भाजप खासदार अनिल उपाध्याय (anil upadhyay) हरणांच्या कळपावर निशाणा साधत शिकार करत असल्याच्या दाव्यासह एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात फिरत आहे.
सलमान खान अभी भी हिरणों के शिकार के लिए अदालतों का चक्कर लगा रहे हैं। लेकिन बीजेपी के इस विधायक अनिल उपाध्याय एक पार्क में हिरण को गोली मारकर शिकार करना सीख रहे हैं। इसे वायरल करें और अदालत उसे सजा दे।
Advertisement
अशा कॅप्शनसह तो व्हिडीओ शेअर केला जातोय.
‘चेकपोस्ट मराठी’चे वाचक अविनाश घोडके यांनी व्हॉट्सऍपवरही हेच दावे व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आणून दिले आणि पडताळणीची विनंती केली.
पडताळणी:
आम्ही व्हायरल व्हिडीओ व्यवस्थित पाहिला/ऐकला असता त्यात असणारी भाषा बंगाली असल्याचा अंदाज केला आणि त्यानुसार कीवर्ड्स सर्च केले असता सत्य बाब समोर आली.
- व्हिडीओतील व्यक्ती कोण?
‘द डेली स्टार’ नावाच्या बांगलादेशी वृत्तपत्राने आपल्या युट्युब चॅनलवर व्हायरल व्हिडीओचे मूळ व्हर्जन अपलोड केले होते. युट्युबच्या नियमावलीत बसत नसल्याने सध्या तो व्हिडीओ तिथे उपलब्ध नाहीये. परंतु याच वृत्तपत्राने ‘Who is the Beast?’ या मथळ्याखाली १२ जुलै २०१५ रोजी लेख प्रकाशित केला होता. त्यात दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओतील व्यक्तीचे नाव ‘मोईन उद्दीन’ असे आहे. सदर व्हायरल व्हिडीओ मोईन यांनी स्वतः फेसबुकवर अपलोड केला होता.
- ‘मोईन उद्दीन’ यांचे स्पष्टीकरण
वृत्तपत्रात एवढा मोठा लेख छापून आल्यानंतर मोईन यांनी स्पष्टीकरण देणारी फेसबुक पोस्ट टाकलीय. यात ते स्वतः ऑस्ट्रेलिया स्थित बांगलादेशी असून त्यांनी स्वतःच्या ३० एकर शेतीवर पाळलेल्या हरणातील एकाची शिकार केली होती असे सांगितलेय. त्यांचाकडे हरीण पाळण्याचा आणि बंदुक चालवण्याचा परवाना आहे असे ते म्हणतात. याविषयीचे सर्व कागदपत्र चित्तगावच्या DFOकडे त्यांनी सुपूर्द केली आहेत असेही त्यांनी सांगितले आहे.
- ‘अनिल उपाध्याय’ नावाचे भाजप नेते अस्तित्वातच नाहीत
भारतीय मतदारांना देशातील नेत्यांविषयी माहिती मिळावी या हेतून कार्यरत असलेल्या ‘myneta‘ या वेबसाईटवर सर्च केले असता ‘अनिल उपाध्याय’ नावाचे कुणी भाजप नेते अस्तित्वातच नाहीत असे समजले. उत्तर प्रदेशात अनिल उपाध्याय नावाचे २ अपक्ष नेते आणि राजस्थान मध्ये डॉ. अनिल उपाध्याय हे बहुजन समाज पक्षाचे नेते आहेत. या तिघांव्यतिरिक्त एकाही अनिल उपाध्याय नावाच्याव्यक्तीची भाजपशी संबंध असल्याची माहिती कुठेच उपलब्ध नाही.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये व्हायरल व्हिडीओसोबत अनिल उपाध्याय (anil upadhyay) नामक भाजप खासदाराने हरणाची शिकार केल्याचा दावा फेक असल्याचे निष्पन्न झाले. ना तो व्हिडीओ भारतातील आहे ना ही ‘अनिल उपाध्याय’ नावाचे कुणी भाजप नेते अस्तित्वात आहेत.
हे ही वाचा: मोदींवरील टीकेचा व्हायरल व्हिडीओ नेपाळी संसदेतील नाही, जाणून घ्या सत्य!
Be First to Comment