Press "Enter" to skip to content

महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही!

दिल्ली भाजपचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ३० सेकंदांचा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये एक पाण्याचे टँकर निर्घृणपणे काही महिलांना चिरडत असल्याचं दिसतंय. नवीन कुमार यांनी दावा केलाय की हा व्हिडीओ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यानचा आहे.

Advertisement

अर्काइव्ह पोस्ट

भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रमुख प्रीती गांधी यांनी देखील हा व्हिडीओ साधारणतः अशाच दाव्यासह पोस्ट केलाय.

अर्काइव्ह पोस्ट 

एकीकडे भाजपकडून हा व्हिडीओ दिल्ली ट्रॅक्टर परेड दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात असतानाच काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी हाच व्हिडीओ शेअर करत भाजप कार्यकर्त्याने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला निघालेल्या महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडल्याचा दावा केलाय.

अर्काइव्ह पोस्ट

पडताळणी:

गुगल किवर्डच्या साहाय्याने घटनेविषयी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता दै. जागरणच्या वेबसाईटवर २६ जानेवारी रोजी प्रसिद्ध बातमीत घटनेची सविस्तर माहिती मिळाली.

दै. जागरणच्या बातमीनुसार घटना पंजाबमधील अमृतसर येथील वल्ला या ठिकाणची आहे. सर्व महिला सुखमणी साहिब सेवा सोसायटी वल्लाच्या अध्यक्षा बीबी केवलबीर कौर यांच्या नेतृत्वात कृषी सुधारणांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ वल्ला चौकाकडे निघाल्या होत्या.

त्याच वेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने चिरडल्याने यातील दोन महिलांचा मृत्यू झाला. निंदर कौर आणि सिमरजित कौर अशी मृत महिलांची नावे आहेत. उपस्थितांनी ट्रॅक्टर चालक गुरलाल सिंह याला पकडून प्रभारी इन्स्पेक्टर संजीव कुमार यांच्या ताब्यात दिले.

‘अमर उजाला’च्या वेबसाईटवर देखील या दुर्घटनेची बातमी बघायला मिळाली. या बातमीनुसार ट्रॅक्टर चालक गुरलाल सिंह याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. पोलिसांच्या चौकशीत समोर आले की ट्रॅक्टर चालक गुरलालला ट्रॅक्टर चालवता येत नव्हते. शिवाय त्याच्याकडे लायसन्स देखील नव्हते.

ट्रॅक्टर चालकाने जाणीवपूर्वक महिलांना चिरडले नाही, तर ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. ट्रॅक्टर चालक भाजप कार्यकर्ता असल्याचे देखील कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की भाजप आणि दोन्हींकडून चुकीचे दावे केले जाताहेत. भाजपने दावा केल्याप्रमाणे महिलांना चिरडत असलेल्या ट्रॅक्टरचा व्हिडीओ दिल्लीतील ट्रॅक्टर परेड दरम्यानचा नाही. व्हिडीओ पंजाबच्या अमृतसरमधील आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी कुणाच्याही अंगावर ट्रॅक्टर चालवलेला नाही.

काँग्रेसकडून केल्या जात असलेल्या दाव्याला देखील कुठलाही आधार नाही. व्हिडीओमधील प्रकार घातपाताचा नसून चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालेला आहे. ट्रॅक्टर चालक भाजपचा कार्यकर्ता किंवा भाजपशी संबंधित असल्याचे देखील कुठलेही पुरावे उपलब्ध नाही.

हे ही वाचा- शेतकऱ्यांनी तिरंग्याचा अपमान केल्याचे सांगण्यासाठी शेअर केला जातोय अमेरिकेतील खलिस्तानवाद्यांचा व्हिडीओ!

More from राजकारणMore posts in राजकारण »

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा