Press "Enter" to skip to content

सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेतच्या फोटोमधील व्यक्ती गजानन महाराज नाहीत!

सोशल मीडियावर नेताजी सुभाषचंद्र बोस (subhash chandra bose) यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि संत गजानन महाराज यांच्या भेटीचा (gajanan maharaj) हा दुर्मिळ फोटो असल्याचा दावा केला जातोय.

मराठी कट्टा या फेसबुक पेजवरून अपलोड करण्यात आलेला हा फोटो ३९६ युजर्सकडून शेअर केला गेलाय. फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय,

Advertisement

“श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो. हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे … अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे. गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा.. *”गण गण गणात बोते “*”

श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो हा फोटो अकोला येथे महाराज येत असत…

Posted by Marathi Katta on Thursday, 23 January 2020

अर्काइव्ह लिंक

फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवरून हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पडताळणी:

व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्चची मदत घेतली. आम्हाला पिनरेस्टवर व्हायरल फोटो मिळाला. या फोटोच्या कॅप्शननुसार फोटोमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर दिसणारी व्यक्ती पुरीचे शंकराचार्य आहेत.

Source: Pint rest

हाच फोटो ‘बेटर फोटोग्राफी’ नावाच्या वेबसाईटवर देखील मिळाला. या वेबसाईटवर देखील फोटोत नेताजींबरोबर दिसणारी व्यक्ती पुरीचे शंकराचार्यच असल्याची माहिती देण्यात आली आहे. मनोरंजन घोष यांनी हा फोटो घेतला असल्याचं देखील यात सांगण्यात आलंय.

Source: Better Photography

फोटोत दिसणारी तिसरी व्यक्ती कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला असता ‘बेटर इंडिया’च्या वेबसाईवरील एका लेखामध्ये हा फोटो वापरण्यात आला असल्याचे लक्षात आले. त्यानुसार फोटोतील तिसरी व्यक्ती नेताजींचे ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन असल्याचे समजले.

Source: The Better India

‘बेटर इंडिया’वर प्रसिद्ध लेखानुसार कर्नल निजामुद्दीन यांचे खरे नाव सैफुद्दीन होते. सिंगापूर येथे नेताजींच्या सेनेत भरती झाल्यानंतर त्यांनी निजामुद्दीन हे नाव धारण केले. त्यांनी १९४३-४४ मध्ये नेताजींबरोबर म्यानमारच्या जंगलातून ब्रिटिशांविरुद्धचे युद्ध लढले. या युद्धात त्यांनी नेताजींवर चालविण्यात आलेल्या गोळ्या स्वतःच्या छातीवर घेत नेताजींचे प्राण वाचविले होते. या प्रसंगानंतरच नेताजींनी त्यांना ‘कर्नल’ ही उपाधी बहाल केली होती.

कर्नल निजामुद्दीन यांचे ६ फेब्रुवारी २०१७ रोजी निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून कर्नल निजामुद्दीन यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

वस्तुस्थिती:

‘चेकपोस्ट मराठी’च्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे की सोशल मीडियावरील व्हायरल फोटोसोबत केले जाणारे दावे चुकीचे आहेत. व्हायरल फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर संत गजानन महाराज (subhash chandra bose with gajanan maharaj) नसून पुरीचे तत्कालीन शंकराचार्य आणि नेताजींचे ड्रायव्हर कर्नल निजामुद्दीन आहेत. हा फोटो मनोरंजन घोष यांनी काढलेला आहे.

हे ही वाचा- राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आलेले पोर्ट्रेट सुभाषबाबुंचेच, सोशल मीडियावरील दावे चुकीचे!

More from समाजकारणMore posts in समाजकारण »

Be First to Comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.

    × न्यूज अपडेट्स मिळवा