासिन मलिकची पत्नी आहे का हे पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम गुगलवर यासिन मलिकच्या पत्नीचा शोध घेतला. मलिकच्या पत्नीचे नाव मुशाल हुसैन मलिक असून मुशाल यांच्या गुगलवर उपलब्ध असणाऱ्या फोटोजवरून हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी महिला मलिकची पत्नी मुशाल नाही.
मुशाल मलिक पाकिस्तानी असून त्या वारंवार आपले पती निर्दोष असल्याचे सांगत आहेत. न्यायालयाने यासिन मलिकला दोषी ठरविल्यानंतर त्यांनी एका ट्विटच्या माध्यमातून आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असं म्हंटलंय.
या आधीही मुशाल मलिक यांनी २०१९ साली भारतावर बेछूट आरोप करत यासीन मलिकला कशाप्रकारे त्रास दिला जातोय हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात दिसणारी महिला आणि व्हायरल व्हिडीओमधील महिला वेगवेगळ्या आहेत हे सहज लक्षात येते.
व्हायरल व्हिडीओतील महिला कोण?
व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे हे शोधण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्च आणि गुगल किवर्डसच्या आधारे शोध घेतला. आम्हाला GNN या पाकिस्तानी माध्यम संस्थेच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवरून 25 मे रोजी हा व्हिडीओ अपलोड केला गेला असल्याचे आढळून आले. व्हिडिओच्या कॅप्शननुसार हा माजी पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या नेतृत्वाखालील आझादी मार्च दरम्यानचा असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकार विरोधात आझादी मार्च काढला होता. हा मार्च इस्लामाबादेत पोहोचल्यानंतर इमरान खान समर्थक जमाव आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात सैनिकांमध्ये झटापट झाली होती. इमरान खान समर्थकांकडून मेट्रो स्टेशनची जाळपोळ देखील करण्यात आली होती. या दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीत सैनिकांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. या घटनेत अनेकजण जखमी देखील झाले होते.
“PTI Azad Kashmir” या ट्विटर हॅण्डलवरून देखील २६ मे रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये मार्च काढणाऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओ मध्ये दिसणारी महिला नेमकी कोण आहे, याविषयीची खात्रीशीर माहिती मिळू शकली नाही. मात्र ती महिला यासिन मलिकची पत्नी नाही एवढे नक्की.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमध्ये रडताना बघायला मिळत असलेली महिला जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकची पत्नी नाही. शिवाय या व्हिडिओचा यासिन मलिकला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेशी देखील काहीही संबंध नाही. व्हिडीओ पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या आझादी मार्च दरम्यानचा आहे.
हेही वाचा- ज्ञानवापी मशिद- शिवलिंग संदर्भात फेकन्यूजचा सूळसुळाट! वाचा महत्वाच्या व्हायरल दाव्यांचे सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment