ट्विटरवर सध्या २०१२ सालच्या ‘हिरॉईन’ चित्रपटातील ‘हलकट जवानी’ गाण्यावर डान्स करणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. दावा करण्यात येतोय की ही व्यक्ती शिवसेनेचे नेते संजय राऊत आहेत (sanjay raut dance video).
शिवसेना-कंगना राणावत वादाच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. २००७ सालापर्यंत वरातीत नाचणारा हा माणूस आज स्वतःला शिवाजी महाराजांच्या परंपरेचा वारस सांगत असल्याचा दावा करण्यात येतोय. अनेक युजर्स मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ शेअर करताहेत.
फेसबुकवर देखील काहीशा अशाच दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करण्यात येतोय.
पडताळणी:
व्हिडीओच्या पडताळणीसाठी आम्ही वेगवेगळ्या किवर्डसह सर्च केलं त्यावेळी हा व्हिडीओ ५ डिसेंबर २०१९ रोजी ‘सरकारनामा’च्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला असल्याचे बघायला मिळाले.
व्हिडीओ शेअर करताना ‘सरकारनामा’ने दिलेल्या कॅप्शननुसार व्हिडिओत दिसणारी व्यक्ती परभणीचे लक्ष्मण भदरगे असल्याचे समजले. संजय राऊत यांच्या सारख्याच दिसणाऱ्या भदरगे यांना ‘डुप्लिकेट संजय राऊत’ म्हणून संबोधण्यात आले आहे.
व्हिडिओत दिसणारी व्यक्ती लक्ष्मण भदरगे असल्याचे समजल्यानंतर आम्ही त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. आम्हाला ‘एबीपी माझा’ या न्यूज चॅनेलचा एक रिपोर्ट मिळाला. या रिपोर्टनुसार भदरगे हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. परभणीच्या सेलू येथे एका लग्न समारंभातील त्यांचा हा व्हिडीओ (sanjay raut dance video) गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
वस्तुस्थिती:
‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये हे स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावर संजय राऊतांच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडीओ हा परभणीच्या लक्ष्मण भदरगे यांचा आहे.
व्हिडीओ वर्षभरापूर्वीचा असून त्याचा संजय राऊत यांच्याशी काहीही संबंध नाही. गेल्या वर्षी देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आनंद व्यक्त करणारे संजय राऊत म्हणून हाच व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
हे ही वाचा– संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामीला टोला लगावल्याचे व्हायरल ट्विट फेक!
Be First to Comment