सोशल मीडियावर एका रक्ताने माखलेल्या महिलेचा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचारात (bengal violence) ही महिला जखमी झाल्याचा दावा केला जातोय.
ट्विटर युजर ईशा बजाज हिने हा फोटो शेअर करत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढवलाय. शिवाय ममतांचे समर्थन करणाऱ्या महिलांचा देखील त्या धिक्कार करताहेत. बातमी लिहीपर्यंत साधारणतः १५०० ट्विटर युजर्सकडून हा फोटो रिट्विट केला गेलाय.
फेसबुकवर देखील हा फोटो याच दाव्यांसह मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.
पडताळणी:
व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला असता ‘বাংলাদেশ হিন্দুদের পহ্ম প্রতিবাদ’ या फेसबुक पेजवरून ४ नोव्हेंबर २०२० रोजी करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये आम्हाला हा फोटो मिळाला.
फोटोसोबतच्या कॅप्शननुसार बांगलादेशच्या हथजारी येथील अमन बाजारात राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबावर 1 नोव्हेंबर 2020 रोजी काही लोकांनी हल्ला केला होता. अनुकूल मास्टर, रतन नाथ आणि मुक्ता देवी ही या हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे असून असून मो. रुबेल, मो. शकील आणि मो. अरमान हे आरोपी असल्याचं देखील सांगण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी गुगलवर किवर्ड सर्च केलं असता “चट्टोग्राम प्रतिदिन” या वेबसाईटवर ५ नोव्हेंबर २०२० रोजी बंगाली भाषेत प्रसिद्ध रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार रतन कुमार नाथ त्यांची सून पुतुल नाथ आणि भाची मुक्ता राणी यांच्यावर रूबेल, शाकिब, अरमान, उस्मान, मुर्शीद यांनी हल्ला केला होता.
ट्विटरवर शोधाशोध करत असताना आम्हाला राजू दास यांचं ४ नोव्हेंबर २०२० रोजीचं ट्विट मिळालं. बांगलादेशातील चटगांव जिल्ह्यात जमीन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने एका हिंदू कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचं या ट्विटमध्ये सांगण्यात आलं होतं.
फोटोबद्दल अधिक माहितीसाठी ‘अल्ट न्युज’ने रतन नाथ यांच्याशी संपर्क साधला होता. रतन नाथ यांनी ‘अल्ट न्युज’ला दिलेल्या माहितीनुसार व्हायरल फोटोतील महिला त्यांची मुलगी अनामिक दास असून जमीनीच्या वादामुळे तिच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोचा पश्चिम बंगालमधील हिंसेशी (bengal violence) काहीही संबंध नाही. व्हायरल फोटो पश्चिम बंगालमधील नसून बांगलादेशातील आहे. फोटोत दिसणाऱ्या महिलेचे नाव अनामिका दास असून तिच्यावर नोव्हेंबर २०२० मध्ये जमिनीच्या वादातून हल्ला झाला होता. ‘
हे ही वाचा- पश्चिम बंगाल हिंसाचार: सोशल मीडियावर फेक न्यूजचा पूर!
Be First to Comment