पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narednra Modi) यांनी 28 ऑगस्ट 2022 रोजी गुजरातमध्ये नर्मदा कालव्याचे उद्घाटन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी कच्छ जिल्ह्यातील भुजमध्ये रोड शो केला. पंतप्रधानांनी 2 सप्टेंबर रोजी त्यांनी मंगळुरूलाही भेट दिली. मंगळुरुमध्ये पंतप्रधानांनी 3,800 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी केली.
पंतप्रधानांच्या कच्छ आणि मंगळुरु दौऱ्यानंतर अनेक भाजप नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय. व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी सभेला जमलेल्या लोकांना अभिवादन करताना दिसताहेत. काही भाजप नेत्यांकडून तो गुजरातमधील कच्छ येथील सभेचा असल्याचे सांगण्यात येतेय, तर काही नेत्यांनी हा व्हिडीओ मंगळुरु येथील असल्याचा दावा केलाय.
पडताळणी:
भाजप नेत्यांकडून वेगवेगळ्या ठिकाणचा म्हणून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओच्या किफ्रेम्स रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधल्या असता भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून एप्रिल 2019 मध्ये हा व्हिडीओ ट्विट केला गेला असल्याचे बघायला मिळाले. 3 एप्रिल 2019 रोजी करण्यात आलेल्या या ट्विटनुसार व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता येथील दौऱ्याचा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून देखील 3 एप्रिल 2019 रोजीच हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. या ट्विटच्या कॅप्शनमध्ये देखील व्हिडीओ कोलकात्यातील असल्याचे सांगण्यात आले होते.
विशेष म्हणजे आता पंतप्रधानांच्या कच्छ येथील भव्य स्वागताचा व्हिडीओ म्हणून ट्विट केलेल्या प्रीती गांधी यांनी देखील 2019 मध्ये देखील हा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यांनी देखील आपल्या पूर्वीच्या ट्विटमध्ये व्हिडीओ कोलकात्यातील असल्याचे म्हंटले आहे.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे की भाजप नेत्यांकडून पंतप्रधानांच्या कच्छ आणि मंगळुरुमधील भव्य स्वागताचा म्हणून शेअर केला जात असलेला व्हिडीओ साडेतीन तीन वर्षांपेक्षा जुना असून तो व्हिडीओ पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील सभेचा आहे.
हेही वाचा- राहुल गांधींचा आपण स्वतः महात्मा गांधींशी संवाद साधल्याचा दावा? वाचा सत्य!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
Be First to Comment