सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. व्हिडीओसोबत दावा केला जातोय की व्हिडिओत दिसणाऱ्या बापाला आपल्या मान-सन्मानाच्या संरक्षणासाठी आपल्याच मुलीसमोर आपली पगडी उतरावी लागतेय. (love jihad)अशी मुलगी मेलेलीच चांगलं.
साधारणतः अर्ध्या मिनिटाच्या या व्हिडिओत एक बुजुर्ग व्यक्ती आपल्या डोक्यावरील पगडी काढून ती एका मुलीसमोर ठेवताना दिसतोय. ईश्वर वशिष्ठ या युजरने ट्विट केलेला हा व्हिडीओ जवळपास १९०० युजर्सकडून रिट्विट करण्यात आलाय.
‘सुदर्शन न्यूज चॅनेल इंग्लिश’ या फेसबुक पेजवरून देखील हाच फोटो याच दाव्यासह शेअर करण्यात आलाय. तो जवळपास १४०० युजर्सनी शेअर केलाय.
याव्यतिरिक्त अनेक फेसबुक पेजेस आणि ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ त्याच कॉपीपेस्ट दाव्यांसह प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय.
पडताळणी:
पडताळणी दरम्यान आम्हाला ‘रॉयल राईका’ नावाच्या फेसबुक पेजवरून अपडेट करण्यात आलेली एक पोस्ट मिळाली. या पोस्टनुसार सदरील घटनेसंदर्भात अफवा पसरविण्यात येत असून एका विशिष्ट समाजाला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे करण्यात येतंय. हे ‘लव्ह-जिहाद’चं (love jihad) प्रकरण नसून लग्नातील दोन्हीकडची लोकं ‘रबारी’ समाजातील असल्याचं पेजच्या ऍडमिनने ‘अल्ट न्यूज’शी बोलताना सांगितलंय.
घटनेमधील ‘लव्ह-जिहाद’चा अँगल स्पष्टपणे फेटाळून लावण्यात आलाय. मुलीचे नाव सीता असून मुलाचे नाव लखराम आहे. मुलगा-मुलगी दोघेही एकाच समाजातील असून आनंदाने पुण्यात राहताहेत.
‘अल्ट न्यूज’शी बोलताना मुलगा लखराम याने सांगितले की ‘आम्ही एकाच समाजातील आहोत आणि समाजाच्या संमतीने लग्न केले आहे. आमच्या लग्नाला एक महिना झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चुकीच्या दाव्यांसह व्हायरल झाला आहे. आम्ही कोर्टात लग्न करत असताना सीताचे वडील तिला तसं न करण्याची गळ घालत होते. त्यावेळीच कुणीतरी व्हिडीओ शूट केला आणि व्हायरल केला’
वस्तुस्थिती:
सोशल मीडियावर ‘लव्ह-जिहाद’च्या अँगलने व्हायरल करण्यात येत असलेल्या व्हिडिओतील मुलगी सीता राजस्थानमधील आहे. सीताचे लखरामशी लग्न झालेले असून दोघेही राजस्थानमधील रैबारी (हिंदू) समाजाचे आहेत.
मुलीने कोर्टात लग्न करू नये यासाठी आपल्या मुलीची मनधरणी करत असलेल्या पित्याचा व्हिडीओ मान-सन्मान आणि ‘लव्ह-जिहाद’च्या अँगलने शेअर करण्यात येतोय पण ‘लव्ह-जिहाद’चा दावा निखालस खोटा आहे.
हे ही वाचा- ‘लव्ह जिहाद’मध्ये ‘प्रेरणा व्यास’चा खून दाखवण्यासाठी वापरलेले फोटो भलत्याच मुलींचे!
Be First to Comment