सोशल मीडियात एक ड्रोन व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये धबधब्यात पाण्याचा आनंद घेणारे काही पर्यटक बघायला मिळताहेत. मात्र अचानक पाण्याची पातळी वाढते आणि पर्यटक वाहताना दिसू लागतायेत. दावा केला जातोय की हा व्हिडीओ कारवारजवळील नागरामडी धबधब्याचा (Nagarmadi Waterfall) असून या दुर्घटनेत चार महिलांसह सहा जणांचा बुडून मृत्यू झाला.
व्हायरल दावा:
‘कारवार : कारवारपासून १४ किमी अंतरावर असलेल्या नागरामडी धबधब्यात रविवारी चार महिलांसह सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गोव्यातील सुमारे 40 पर्यटक वेगवेगळ्या गटात धबधब्याला भेट देण्यासाठी आले होते. दुपारी दोनच्या सुमारास खाडीतील पाण्याचा जोर वाढू लागला आणि पाण्यात असलेले काही पर्यटक बाहेर आले. मात्र किनाऱ्यावर पोहोचू न शकलेले सहा जण वाहत्या पाण्यात वाहून गेले. घटनास्थळी एका पर्यटकाने चार महिला आणि एका पुरुषाच्या बुडण्याच्या घटनेची नोंद केली आहे. त्याचवेळी दुसऱ्या गटातील एक व्यक्तीही वाहून गेली. धबधब्यांमध्ये आंघोळ करताना सावधगिरी बाळगा… काही उंच प्रदेशात पावसामुळे पाणी अचानक वाहून जाऊ शकते आणि अशा प्रकारे विनाश होऊ शकतो. कृपया ते तुमच्या मुलांना दाखवा त्यांनाही समजेल.’
‘चेकपोस्ट मराठी‘चे वाचक चंद्रकांत कापुरे यांनी फेसबुक आणि व्हॉट्सऍपवर हा व्हिडीओ आणि तेच दावे जोरदार व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून देत पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
‘चेकपोस्ट मराठी’ने व्हायरल दाव्याच्या अनुषंगाने गुगलसर्च केले असता असे लक्षात आले की कारवारजवळील धबधब्यात अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. यामध्ये ६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. परंतु ती आताची नव्हे तर १८ सप्टेंबर २०१७ रोजीची घटना आहे. हे पर्यटक गोव्यामधील मडगावचे रहिवासी होते.
व्हायरल व्हिडीओ हा ड्रोन कॅमेराने शुट केलेला आहे. तसेच त्या व्हिडीओतील दृश्ये आणि वरील बातमीतील दृश्ये बरीच वेगवेगळी आहेत. त्यामुळे आम्ही साशंक होऊन व्हिडीओच्या की फ्रेम्स रिव्हर्स इमेज सर्च केल्या असता आम्हाला २७ सप्टेंबर २०२१ रोजीचे एक ट्विट दिसले. या ट्विटमध्ये तोच व्हिडीओ शेअर केलेला आहे. कॅप्शनमधील मजकूर ‘मलय’ भाषेतील असल्याचे गुगल ट्रान्सलेटरच्या मदतीने समजले. त्याचा अर्थ असा:
“यामुळेच मला धबधब्यात अंघोळ करण्याची भीती वाटते. पाण्याची पातळी कधीही अचानकपणे वाढू शकते. फ़िलिपाइन्समधील सेबु येथील धबधब्याच्या अपघाताची दृश्ये. सौजन्य: द बेस पीएच”
कॅप्शनमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे शोधाशोध केली असता फिलिपाईन्सच्या सेबु येथील टिनूबदान धबधब्यावर २६ सप्टेंबर २०२१ रोजी सदर घटना घडली असल्याचे समजले. याविषयी स्थानिक माध्यमांत बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. RZ Views या युट्युब चॅनलवरून घटनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ सप्टेंबर रोजी पूर्ण लांबीचा व्हिडीओ अपलोड केला होता. व्हायरल व्हिडीओ केवळ २.२० मिनिटांचा आहे परंतु आम्हाला सापडलेला व्हिडीओ ४.२२ मिनिटांचा अनकट व्हिडीओ आहे. त्यामध्ये बेपत्ता आणि नंतर मृत घोषित केलेल्या व्यक्तींची नावेही दिलेली आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की कारवारजवळील नागरामडी धबधब्यात गोव्याच्या ६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची बाब खरी असली तरी ती घटना आताची नसून २०१७ सालची आहे. तसेच सध्या व्हायरल होत असलेला थरारक व्हिडिओ हा त्या घटनेचा नसून फ़िलिपाइन्समधील २०२१ साली घडलेल्या घटनेचा आहे.
व्हिडीओसंबंधी व्हायरल होणारे दावे फेक असले तरीही त्यातील संदेश नक्कीच महत्वाचा आहे. निष्काळजीपणाची किंमत थेट जीवाने मोजावी लागू शकते.
हेही वाचा: हिंदू वस्त्यांमध्ये रासायनिक भेसळ असणारे अन्नपदार्थ विका असा ‘दारूल उलुम देवबंद’चा फतवा? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती ‘ चेकपोस्ट मराठी’च्या 9172011480 या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वा… […]
[…] हेही वाचा: पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वा… […]
[…] हेही वाचा- पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वा… […]