राजस्थानमधील अलवरच्या राजगढ परिसरातील सराय बाजारातील पालिकेच्या अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेदरम्यान एक शिव मंदिर पाडण्यात आले. हे मंदिर 300 वर्षे जुने असल्याचे सांगितले जातेय. मंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरून भाजप-काँग्रेसकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येताहेत.
अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान मंदिर पाडण्याच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीये, तर काँग्रेसच्या दाव्यानुसार राजगढ पालिकेत भाजपची सत्ता असून भाजप नगरसेवक आणि सभापतींनीच ठराव पास करून मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, राजगढ मधील मंदिर पाडण्याच्या घटनेच्या संदर्भाने सोशल मीडियावर जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत असलेल्या दुसऱ्या एका मंदिराचा फोटो व्हायरल होतोय. दावा केला जातोय की हे मंदिर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या आदेशावरून पाडण्यात आले आहे.
पडताळणी:
सोशल मीडियावर शेअर केला जात असलेला फोटो रिव्हर्स सर्चच्या साहाय्याने शोधला असता ‘आज तक’च्या वेबसाईटवर 14 जून 2015 रोजी प्रसिद्ध बातमी बघायला मिळाली. या बातमीत सध्या व्हायरल होत असलेला फोटो वापरण्यात आला होता.
‘आज तक’च्या बातमीनुसार फोटो राजस्थानमधील जयपूर येथील आहे. जयपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो कॉरिडॉरसाठी शहरातील 200 वर्षांहून अधिक जुनी समजली जाणारी दोन मंदिरे पाडली होती. रोजगारेश्वर महादेव और कष्टहरण महादेव मंदिर या दोन मंदिरांमुळे मेट्रोच्या कामात अडचणी निर्माण होत असल्याने ती मंदिरे पाडण्यात आली होती.
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या बातमीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मंदिर पाडल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तसेच निषेध नोंदविण्यासाठी ‘मंदिर बचाव समिती’ची स्थापना करून दोन तासांचा ‘चक्का जाम’ पुकारण्याचे आवाहन केले होते. मेट्रोच्या कामासाठी त्यावेळी इतरही छोटी-मोठी अशी 80 मंदिरे पाडण्यात आल्याची माहिती देखील या बातमीत वाचायला मिळते.
लक्षात घेण्याजोगी बाब अशी की 2015 साली राजस्थानमध्ये वसुंधरा राजे सिंधिया (Vasundhara Raje Scindia) यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेत होते.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की मंदिर पाडण्यात येत असल्याच्या ज्या फोटोच्या आधारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर निशाणा साधत त्यांना हिंदू विरोधी ठरविण्याचा प्रयत्न केला जातोय. ते मंदिर वस्तुतः भाजप सरकारच्या काळात पाडण्यात आले होते.
जयपूर मेट्रोच्या कामात अडथळा येत असल्याने हे मंदिर पाडले गेले होते. भाजप नेत्या वसुंधरा राजे सिंधिया या त्यावेळी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होत्या.
हेही वाचा- शिवमंदिर पाडणाऱ्या कॉंग्रेस धार्जिण्या कलेक्टरला ५ लाखाची लाच घेताना पकडल्याचे दावे दिशाभूल करणारे!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] हेही वाचा- भाजप सरकारच्या काळात पाडण्यात आलेल्य… […]