Press "Enter" to skip to content

‘द पिगॅसस प्रोजेक्ट’- राहुल गांधी, प्रशांत किशोर यांच्यासह अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांवर पाळत!

केवळ सरकारी एजन्सीलाच सेवा पुरवणाऱ्या NSO या इजरायली कंपनीच्या स्पायवेअरच्या माध्यमातून जगभरातील अनेक पत्रकार, राजकीय नेते, मानवी हक्क कार्यकर्ते यांच्यावर पाळत ठेवण्यात आली असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. जगभरातील १७ महत्वाच्या माध्यम संस्थांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.

Advertisement

पाळत ठेवण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांच्यासह सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा देखील समावेश असल्याचे या खुलाश्यातून समोर आले आहे.

या प्रमुख राजकीय व्यक्तिमत्वांच्या व्यतिरिक्त भारतातील ४० पत्रकार आणि २ मंत्री अशा तब्बल ३०० जणांवर पाळत ठेवली गेली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कशी ठेवली जाते पाळत?

इजरायली कंपनी NSO च्या ‘पिगॅसस’ या स्पायवेअरद्वारे ही पाळत ठेवली गेलीय. ज्या लोकांना टार्गेट करायचे आहे त्यांच्या मोबाईलवर एसएमएस, वॉट्सऍप किंवा आयफोनवर ‘आय मेसेज’द्वारे त्यांच्या क्षेत्राशी किंवा त्यांच्या इंटरेस्टशी संबंधित लिंक पाठवली जाते अथवा व्हॉट्सऍप कॉल केला जातो. या लिंकवर क्लिक केल्यास ते स्पायवेअर ऍक्टिव्ह होऊन मोबाईलवरील कॉल, मेसेज, व्हॉट्सऍप चॅट्स, ईमेल्स, फोटोज, लोकेशन, कॉन्टॅक्ट बुक, व्हिडीओ लायब्ररी, कॅलेन्डर अशा सर्व बाबींवर पाळत ठेवून त्या कंपनीस माहिती पुरवतो.

वापरकर्त्याच्या नकळत मोबाईलचा कॅमेरा चालू होऊन त्यांचे व्हिडीओज रेकॉर्ड केले जातात. माईक चालू होऊन कुणाशी बोलत असतानाचे संभाषण रेकॉर्ड केले जाऊ शकते. ‘पिगॅसस’ स्पायवेअर नेमके कसे काम करते याविषयी ‘द गार्डियन‘ने सविस्तर रिपोर्ट पब्लिश केलाय.

कुणा-कुणावर ठेवली गेली पाळत?

ब्रिटीश माध्यम संस्था ‘द गार्डियन’च्या रिपोर्टनुसार यादीमध्ये समावेश असणाऱ्या सर्व नावांचा लवकरच खुलासा केला जाईल. जगभरातील महत्वाचे राजकीय नेते, उद्योगपती, धर्मिक नेते, शिक्षणतज्ज्ञ, एनजीओ संचालक, कामगार युनियनचे नेते आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर पाळत ठेवण्यात आलेल्यांमध्ये काही देशांच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा देखील समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय. एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाच्या जवळच्या नातेवाईकाचेही यात नाव असल्याचा खुलासा त्यात केला गेलाय.

भारतातील नेमके कोण निशाण्यावर?

  • ‘द वायर’चे संस्थापक संपादक आणि एम.के. वेणू यांचा या यादीत समावेश आहे. ‘वायर’साठीच काम करणारे प्रेमशंकर झा, रोहिणी सिंह आणि स्तंभलेखक स्वाती चतुर्वेदी यांना देखील लक्ष्य केलं गेलं असल्याचं सांगण्यात येतंय.
  • रोहिणी सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांच्या उद्योगांवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहाय्यक निखील मर्चंट यांच्याविषयीचे रिपोर्ट्स केले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उद्योगपती अजय पिरामल यांच्यातील काही डील्स देखील त्यांनी प्रकाशात आणल्या होत्या.
  • २०१८ साली राफेल घोटाळा जगासमोर आणण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत असलेले ‘द इंडियन एक्स्प्रेस’चे उपसंपादक सुशांत सिंह यांच्यावरही निगराणी होती असा उल्लेख आहे.
  • द हिंदूच्या विजैता जैन, हिंदुस्थान टाईम्सचे संपादक शिरीष गुप्ता आणि प्रशांत झा,  इंडिया टुडे, नेटवर्क 18, द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस यांसारख्या माध्यमांच्या महत्वाच्या पत्रकारांचे मोबाईल नंबर्स त्या लिस्टमध्ये आढळले आहेत.
  • नव्या अपडेटनुसार कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे २ मोबाईल नंबर्स, राजनीतिक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक अधिकारी अशोक लवासा, मंत्री अश्विन वैष्णव, प्रल्हाद पटेल आणि तृणमूल कॉंग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी यांचेही मोबाईल नंबर्स या लिस्टमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर विनयभंगाचे आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील महिला कर्मचारी, तिचे पती आणि भाऊ अशा सर्वांचे मिळून ८ मोबाईल नंबर्स देखील या निगराणीच्या लिस्टमध्ये सापडले आहेत.

भारत सरकारचे स्पष्टीकरण:

विशिष्ठ लोकांवर पाळत ठेवल्या गेल्याच्या आरोपांना सबळ पुरावा नाहीये. ‘पिगॅसस’च्या मदतीने व्हॉट्सऍपवर नजर ठेवली गेल्याचे मागेही आरोप झाले होते. त्यावेळी देखील संबंधित घटकांकडून आणि स्वतः व्हॉट्सऍपद्वारे सर्वोच्च न्यायालयात हे आरोप तथ्यहीन असल्याचे सांगितले गेले होते, असे सांगत भारत सरकारने सदर आरोप फेटाळून लावले आहेत.

या आरोपांत काही तथ्य असू शकते का?

वॉशिंगटन पोस्ट, द गार्डियन, ले मोंडे यांसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय माध्यमांनी फ्रान्सच्या  ‘फॉरबिडन स्टोरीज’ आणि ‘एमनेस्टी इंटरनेशनल’ या संस्थांच्या सहाय्याने सदर रिपोर्ट प्रकाशित केले आहेत. माध्यम जगतामध्ये या सर्व माध्यम संस्था अतिशय विश्वासार्ह मानल्या जातात.

एमनेस्टी इंटरनॅशनलच्या सिक्युरिटी लॅबने ‘इंडियन एक्सप्रेस’चे माजी पत्रकार सुशांत सिंह, ‘टीवी 18’च्या माजी वृत्तनिवेदिका स्मिता शर्मा, ‘ईपीडब्ल्यू’चे माजी संपादक परंजॉय गुहा ठाकुरता, ‘आउटलुक’चे माजी पत्रकार एसएनएम अब्दी, ‘द हिंदू’च्या विजेता सिंह आणि ‘द वायर’चे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन आणि एमके वेणु यांच्या फोनची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी केली.

तपासणी करण्यात आलेल्यांपैकी विजेता सिंह वगळता इतर सर्वांच्या फोनशी ‘पिगॅसस’ स्पायवेअर द्वारे छेडछाड करण्यात आली असल्याचे आढळले. स्मिता शर्मा यांच्या आयफोनमधील आय मेसेज द्वारे हे स्पायवेअर टाकण्याचा प्रयत्न झाल्याचे आढळले, परंतु त्यात ते यशस्वी झाले की नाही याचे सबळ पुरावे मिळाले नाहीत.

टीप: यादीतील इतर नावे हळूहळू प्रकाशित करण्यात येतील असे ‘द गार्डियन’कडून सांगण्यात आले आहे. भारतातील इतर महत्वाची नावे समोर आल्यास याच रिपोर्टमध्ये अपडेट केली जातील.

हेही वाचा: ‘गुजरात व्हेंटीलेटर ब्लास्ट आणि मोदी मोदी लिहिलेल्या १० कोटी रुपयांच्या सुटाचे कनेक्शन?’ वाचा काही महत्वाचे ‘फॅक्ट्स’!

More from फॅक्ट फाईल्सMore posts in फॅक्ट फाईल्स »
More from राजकारणMore posts in राजकारण »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा