पोलिसांशी हुज्जत घालत सामान्य जनतेला अडवण्यासाठी लावलेले पत्रे तोडून ट्रेनकडे धावणाऱ्या जमावाचा व्हिडीओ डोंबिवली स्टेशनवरील असल्याचे सांगत व्हायरल होत आहे.
शेकडो लोक रेल्वे स्टेशनच्या जिन्यावरून खाली जात आहेत. पोलीस त्यांची अडवणूक करत आहेत. परंतु जमाव त्यांच्याशी हुज्जत घालतोय आणि शेवटी संतापाने अडवणूक करण्यासाठी ठोकलेले पत्रे तोडतोय.
हा सर्व प्रकार डोंबिवली स्टेशनवरील असल्याचे सांगत सदर व्हिडीओ मुंबई आणि आसपासच्या परिसरात वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरत आहे. हा सर्व प्रकार ‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक करण गायकवाड यांनी निदर्शनास आणून दिलाय.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने पडताळणी करताना व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित तपासला तेव्हा त्यातील काही लोकांचे मराठी संवाद ऐकून सदर व्हिडीओ महाराष्ट्रातील असल्याचे स्पष्ट झाले.
परंतु नेमक्या कोणत्या स्टेशनवरील हे दृश्य आहे हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नसल्याने आम्ही विविध पद्धतीने गुगल सर्च करून पाहिले. परंतु डोंबिवली स्टेशनचा असा कुठला व्हिडीओ किंवा बातमी आमच्या निदर्शनास आली नाही.
आम्ही जेव्हा सर्च कीवर्ड्समधून डोंबिवली काढून सर्च केले तेव्हा ‘मुंबई मिरर’ची एक बातमी सापडली. हाच व्हिडीओ शेअर करून त्यांनी बातमी दिलेली आहे.
सदर बातमीत ही घटना नालासोपारा स्टेशनवरील असल्याचे सांगितले आहे.
नालासोपारा स्टेशनवर केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांसाठीच नव्हे तर इतर नोकरदारांसाठी सुद्धा लोकल सेवा चालू करावी अशी मागणी करण्यासाठी लोकांनी ट्रॅक अडवला होता.
इंडिया टीव्हीने दिलेल्या बातमीत रेल्वे अधिकाऱ्यांनी ही घटना २२ तारखेला सकाळी आठ वाजता घडल्याचे सांगितले आहे. इंडिया टीव्हीने बातमीमध्ये वापरलेला फोटो आणि व्हायरल व्हिडीओ निरखून पाहिल्यास प्रवासी जिना आणि झाड हे साम्य लक्षात येईल.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये रेल्वे स्टेशन वरील पत्रे तोडून ट्रेनकडे धावणाऱ्या जमावाचा व्हायरल व्हिडीओ डोंबिवलीचा नसून नालासोपारा येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: पुण्याच्या ससून रुग्णालयातील रुग्णांची गर्दी म्हणत व्हायरल होतोय बिहारमधील व्हिडीओ!
Be First to Comment