बीडमधील विवेक रहाडे या १८ वर्षीय विद्यार्थ्याने नीटची परीक्षा अवघड गेली आणि आता मराठा आरक्षण सुद्धा राहिलं नाही म्हणून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. दाव्याच्या समर्थनार्थ त्या विद्यार्थ्याची सुसाईड नोट (vivek rahade suicide note) देखील सोशल मीडियातून व्हायरल होत होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनीही अशा प्रकारच्या आणखी प्रतिक्रिया उमटू नयेत यासाठी राज्य सरकारने लवकरात लवकर पाऊले उचलावीत हे सुचविण्यासाठी केलेल्या ट्विटमध्ये या सुसाईड नोटचा वापर केला होता.
तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनीही याच चिट्ठीचा संदर्भ देऊन ट्विट केले होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचे पुत्र सौरभ राजू शेट्टी यांनीही हीच चिट्ठी (vivek rahade suicide note) शेअर करत विद्यार्थ्यांनी असा टोकाचा निर्णय घेण्याआधी आई-वडिलांचा विचार करावा असे आवाहन ट्विटरवर केले.
पडताळणी:
‘मी विवेक कल्याण रहाडे, एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा असून जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आताच नीट ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. माझा यामध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत आन्ही. मला खाजगी महाविद्यालयात शिकविण्याची माझ्या कुटुंबियांची ऐपत नाही त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूनंतर तरी राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांना मराठ्याच्या मुलाची कीव येईल आणि माझे मरण सार्थकी होईल.’
अशा मजकुराची चिट्ठी विवेकने वहीच्या पानावर लिहिल्याचा फोटो व्हायरल होत आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना घटनास्थळी पंचनामा करतेवेळी पोलिसांना तेथे काहीच आक्षेपार्ह आढळून आले नव्हते. मात्र त्यानंतर सोशल मीडियात अचानकपणे एक चिट्ठी व्हायरल होऊ लागली. पंचनामा करतेवेळी नातवाईकांनी पोलिसांना ही चिट्ठी किंवा ती लिहिलेली वही दिली नव्हती.
ही बाब लक्षात येताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ती वही जप्त केली आणि हे त्याचेच हस्ताक्षर आहे का याचा तपास सुरु केला. यासाठी विवेकने ज्या शाळेत शिक्षण घेतले तेथून त्यांची एक उत्तरपत्रिका हस्तगत केली आणि पडताळणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे दोन्ही पाठवले. पडताळणीअंती स्पष्ट झाले आहे की हे अक्षर विवेकचे नाही. यासंबंधी एबीपी माझा, दैनिक सकाळ, माय महानगर, सरकारनामा इत्यादी माध्यमांनी बातम्या केल्या आहेत.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी‘च्या निदर्शनास आले की पोलिसांनी आपल्या तपासात हस्ताक्षर तज्ज्ञाकडून करून घेतलेल्या पडताळणीत ती व्हायरल सुसाईड नोट विवेक रहाडेची नाही असे स्पष्ट झाले आहे.
विवेकच्या आत्महत्येला मराठा आरक्षणाशी जोडण्यासाठी खोडसाळपणे कुण्या तिसऱ्याच व्यक्तीने ही चिट्ठी लिहिली आहे. त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
हेही वाचा: जिल्हाधिकाऱ्यांच्या फेक व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवल्यास ‘या’ व्यवसायावर होईल पुन्हा परिणाम!
Be First to Comment